Login

स्वाभिमान.

उषाताई आपल्या स्वाभिमाना साठी काय करतात. या कथेत बघूया.
उषाताई हळूहळू लंगडत घरी जात होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची सूक्ष्म रेषा होती. गुडघ्यांना वेदना होत होत्या, पण काळजी कोणाच्या मनात नव्हती त्यांच्यासाठी.

शेजारी रहाणाऱ्या सुमनबाईंनी त्यांच्याकडे पाहून विचारलं—
“अहो ताई, काय झालं? पुन्हा गुडघे दुखतायेत का?”

“हो सुमन, वय झालं की अंगातला प्रत्येक सांधा आपली वेदना व्यक्त करायला लागतो. औषधं संपली होती, म्हणून बाहेर गेले. नाहीतर घरातच असते.”उषाताईंनी उत्तर दिलं.

सुमनबाईंनी विचारलं —
“अहो मग एकट्या का गेला ? अजीतला सांगितलं असतं ना?”

उषाताई हलकं हसून म्हणाल्या —"जाऊ दे गं. तो कामात होता."

पण सुमनबाईंना सगळ्या गोष्टी माहीत होत्या. म्हणून त्यांनी पुढे काही न बोलून उषाताईंचा मन नाही दुखावलं.


घरी पोहोचताच उषाताई हादरल्या. त्यांच्या खोलीतलं सामान वरच्या मजल्यावर नेत होते.
उषाताई ओरडल्या —
“थांबा! माझं सामान वर का नेताय? माझी खोली तर खाली आहे.”

एकता तडक म्हणाली—
“होती. आता माझ्या बहिणीला राहिला देणार आहे. ती शिक्षणासाठी दोनवर्ष इकडेच राहणार आहे .”

“पण माझे गुडघे… मी वरखाली नाही करू शकत .”उषाताई म्हणाल्या.

एकता म्हणाली —“बाहेर फिरताना तसं काही होत नाही ना? मला माहीत आहे ही सगळी कारणं आहेत. माझ्या बहिणीला मोठी खोली राहायला देणार आहे . तिला वरच्या त्या छोट्या खोलीत नाही ठेवणार.माहेरी माझी इज्जत आहे.”

उषाताईंचे डोळे पाणावले.
“मी फिरायला नव्हते गेले,औषधासाठी गेले होते.”

“आम्हाला फरक पडत नाही. तुम्हाला वर रहायचं नसेल तर बाहेरच्या खोलीमध्ये राहा!आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवत नाही, हीच मोठी गोष्ट समजा. "
हा अपमान रोजच्या शब्दांपेक्षा धारदार होता.

अजीत तिथेच उभा होता — पण आईच्या सन्मानासाठी एकही शब्द बोलला नाही.


अपमानाची मर्यादा झाली होती.
उषाताईंनी थरथरत पण ठाम आवाजात म्हटलं—

“आजपर्यंत मी तुमचं सगळं सहन केलं. घर मोठं व्हावं, तुमचं सुख वाढावं म्हणून माझ्या स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं. पण आज, तू मला ‘वृद्धाश्रमात’ पाठवायची भाषा करतेस?”

एकता गप्प नाही बसली.ती म्हणाली —"आम्हीच ह्या घराचा सगळा खर्च भागवतोय.आणि तुम्ही आम्हालाच बोलताय."

उषाताई म्हणाल्या —"आजपासून काही करायची गरज नाही. मीं माझा खर्च खोल्या भाड्याने ठेवून भागवेन."


“हे घर माझं आहे, माझ्या नावावरचं आहे. तुम्हाला राहायचं असेल तर भाडं देऊन राहा. नसेल जमत तर घर सोडून जा.

अजीत स्तंभित उभा राहिला.
“आई, तू आम्हाला घर सोडायला सांगतेस?”

उषाताई म्हणाल्या —"आज पर्यंत तुला आई नाही आठवली. आता कशी काय.??
“ जर माझा सन्मान तुम्हाला करता येत नसेल तर माझं घरही तुम्ही सोडा. चार वर्ष वाट पाहिली की कधीतरी तुम्ही मला समजून घेणार, माझा विचार करणार पण तुम्हाला कधीच ते वाटलं नाही. मग मीं तरी का तुमचा विचार करावा..??माझं राहिलेला आयुष्य मीं आता स्वाभिमानाने जगणार आहे .

शेवटी अजीत आणि एकता वरच्या मजल्यावर रहायला गेले. कारण घर सोडून दुसरीकडे गेल्यावर लोकांनी नावं ठेवली असती .
दर महिन्याचं भाडं देऊनच ते घरात राहू लागले.

उषाताईंनी खालील एक खोली एका विधवा स्त्रीला भाड्याने दिली.

त्यांना दर महिन्याला चांगलं भाडं येऊ लागलं.
त्यांनी घरकामासाठी एक बाई पण ठेवली.

उषाताईंनी एकताची बहीण आल्यावर तिला प्रेमानं समजावलं—
“बाळा, हॉस्टेलमध्ये राहा. अभ्यासावर लक्ष दे. इथलं कटू वातावरण तुला त्रास देईल.”



उषाताईंनी दाखवून दिलं —वय झालं तरीही,
स्त्री म्हणजे फक्त सहन करणारी व्यक्ती नाही — तर गरज पडल्यास स्वाभिमानासाठी घराचा पाया हलवणारी शक्ती आहे.