स्वाभिमान भाग 1

About Self Respect

"मानसी, मी आज खूप खूश आहे.लहानपणापासून जे स्वप्न पाहिले होते..डॉक्टर होण्याचे ते पूर्ण झाले. मी M.S. झालो. माझा विश्वासच बसत नाही आहे."
निखिल मानसीला आनंदाने सांगत होता.

"तुझे स्वप्न पूर्ण झाले. याचा तुझ्याइतका किंवा त्याहुनही जास्त आनंद मला झाला आहे.तुला मिळालेल्या यशासाठी तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन."
निखिलचे आनंदाने कौतुक करत मानसी म्हणाली.

"आता M.Ch. करून कार्डिक सर्जन व्हायचे मी ठरवले आहे आणि ते मी करणारच आहे."
निखिल मोठ्या आत्मविश्वासाने पुढचे प्लँनिंग मानसीला सांगत होता.

"तू जे ठरवतो ते पूर्ण करतोच.हे मला चांगलेच माहित आहे.तू M.Ch. पण पूर्ण करशील,तू चांगला सर्जन पण होशील. याची मला पूर्ण खात्रीही आहे आणि त्याचा मला आनंदही आहे;पण आपल्या लग्नाचे काय?"

मानसीने आपल्या मनातील इच्छा निखिलला बोलून दाखवली.

"तुला मी यापूर्वीही सांगितले आहे आणि आताही सांगतो आहे.मला माझे ध्येय पूर्ण करायचे आहे.ध्येयाच्या मार्गात मला इतर कोणतीही आडकाठी नको आहे.माझे ध्येय पूर्ण झाले की मग लग्न करू.मीही कुठे जात नाही आणि तू ही कुठे जात नाही आणि आपले एकमेकांवर प्रेम आहे ना? आपल्या प्रेमावर आणि माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग का लग्नाची इतकी का घाई करते आहे?"

सुरूवातीला आनंदी असणारा निखिल आता चिडक्या स्वरात मानसीला म्हणाला.

त्याचे असे बोलणे ऐकून मानसीला विशेष असे किंवा काही वेगळे असे वाटले नाही. तिला निखिलचा स्वभाव माहित होता.यापूर्वीही तिने त्याला लग्नाविषयी विचारल्यावर त्याची अशीच प्रतिक्रिया असायची.

"ठिक आहे.तू तुझे ध्येय पूर्ण कर. माझ्या तुला मनापासून शुभेच्छा.पण तू आता मला आणि आपल्या प्रेमाला विसरून जा. ही आपली शेवटची भेट. मी व माझे प्रेम तुझ्या ध्येयाच्या आड कधीही येणार नाही. मी हे रागाने नाही तर चांगल्या भावनेतून सांगत आहे."

असे बोलून मानसी तेथून पटकन उठली आणि निखिल काही बोलण्याअगोदर निघून गेली. आणि जाताना एक पाकिट निखिलच्या हातात देऊन गेली.

तिच्या या प्रतिक्रियेवर निखिल काही बोललाही नाही आणि तिला त्याने थांबवलेही नाही. फक्त सुन्न मनाने ती गेली त्या वाटेकडे बघत राहिला.

आपल्याला निखिल थांबवेल आणि आपल्याशी बोलेल.अशी मानसीची इच्छा होती पण तिला त्याचा स्वभाव पूर्णपणे माहित होता. म्हणून तो असे काहीही करणार नाही. या विचाराने तिने आपल्या मनातील इच्छेला दाबून टाकले आणि ती रडतच घरी परतली.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all