स्वाभिमान अंतिम भाग

About Self Respect

आपल्या नात्यामुळे तुझ्याही घरातले आणि माझ्याही घरातले आनंदी होते. त्यांचा आपल्या दोघांवर विश्वास होता म्हणून त्यांनी आपल्या मैत्रीला, प्रेमाला कधीही वेगळ्या दृष्टीने पाहिले नाही आणि आपल्या प्रेमाचा आपल्या शिक्षणावर कधी परिणाम झाला नाही. आपण त्यातही यशस्वी होत गेलो. MBBS चे आपण एकत्र शिक्षण घेतल्यानंतर तू M.S. साठी दुसरीकडे गेला आणि मी येथे राहूनच M.D. पूर्ण केले.तेव्हाही तू दूर असताना,तुझ्या भेटीसाठी मी आतुर असायची पण तुला माझ्या भावना कळत असूनही न कळल्यासारखा वागायचा.
प्रत्येक व्यक्तीत चांगले गुण असतात तसे काही थोडे वाईट गुणही असतात. आपण फक्त दुसऱ्याचे चांगले गुण पाहायचे . नात्यात व मैत्रीत हे तर जरूरीचे असते...तरच नाते,मैत्री टिकत असते.या विचाराला अनुसरून मी आपला मैत्रीत,आपल्या नात्यात आनंदी राहत होते.तुझ्यातील चांगल्या गुणांमुळे मी तुझी इतकी मोठी फॅन झाली होती की, तुझ्यातील जे इतर गुण होते ते मला दिसत नव्हते किंवा त्याकडे मी कधी लक्ष दिले नाही. तुला तुझ्या हुशारीचा,चांगल्या गुणांचा स्वाभिमान आहे. हे मला कळत होते आणि ते मला मान्यही होते; पण त्या स्वाभिमानाचे अहंकारात कधी रूपांतर झाले हे तुला कळलेही नाही. अहंकारी व्यक्ती इतरांना तुच्छ लेखू लागतो.'माझेच बरोबर' असे इतरांना दाखवत असतो.कोणाचे काही ऐकून न घेता मीपणा दाखवत असतो.माझ्या सारखे कोणीच नाही या विचाराने इतरांमधील चुका शोधत असतो आणि त्यांना त्या चुका दाखवून त्यांचा अपमान करत असतो.सतत आपले निर्णय इतरांवर लादत असतो. असे वागत असताना, असा अहंकारी व्यक्ती ..इतरांना आपल्याबद्दल काय वाटत असेल? त्यांचा स्वाभिमान दुखावला जात असेल का? असा विचारही करत नाही.
तुझे वागणेही असेच होत गेले.

तुझ्या प्रेमात आकांत बुडालेली मी ..तुझ्या प्रत्येक गोष्टीला फक्त हो म्हणत गेली.मलाही माझा स्वाभिमान आहे.हे विसरून गेली होती.
आपल्या नात्यात प्रत्येक गोष्ट तूच ठरवत होता.कधी भेटायचे?कुठे भेटायचे?किती वेळ भेटायचे? सर्व काही तुझ्या म्हणण्यानुसार. मी काही सांगितले तर ते तुला मान्यच नसायचे आणि माझ्या चुका काढून तू मला कठोर शब्दांत रागवायचाही.माझ्या मनाला खूप वाईट वाटायचे.तुला जसा तुझा स्वाभिमान प्रिय होता तसा मलाही माझा स्वाभिमान प्रिय होता.पण तुझ्यावरील प्रेमापोटी मी ते ही सहन करत राहिले. पण तू जेव्हा माझ्या आईबाबा,भाऊबहीण यांच्या बाबतीत अपमानास्पद बोलू लागला तेव्हा मला जास्त त्रास होऊ लागला. तुझ्यातील चांगल्या गुणांमुळे तुझे अनेक चाहते होत होते;पण त्यांच्याशीही तू फटकळपणे वागू लागला.तुझ्या घरातील नोकर माणसे असो, ओळखीचे लोक असो, अनोळखी लोक असो ..तू सर्वांवर कारण असो वा नसो अधिकार गाजवायचा.एवढेच काय.. तू तुझ्या आईवडिलांसोबतही असेच वागू लागला होता.
मी तुला मैत्रीच्या नात्याने, प्रेमाच्या नात्याने अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केलाही;पण तू उलट मलाच चुकीचे ठरवत गेला.

हुशार, गुणी व्यक्ती सर्वांना आवडत असते;पण त्याबरोबर त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणे चांगले असेल ..तरचं त्याचे गुण चांगले वाटतात. नाहीतर तो व्यक्ती इतरांपासून वेगळा पडतो.

आता तू M.Ch. करशील ..अजून पुढचे शिक्षण घेशील.मोठा कार्डिक सर्जन पण होशील. लोकांच्या ह्रदयाची सर्जरी करून त्यांना जीवनदानही देशील.पण तुझ्यातील अहंकारामुळे तू इतरांच्या ह्रदयाला,मनाला वेदना देशील त्याचे काय ? तू यशस्वी कार्डिक सर्जन झाल्यावर तुझ्या शिक्षणामुळे, ज्ञानामुळे आणि मिळत जाणाऱ्या यशामुळे तुझ्यातील अहंकाराला अजून खतपाणी मिळत जाईल.आणि तुझी मैत्रीण म्हणून ,तुझी सहप्रवासी म्हणून मी हे पाहू शकणार नाही, मला हे सहन होणार नाही. तुझ्याकडून इतरांचा दुखावला जाणारा स्वाभिमान, त्यांचा होणारा अपमान मला आवडणार नाही.

लग्नाच्या बाबतीत ही तू कधी सिरीयस दिसला नाही. माझ्या व आपल्या घरातील लोकांच्या भावनांना तू कधी समजून घेतले नाही.
त्यामुळे मलाही आता तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा राहिली नाही. तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते.
मी हे सर्व सांगितले त्याचा तुझ्यावर काही चांगला परिणाम होतो की माहित नाही ;पण तुला हे सांगणे गरजेचे वाटले म्हणून सांगितले. माझे मन मोकळे झाल्यासारखे वाटले.तुला हे सर्व सांगणे मला माझे एक कर्तव्य वाटले म्हणून सांगितले. तुला हे सर्व वाचून माझा निश्चितच राग आला असेल.आपले नाते तोडण्याचा हा निर्णय घेताना मला खूप त्रास होणार आहे पण वेळ सर्व गोष्टीवर चांगले औषध ठरते. त्याच आशेवर मी पुढील आयुष्य जगत राहील."

तुझी मैत्रीण
मानसी


मानसीचे हे पत्र वाचून निखिल ला आजपर्यंतचे आपले वागणे आठवू लागले. 'आपल्याला आपल्या हुशारीचा,गुणांचा अभिमान होता. मिळत गेलेल्या यशाचा आनंद होत होता;पण त्या आनंदात ..त्या आपल्या स्वाभिमान जपण्यात आपण इतरांशी कळत नकळत असे वागू लागलो होतो.मानसीचे हे पत्र म्हणजे माझ्या जीवनाचा आरसा होय. मला माझ्या आयुष्याची खरी ओळख करून देणारे आहे.तिचे खरेच आभार मानायला हवे.
आपल्या आयुष्यात असे लोक हवेत,जे आपल्याला आपल्यातील वाईट गुणांचीही चांगल्यासाठी, आपल्या भल्यासाठी ओळख करून देतात.
स्वभाव पटकन बदलणे शक्य नाही; पण मी माझ्यातील वाईट गुणांना नक्की कमी करेल. माझा स्वाभिमान जपता जपता इतरांच्याही स्वाभिमानाचा आदर करेल.तो जपण्याचा प्रयत्न करेल.'

असे मनाशी ठरवून त्याने मानसीला फोन केला.


निखिलचा फोन आलेला दिसताच 'आपले पत्र वाचून निखिल रागावला असेल आणि आता तो आपल्यावर रागवेल' या विचाराने मानसीने घाबरतच फोन उचलला.

"हॅलो, मानसी.."

अशा निखिलच्या गोड बोलण्याने मानसीच्या मनातील भीती दूर झाली आणि ती शांतपणे निखिलचे बोलणे ऐकू लागली.

"मानसी, तुझे खरंच खूप धन्यवाद.. तुझ्यामुळे मला माझ्यातील चुका,दोष कळाले.मी माझ्याच विश्वात वाहत राहिलो.इतरांचा विचारच केला नाही. आता जे झाले ते झाले. यापुढे मी असा वागणार नाही. माझे M.Ch. पूर्ण झाले की लगेच आपण लग्न करू ..चालेल ना?"

निखिलच्या या बोलण्यावर मानसीला आश्चर्याचा धक्का बसला आणि आपल्या पत्राने चमत्कार घडवून आणला.याचा तिला आनंद झाला आणि निखिलबरोबर लग्न करण्याचे ती स्वप्न पाहू लागली.


निखिलचे M.Ch. पूर्ण झाल्यानंतर निखिल व मानसीचे लग्न झाले आणि दोघेही चांगले डॉक्टर होऊन आपल्या व्यवसायात नाव कमवू लागले.


समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all