स्वाभिमान भाग 2

About Self Respect

निखिलला खूप काम होते,त्याला वेळ नव्हता म्हणून तो व मानसी थोड्या वेळासाठीच भेटणार होते.त्यामुळे मानसी त्याचा जास्त वेळ न घेता निघून गेली.ती तर निघून गेली आणि इकडे निखिल तिने दिलेल्या पाकिटाने थोडा अस्वस्थ आणि साशंक झाला. आपले काम बाजूला ठेवून त्याने ते पाकिट उघडले आणि त्यात मानसीने त्याच्यासाठी लिहीलेले पत्र दिसले.


"प्रिय निखिल,
मी तुला हे सर्व प्रत्यक्ष भेटीतच सांगणार होते;पण तुझ्या सांगण्यानुसार आपण थोडाच वेळ भेटणार होतो आणि तुला हे सर्व सांगताना तुझा वेळ गेला असता आणि तुला हे आवडले नसते.म्हणूनच मला जे प्रत्यक्षात तुझ्याशी बोलायचे होते, ते पत्राद्वारे लिहीत आहे.पत्र वाचण्यातही तुझा वेळ जाईल म्हणून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही वाच.

आपल्या पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंतचा संपूर्ण प्रवास मला आठवतो आहे.तो प्रत्येक क्षण मी आठवणींच्या रूपात जपून ठेवला आहे.तुला जेव्हा कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिले होते,तेव्हाच तुझे रूबाबदार व्यक्तिमत्त्व माझ्या मनात भरून गेले होते.इतरांपेक्षा तुझ्यात काहीतरी वेगळेपण हे जाणवले होते.तुझ्या देखण्या रूपाच्या मोहात तर मी पडलेच होते;पण रूपाबरोबर तुझ्यातील एकएक गुणही जसे दिसू लागले तसे माझे मन अजूनच तुझ्याकडे धावू लागले होते.
तुझी प्रगल्भ बुद्धिमत्ता व अभ्यास करण्याची आवड यामुळे तुला मिळत जाणारे यश, तुझ्या वागण्यात कडकपणा होता पण गाणे छान गायचा,प्रत्येकाला मदत करण्याचा तुझा स्वभाव,बोलण्यात तर एवढा तरबेज की समोरचा तुझ्याशी वादच घालू शकत नव्हता. विविध विषयांवरील अभ्यास व असलेल्या ज्ञानामुळे तू वेगवेगळ्या विषयांवर छान बोलायचा. तुझ्या बोलण्याची छाप इतरांवर एवढी पडत होती की, तुझा सहवास प्रत्येकाला हवाहवासा वाटत होता.अनेक मुले तर तुझे मित्र झालेच होते पण मुलीही तुझ्या आजूबाजूला कायम असायच्या.तू जेव्हा स्वतः हून मला प्रपोज केले;तेव्हा तर मला आनंदापेक्षा आश्चर्यच जास्त झाले होते.सुंदर,हुशार मुली सोडून तू मला का निवडले ? हा प्रश्न मी तुला अनेकदा विचारला;पण तू त्याचे उत्तर अजूनही दिले नाही. मी स्वतः ला खरंच खूप भाग्यवान समजत होते की, तू माझ्या जीवनाचा सहप्रवासी होणार होता.

हळूहळू आपले प्रेमप्रकरण मित्रमैत्रिणी,कॉलेज आणि घरापर्यंतही पोहोचले. तुझ्या घरातून आणि माझ्या घरातून ही आपल्या प्रेमाला विरोध झाला नाही त्यामुळे हायसे वाटले आणि आपला पुढचा मार्ग मोकळा झाला असे वाटले.

तुझ्या घरी तर मी अगदी माझेच घर आहे ..असे वागत होती. तुझे आईबाबा, भाऊबहीण माझ्याशी छान बोलत होते,वागत होते.या सर्वांनी मला आपलेसे केले होते आणि मी पण त्यांना आपलेच मानत होते.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all