चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
आठ दिवसांनी विधिताला घरी सोडलं. विधिताची आई विधिताची पुरेपूर काळजी घेत होती. कधी बाळाला तिच्या हातात देऊन विधिताचा हात तिच्या डोक्यावरून फिरवायला लावत होती. तर कधी बाळाला विधिताच्या पुढ्यात देत होती. जवळपास सहा सात महिन्यांनी विधितामध्ये सुधारणा झाली.
"अरे विनीत.. परीला घे ना जरा. मी तयार होते ना!." बेडरूम मधून विधीता आवाज देत म्हणाली.
"हो अगं.. घेतो एकच मिनिटं... काय गं माझी परिराणी.. मम्माला जरा छान तयार होऊदे. आज आपण भूर जातोय ना."छोट्याश्या परीला उचलून घेत विनीत म्हणाला.
खट्याळ हसत परी पण पप्पांच्या जवळ आली. सगळी तयारी करून विनीत विधिता आणि परीच्या दोन आज्ज्या..असे चौघे गाडीत बसले आणि प्रवासाला निघाले.
साडेचार पाच तासात पुणे ते अक्कलकोट असा प्रवास करून सगळेच ठरल्या ठिकाणी पोचले. डोळ्यात आसू आणि चेहऱ्यावर हसू घेऊन सगळेच स्वामींच्या चरणाशी नतमस्तक झाले. स्वामींचा अभिषेक करून तिघांनी त्यांची मनोभावे सेवा केली. परीचं नाव ठेवलं नव्हतं म्हणून सगळ्यांनी मिळून तिथेच स्वामी चरणी तिचं नाव ठेवलं गेलं. स्वामींचरणी परीचं नावं सुद्धा स्वामिनी म्हणूनच ठेवलं गेलं. स्वामींच्या आवडीची गव्हाची खीर आणि मुगडाळीची खिचडी प्रसाद म्हणून घेतली.
"स्वामी..आज तुम्ही सगळं दिलं. माझ्याकडे जे काही आहे..जे काही सुखाचे दिवस आलेत ते फक्त तुमच्यामुळे आले. माझ्या बायकोवर तुमची कृपा दृष्टी कायम अशीच राहु देत. माझ्या मुलीवर तुमच्या आशीर्वादाचा हात सदैव राहू द्या." मुगडाळीची खिचडी आणि गव्हाच्या खीरचा प्रसाद ताटात घेऊन ते ताट हातात घेऊन स्वामींसमोर उभं राहून विनीत म्हणाला.
स्वामींना प्रसादाचा नैवेद्य दाखवून बाकी प्रसाद तिथल्या भाविकांना विधिता आणि परीच्या (स्वामिनीच्या) हातून दिला. चौघांनी पुन्हा एकदा निघतांना स्वामींचा आशिर्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघाले.
"विनीत आणि माझ्या दोन्ही आई..खरचं सॉरी..गेले सहा महिने तुम्ही सगळ्यांनी काय सफर केलं आहे हे माहित नसलं..आठवत नसलं माझ्यामुळे खूप सहन केलंत तुम्ही. आज स्वामींच्या मठात जाऊन आलो आणि मला खूप शांत वाटायला लागलं. गेल्या सहा सात महिन्यात माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला. आपल्याला परीला पण माझ्यामुळे त्रास झाला. सगळं छान सुरू असतांना मधेच हे सगळं घडलं. खरचं विनीत मला कसलही टेन्शन किंवा त्रास नव्हता पण तरी असं कसं झालं नाही माहीत. आई.. विनीत आणि आई तिघांना सॉरी." विधिता डोळ्यातलं पाणी पुसतं म्हणाली.
"जे झालं ते आपल्या नशिबात होतं. स्वामी आपली परीक्षा घेत होते असं समजायचं. आता सगळं छान आहे बाळा. आणि आम्ही काहीही झालं तरी आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत."विनीतची आई विधिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"हो ना..जे झालं ते झालं. आता पुन्हा त्या गोष्टीचा विचार करायचा नाही समजलं! आता आनंदी रहा. झाल्या गोष्टींचा विचार करून त्रास करून घेऊ नको. स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत. एवढी वर्ष स्वामींची सेवा केलीस आणि स्वामी तुला नाराज करणं शक्यच नव्हतं. स्वामी काय म्हणतात माहीत आहे ना? भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे."विधिताची आई म्हणाली.
अशक्य ही शक्य.. करतील स्वामी..
श्री स्वामी समर्थ..
श्री स्वामी समर्थ..
समाप्त.
©®श्रावणी लोखंडे..
©®श्रावणी लोखंडे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा