Login

स्वप्न आणि वास्तव भाग १

स्वप्न आणि वास्तव भाग १
स्वप्न आणि वास्तव भाग १

" चिन्मय, डायरीचा हा आकडा आणि तुझ्या कपाळावरच्या या आठ्या... दोन्ही कशा मेळ खात नाहीत रे ? या महिन्यात खर्च थोडे जास्त झालेत का ? "

विनायकरावांनी आपल्या चष्म्याच्या काचा पुसत डायरीवरची नजर किंचित वर करत विचारलं.
हॉलमध्ये पडलेल्या त्या प्रश्नाने वातावरणातली शांतता अचानक तणाव पुर्ण झाली. विनायकराव निवृत्त झाल्यापासून घराच्या हिशोबाची डायरी हाच त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रोजेक्ट झाला होता. दर महिन्याची एक तारीख आली की, मध्यमवर्गीय चौकटीतली ही बॅलन्स शीट पुन्हा एकदा मांडली जायची.

" बाबा, आकडा बरोबर आहे, फक्त कामाचं ओझं थोडं जास्त आहे."

चिन्मयने लॅपटॉपवरून नजर न हटवता उत्तर दिलं. तो एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होता, पण अलीकडच्या ले-ऑफच्या बातम्यांनी त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं गडद झाली होती.

" होम लोनचा हप्ता तर गेलाय, पण केतकीच्या पुढच्या सेमिस्टरची फी आणि बिल्डिंगचा वाढलेला मेंटेनन्स...
यावेळेस थोडी ओढाताण होणार आहे. मला कदाचित या महिन्यात सुट्यांमध्येही ओव्हरटाईम करावा लागेल."

सुनीता बाई किचनमधून चहाचे कप घेऊन बाहेर आल्या. चिन्मयचा थकलेला चेहरा पाहून त्यांचं आईचं हृदय पिळवटून निघालं.

" अरे चिन्मय, तो ओव्हरटाईम करेल पण त्याच्या प्रकृतीचं काय ? विनायक, आपण आपल्या पीएफच्या पैशातून काही भरू शकत नाही का ? पोराला तरी थोडा विसावा मिळेल."

विनायकराव क्षणभर गप्प झाले. मध्यमवर्गीय पित्याच्या आयुष्यात साठवलेले पैसे ही एक अशी ढाल असते जी फक्त आणी बाणीच्या युद्धासाठी राखून ठेवलेली असते. ती प्रत्येक छोट्या संघर्षात वापरली, तर मोठ्या संकटावेळी काय करायचं ?

हा यक्षप्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
इतक्यात बाहेरच्या दारावरची बेल वाजली. मानसी ऑफिसमधून परतली होती. पाऊस सुरू असल्याने तिची साडी थोडी भिजली होती. तिने निमूटपणे कोपऱ्यात सँडल ठेवलं आणि कसलाही विचार न करता सोफ्यावर मटकन बसली. तिचा चेहरा नेहमीपेक्षा जास्त गंभीर होता.

" काय झालं मानसी ? आज खूपच उशीर झाला ? " सुनीता बाईंनी विचारलं.

मानसीने चिन्मयकडे पाहिलं.

" चिन्मय, मला प्रमोशन मिळालंय... सीनिअर मॅनेजर म्हणून."

" अरे वा! हे तर सेलिब्रेशनचं कारण आहे."
विनायकराव आनंदाने म्हणाले. पण मानसीच्या डोळ्यांत आनंद नव्हता, तर एक अस्वस्थता होती.

" पण... प्रमोशनसोबत पोस्टिंग बेंगलोरला आहे. पुढच्या पंधरा दिवसात मला जॉईन व्हायचंय," मानसीने हळूच बॉम्ब टाकला.

हॉलमध्ये जणू स्मशानशांतता पसरली. विनायकरावांच्या हातातली हिशोबाची डायरी तशीच उघडी राहिली. मध्यमवर्गीय घरात जेव्हा एखादी संधी येते, तेव्हा ती एकटी येत नाही , ती सोबत अनेक तडजोडींचे कडू डोस घेऊन येते.

" बेंगलोर ? मानसी, तू थट्टा तर करत नाहीयेस ना ? " चिन्मयने लॅपटॉप बंद करून तिच्याकडे पाहिलं.

" आता कुठे अर्णवची शाळा सेट झालीये. आई-बाबांचे रिपोर्ट गेल्या आठवड्यातच आलेत, त्यांची औषधं आणि ट्रिटमेंट इथेच सुरू आहे. अशात तू घर सोडून जाणार? घर कोण सांभाळणार ? "

मानसीच्या डोळ्यांत पंधरा वर्षांच्या मेहनतीचं आणि संयमाचं पाणी आलं.

" चिन्मय, गेली पाच वर्षं मी या घरासाठी आणि अर्णवसाठी माझ्या करिअरच्या कितीतरी संधी नाकारल्या आहेत. तुला जेव्हा अमेरिकेला प्रोजेक्टसाठी जायचं होतं, तेव्हा मी एका शब्दाने तुला अडवलं नाही. मग आता संधी माझ्याकडे आलीये, तर तू मला घर कोण सांभाळणार असा प्रश्न कसा विचारू शकतोस ? "

"मानसी, प्रॅक्टिकल विचार कर. माझे जॉबचे प्रॉब्लेम्स सुरू आहेत, अशात तू लांब गेलीस तर हे सगळं 'बॅलन्स' कसं होईल ? " चिन्मयचा आवाज वैतागाचा होता.

हा वाद केवळ पती-पत्नीचा उरला नव्हता, तर तो एका मध्यमवर्गीय घराच्या अस्तित्वाचा संघर्ष बनला होता. जिथे स्वप्न पाहायचं असेल, तर कोणाला तरी आपला उंबरठा ओलांडून बाहेर पडावं लागतं आणि कोणाला तरी तो उंबरठा जपण्यासाठी स्वतःला आत कोंडून घ्यावं लागतं.

आई-वडील, मुलं, कर्ज आणि स्वप्नं... या चौकोनात मध्यमवर्गीय आयुष्य नेहमीच गुदमरत असतं.
विनायकराव काही न बोलता उठले आणि गॅलरीत जाऊन उभे राहिले. बाहेर पावसाची रिपरिप आता वाढली होती.

त्यांना आठवलं, तीस वर्षांपूर्वी त्यांनीही स्वतःचं एक व्यावसायिक स्वप्न अशाच एका हिशोबाच्या डायरी खाली कायमचं गाडून टाकलं होतं, कारण तेव्हा चिन्मयच्या शिक्षणाची फी भरणं जास्त महत्त्वाचं होतं. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत होती, फक्त पात्रं बदलली होती.

इतक्यात केतकी आपल्या खोलीतून बाहेर आली. ती या घराची न्यू जनरेशन होती, जिचे पाय जमिनीवर असले तरी नजर आकाशाकडे होती.

" दादा, वहिनी... शांत व्हा ! प्रॉब्लेम बेंगलोरचा नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या माईंडसेटचा आहे. आपण तडजोड म्हणजे कोणा एकाचा बळी देणं असं समजतो, पण तसं नसतं. आपण सोल्यूशन शोधूया ना ! "

" केतकी, हे सोपं नाहीये ग ! घर चालवणं म्हणजे काही प्रोजेक्ट मॅनेजमेंट नाहीये." चिन्मय म्हणाला.

" का नाहीये ? वहिनीला बेंगलोरला जाऊ दे. आई-बाबांची जबाबदारी मी घेईन आणि दादा, तू थोडा वेळ अर्णवला दे. आपण कामाची विभागणी करूया. " केतकीने ठामपणे सांगितलं.

मध्यमवर्गीय संघर्षाचा हा नवा आणि गुंतागुंतीचा अंक आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. जिथे नात्यांची वीण खूप घट्ट होती, पण बदलत्या काळाच्या आणि अपेक्षांच्या रेट्यात ती ओढली जात होती. उंबरठ्याच्या आतलं सुरक्षित आयुष्य आणि बाहेरचं आव्हानात्मक जग... यांच्या मधल्या रेषेवर आज संपूर्ण मोडक कुटुंब उभं होतं.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all