Login

स्वामी भाग एक

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५


"विनीत.. अरे काय करतोयस तू! आधीच तुझं हे प्रॉडक्ट माझ्या पोटात फुटबॉल खेळतोय त्यात तुझं काय सुरू आहे." विधिता म्हणाली.


"काही नाही गं.. म्हटलं थोडं रोमान्स करूया. बरं ऐक ना..आमच्या मित्रांची ट्रिप जातेय माथेरानला, खरतरं मला जायचं खूप मन आहे पण मी जाऊ शकत नाहीये त्यामुळे खूप उदास वाटतेय."विनीत म्हणाला


"माझ्यामुळे तुला कुठे जाता येत नाहीये म्हणून उदास आहेस का?" विधिताने नाराजीच्या सुरात विचारलं.


"अगं नाही नाही तुझ्यामुळे नाही काही. सगळे ट्रिपला जाताहेत आणि नेमकी हेडऑफिस मध्ये महत्वाची मीटिंग लावली आहे बघ. एकतर मॅनेजर झाल्यापासून कामातून थोडावेळ मान वर काढून बघायला सुद्धा उसंत मिळत नाही आणि म्हटलं दोन दिवस सगळ्यांसोबत बाहेर जाऊ तर हे असं.."विनीत थोड्या नाराजीनेच म्हणाला.


"एवढंच ना.. हे बघ विनीत ज्या पोस्ट वर तू आत्ता आहेस त्या पोस्टवर येण्यासाठी लोकं बॉसच्या पाठी हांजी हांजी करत फिरत असतात. तू मॅनेजर झालास ते तुझ्या कर्तृत्वामुळे.. कामाप्रती तुझ्या डेडिकेशनमुळे. तुला अजून खूप पुढे जायचं आहे. तुझी सगळी स्वप्न मला पूर्ण होतांना बघायची आहेत."आपल्या हातांच्या ओंजळीत त्याचा चेहरा घेत विधिता म्हणाली.


"तुला माहितीये राणी..तुझ्यामुळेच मला कामाचा हुरूप येतो. तुझ्याशी बोललो ना की मन हलकं होतं. म्हणून मी सारखा बोलत असतो 'मला तुझ्यासारखी गोड गोड परी पाहिजे' विधिताच्या गालावर ओठ टेकवत विनीत म्हणाला.


"बरं बरं..पुरे झालं आता. आज तुला रविवारची सुट्टी जरी असली तरी मला सुट्टी नाहीये. मला बरीच कामं करायची आहेत. मला ना इडली खावीशी वाटतेय त्यामुळे सकाळी भिजत घातलेले डाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण बाकी आहे.तुला काय तुझ्या परिराणी सोबत बसायला. "लटक्या रागातच विनीतला बाजूला सारत विधिता म्हणाली.


"ए..खबरदार माझ्या परिराणीला काही बोलशील तर!"विधिताला पाठून मिठी मारत तिच्या पोटावरून प्रेमाने हात फिरवत विनीत म्हणाला.


"हो का... इतकंच आहे तर माझ्या मदतीला चला दोघेही."हलकेच हसून विधिता म्हणाली.


"इतकंच ना..हा बघ आलोच मी. चल सांग आता पटापट काय काम करायचं आहे. कांदा चिरून देऊ की टोमॅटो?" मस्तीच्या मूड मध्ये विनीत म्हणाला.


"आता बाबा होणार आहेस तू..जरा मस्ती कमी कर नाहीतर मला एक नाही दोन दोन बाळं सांभाळावी लागणार आहेत. "विनीतचा गाल खेचत विधिता म्हणाली.


"तुला खुश ठेवण्यासाठी मी काहीही करू शकतो माहीत आहे ना तुला. तू अशी आनंदी असलीस ना की मलाही आनंद होतो." विधिताचा हात हातात घेत विनीत म्हणाला.
विधिताने विनीतला प्रेमाने मिठी मारली आणि अचानक तिच्या पोटात कळ आली.

आई गंsss
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे
0

🎭 Series Post

View all