चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(लघुकथा फेरी)
(लघुकथा फेरी)
शीर्षक : स्वप्नातल्या संसाराची गोष्ट
"हो नाही करायचंय मला लग्न! तुझ्याशीच नाही तर इतर कोणाशीही नाही; पण त्याला काय महत्त्व? होणार तर तेच ना जे सगळ्यांना हवंय." यश्वी रागाने धुसफूस करत म्हणाली.
"म्हणजे? मला कळलं नाही." पार्थ जरा गोंधळून म्हणाला.
"हुशार आहेस ऐकलं होतं. साधं मराठी कळू नये, याचं नवल वाटतं." ती वाकडे तोंड करत म्हणाली.
"मराठी कळतं; पण तुला लग्न का नाही करायचं, ह्याचा मी अंदाज लावू शकत नाहीये. तुला कुणी दुसरं आवडतं का?" तो तिचे हावभाव टिपत म्हणाला.
"तुम्हा मुलांना हेच एक कारण वाटतं का रे लग्नाला नकार द्यायला?" ती परत एकदा खेकसलीच त्याच्यावर.
"अगं पण तू सांगितलं नाहीस तर मला कळणार कसं? हुशार असलो तरी मनकवडा नक्कीच नाही मी; पण तू संधी दिली आणि थोडी शिकवणी दिलीस तर शिकेन लवकरच." तो आता तिला बोलते करण्याचा प्रयत्न करत होता.
"झालं?" ती डोळे फिरवत म्हणाली.
"बरं सॉरी. आता स्पष्ट विचारतो, काय प्रॉब्लेम आहे तुझा? का लग्न नाही करायचं?" त्याने गांभीर्याने विचारले.
"बस, नाही करायचं." ती टाळाटाळ करत म्हणाली.
"काहीतरी कारण असेल ना? प्रत्येक व्यक्तीच्या निर्णयामागे काही ना काही कारण असतंच." तो शांतपणे म्हणाला.
"भीती वाटते मला प्रेमाची, लग्नाची आणि यांच्याशी संबंधित सगळ्याच बाबींची..." आता तिच्या शब्दांत त्याला जरा गूढपणा जाणवला.
"का?" त्याने हाताची घडी घालत विचारले.
"काय सारखं का? का? लावलंय. वाटते भीती तर वाटते. आता मला पालीची भीती वाटते, का वाटते ते नाही माहिती... तसंच हेसुद्धा..." ती काहीशी वैतागून उत्तरली.
"पालीची भीती वाटणं स्वाभाविक आहे. अनेकांना वाटते पालीची भीती, त्यात काही अप्रूप नाही; पण लग्न, प्रेम याविषयी भीती वाटण्याबाबत कारणे असतात. मला सांग कधी विश्वासघात झालाय का तुझा?"
"रोजच होतो. ते दूधवाले काका दूधात पाणी घालून विश्वासघात करतात. माझी बहीण खोलीत येणार नाही बोलून रोज घुसखोरी करते. आई कारले कडू नाही बोलून विश्वासघात करते आणि बाबा तर..." ती एकटीच बडबडत सुटली.
तिचे उत्तर ऐकून हसूच आले त्याला म्हणून लगेच तिला थांबवत त्याने पुढील प्रश्न विचारला, "आणि प्रेमभंग?"
'प्रेमभंग व्हायला आधी प्रेम करावं लागतं.' ती ओठांतल्या ओठांत पुटपुटली.
"काय म्हणालीस?" त्याला पुसटसे ऐकू गेले म्हणून परत विचारले.
"काही नाही. चल, उशीर होतोय जाऊ खाली." ती टाळत म्हणाली.
त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, "थांब..."
"मला माझ्या परवानगीविना कुणीही स्पर्श केलेला आवडत नाही." ती त्याच्या हाताकडे पाहत म्हणाली.
त्याने लगेच तिचा हात सोडला. "आपला विषय अर्धवट राहिलाय." तो म्हणाला.
"नाही राहिला. तुला मी पसंत आहे आणि तू लग्नाला होकार देणार आहेस, इथेच संपलं सगळं." ती त्याला खाऊ की गिळू नजरेने पाहत म्हणाली.
"नाही मला बळजबरी नातं लादायचं नाही तुझ्यावर." तो म्हणाला.
"मग नकार दे लग्नाला..." ती हाताची घडी घालून म्हणाली.
"त्याने काय होईल? मी तुझ्या म्हणण्यानुसार वागेलही; पण तुझ्यासाठी नेहमीप्रमाणे स्थळं पाहिली जातील. मी माघार घेतली तशी माघार प्रत्येकजण घेईल असं नाही आणि समजा, तुला ज्या बाबींची भीती वाटते त्याच गोष्टी त्या दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर घडल्या तर?" तो नजर रोखून म्हणाला.
"तू काय श्राप देतोयस का?" तिला विचार करूनच गलबलून आले.
"कावळ्याच्या श्रापाने गाय मरत नाही. मुळात मी श्राप देत नसून जे घडू शकतं त्याची कल्पना देतोय." तो स्पष्ट शब्दांत म्हणाला.
"एक काम कर, तू बरा वाटतोय तर दे तूच होकार." जरा विचार करून ती पटकन म्हणाली.
"तो मी देणारच आहे पण मला तुझा भूतकाळ ऐकून घ्यायचा आहे." तो ठामपणे म्हणाला.
"माणसाने पुरलेल्या गोष्टी पोखरून काढू नये." ती बारीक डोळे करून म्हणाली.
"मला खाज आहे पुरलेल्या गोष्टी शोधण्याची... पेशाने पुरातत्त्वशास्त्रज्ञ आहे मी, हे कळलं असेलच ना तुला!" तो डोळे मिचकावत म्हणाला.
"काय होणार आहे भूतकाळ जाणून? मुळात तुझ्याकडे एवढा फावला वेळ आहे का जे तू टुकार चर्चा करण्याचा बेत आखतोय? आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे नाही असा एखादा भूतकाळ जो ऐकण्याची तू अपेक्षा करतोय. माझा नाही कोणी एक्स, वाय, झेड..." ती चिडचिड करत म्हणाली.
"बरं, तू नको सांगू काहीच. माझं ऐकतेस?" तो म्हणाला.
"तुझं प्रेम आहे का कुणावर? मग तिच्याशीच का लग्न करत नाहीस?" ती आता त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली.
"करायचं तर होतं पण..." तो बोलता बोलता थांबला.
"हं! म्हणून माझ्याकडे आलास? माहितीये, तुमच्यासारख्या मुलांमुळे अख्खी पुरूष जात बदनाम आहे." ती वाकडे तोंड करत म्हणाली. त्यावर तो फक्त हसला.
"हसतोस काय? कौतुक केलं नाही मी. असो, सांग तुझी प्रेमकहाणी..." ती गच्चीवरील झोपाळ्यावर रेलत म्हणाली.
"हो, सांगतो. मला खूप आवडायची हृता आणि तिलाही मी आवडायचो. मुंबईसारख्या शहरात वाढलेलो तर साहाजिकच ओपन माईंडेड होतो आम्ही... खूप लवकर सगळं घडत गेलं. प्रपोज आम्ही दोघांनीही केलेलं, व्हॅलेंटाईन डेला! तिच्याबद्दल माझ्या घरी आणि माझ्याबद्दल तिच्या घरी माहिती होतं. थोडक्यात दोन्ही कुटुंबाकडून आमच्या नात्याला हरकत अशी काही नव्हतीच, फक्त आम्हाला आमच्या मर्यादा सांगितलेल्या; पण ती कधीच नियमानुसार वागणारी नव्हती. तिचं स्पष्ट मत होतं, नियम असतातच मोडण्यासाठी!" जुन्या आठवणी आठवताना त्याच्या ओठांवर हलके स्मित पसरले होते.
"म्हणजे तू मिठी, किस वगैरे तर खूप आधीच केलं असेल ना?" तिने त्याच्याकडे पाहत विचारले. त्याने तिच्याकडे पाहून ओशाळून मान हलवली.
"हं! सगळं शेण खाऊन आता लग्न करायला माझ्याकडे आलाय..." ती नाक मुरडत म्हणाली. तो नकारार्थी मान हलवत हसला.
"प्रेमात पडल्यावर येतात असे काही क्षण आणि आपण बेभान होतो. तुलाही कळेल, माझ्या प्रेमात पडशील तेव्हा..." तो तिच्याकडे पाहत खट्याळ हसत म्हणाला.
"वाट बघ!" ती तोऱ्यात म्हणाली.
"लावतेस पैज?" तो हात पुढे करत म्हणाला.
"असले फालतू नाद नाहीत मला... ते जे सांगत होता ना, ते कंटिन्यू कर." ती म्हणाली.
"आमच्या दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं. तिला जॉब मिळाला, मीही माझ्या क्षेत्रात यश मिळवलं होतं म्हणून आम्ही सहा महिन्यांनंतर लग्न करायचं ठरवलं. कामामुळे भेटीगाठी कमी व्हायच्या पण सगळं सुरळीत होतं. एकदा तिच्या वाढदिवसाला आम्ही दोघांनी रजा घेतली. पूर्ण दिवस एकत्र घालवला. स्वारी एकदम खूश होती आणि तो क्षण आला. तिला लग्नाआधी एकतरी वेळा माझ्याशी इंटिमेट व्हायचं होतं. तिने बरेचदा ती इच्छा व्यक्तही केलेली... मी मात्र त्यावर काही बोलायचो नाही, कारण मला वाटायचं ती एकतर मस्करी करतेय किंवा माझी परीक्षा घेतेय; पण वाढदिवस असल्याने तिला माझ्याकडून तीच भेट हवी होती. मी पुढाकार घेत नाही बघून तीच मला प्रवृत्त करू लागली. किसिंगपर्यंत ठीक होतं. मीही साथ दिलेली; पण जेव्हा तिचे हात माझ्या सर्वांगावर फिरू लागले आणि ती माझ्या कपड्यांना..." तो बोलत होता की मध्येच यश्वी म्हणाली.
"ए थांब! तू सांगतोयस तसं आपोआप इमॅजिन होतंय मला. एखादा एरोटिक मुव्ही प्रत्यक्ष पाहत असल्यासारखं वाटतंय. माझ्या बालमनावर काय परिणाम होईल, याचा तरी विचार कर." ती डोळ्यांवर हात ठेवत म्हणाली.
ती खरंच त्याला बालिश वाटली. किंचित हसत तो म्हणाला, "काळजी करू नको, २८ वर्षांची आहेस तू म्हणजे कायद्याने एरोटिक मुव्ही आरामात बघू शकतेस."
"पण मला नाही बघायचा... मला नाही ऐकायचं काहीच. तू तुझ्या भूतकाळाचं पान नको वाचू माझ्यापुढे. असू दे, मीच जाते." ती गाल फुगवून म्हणाली.
"अगं, मस्करी केली. तू शांतपणे ऐक. लग्नाआधी माझ्याबद्दल तुला काही गोष्टी माहिती असायला हव्यात आणि त्यासाठी माझा भूतकाळ पूर्ण ऐकणं गरजेचं आहे. सो प्लीज..." तो नजरेनेच आर्जव करत म्हणाला.
"बरं बोल." ती नाईलाजानेच म्हणाली.
"ह्म्म. त्या दिवशी हृताने ड्रिंकसुद्धा केलं होतं म्हणून मी नकार देऊनही तिने ऐकलंच नाही. तिने माझं जॅकेट काढलं आणि टी-शर्ट काढण्याचाही ती प्रयत्न करत होती पण मी तिला थांबवलं. ती परत तेच करत होती. तिला वाटलं, मी मुद्दाम तिला छेडतोय म्हणून तिने आधी स्वतःचे कपडे काढले. मी मान फिरवून घेतली पण ती जवळ आली आणि बळजबरी करू लागली. माझा नाईलाज झाला आणि मी पूर्ण ताकदीनिशी तिला दूर ढकलून तिला चापट मारली. ती लगेच भानावर आली; पण माझ्या त्या प्रतिक्रियेचा तिने चुकीचा अर्थ काढला. तिला वाटलं माझ्या आयुष्यात कुणी दुसरी मुलगी आली आहे; म्हणून तिने माझा मोबाईल तपासला. त्यात काहीच संशयास्पद वाटलं नाही. मोस्टली कॉन्टॅक्ट पुरुषांचे होते तर तिला वाटलं मी गे आहे, मी मुद्दाम तिच्या भावनांशी खेळलो, तिला ॲज अ बॅकअप प्लॅन म्हणून युझ करत होतो, असा गैरसमज करून ती तिथून रडतच निघून गेली. लग्नही तिनेच मोडलं मला स्पष्टीकरणाची संधी न देता... मला ती हवी होती माझ्या आयुष्यात, सांगायचं होतं की माझं तिच्यावरच प्रेम आहे आणि मी गे नाही. तिला सांगायचं होतं की मी..." तो बोलता बोलता थांबला आणि त्याने मोठा उसासा घेतला. त्याच्या चेहऱ्यावरून तिला हलकीशी खंत जाणवली.
"तू ॲसेक्शुअल आहेस, हेच सांगायचं होतं ना तिला?" यश्वीने त्याच्याकडे एकटक पाहत विचारले.
"हो, हेच सांगायचं होतं मला की मी ॲसेक्शुअल आहे; पण एक मिनिट, तुला कसं कळलं? ओह! तू गायनॅक आहेस म्हणून?" त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"ॲसेक्शुअल असणं आजार नाही." ती खांदे उडवत म्हणाली.
"मला माहिती आहे पण ही गोष्ट कितीही सुशिक्षित लोक असले तरी सहसा त्यांना कळत नाही; म्हणून मी ॲसेक्शुअल आहे, हे माझ्या सेक्स थेरिपिस्ट आणि मला सोडून कोणालाही माहीत नाही. इव्हन मलाही हृता माझ्या आयुष्यातून गेल्यावर कळलं; पण तू लगेच ओळखलं म्हणून तसं विचारलं." तो त्याची बाजू उकलत म्हणाला.
"ॲक्च्युली काही पेशंट्स येतात या समस्या घेऊन पण गायनॅकलॉजीमध्ये या बाबींचा अभ्यास केला जात नाही." ती म्हणाली.
"अच्छा!" तो आश्चर्याने म्हणाला.
"ह्म्म. चल आता खाली, खूप वेळ झाला आपण बडबडतोय आणि हो, लग्नाला माझाही होकार आहे बरं!" ती झोपाळ्यावरून उठत काहीशी लाजत म्हणाली.
"आता का होकार? अच्छा! मी ॲसेक्शुअल आहे कळल्यावर तुला ज्या गोष्टींची भीती वाटते त्या माझ्याशी लग्न केल्यावर घडणार नाहीत म्हणून निश्चिंत होऊन हा निर्णय घेतलास तर? किती आसुरी बुद्धी आहे तुझी!" तो तिला डिवचत म्हणाला.
"तुझा गैरसमज होतोय, तसं काही नाहीये." ती कपाळावर हात मारत म्हणाली.
"मग कसं आहे?" तो हाताची घडी घालत तिच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाला.
"मीही ॲसेक्शुअल आहे म्हणून मी लग्नाला होकार देतेय." ती उत्तरली, मात्र तो डोळे विस्फारून पाहत राहिला.
"आजपर्यंत मला माझं अस्तित्व, माझ्या फिलिंग्स कशा इतरांना समजवाव्या, ही काळजी वाटायची; म्हणून कधी कोणालाही उघडपणे सांगितलं नाही. एक-दोघांना सांगितलं तर त्यांना वाटलं मी लेस्बियन आहे; म्हणून मी तुझ्याशी खोटंच बोलले की प्रेम, नातं, लग्न वगैरेची मला भीती वाटते. मात्र तुझा भूतकाळ ऐकला नि मला कळलं की, आहे माझ्यासारखं या महाराष्ट्रात कुणीतरी. माझा शोध खरंच संपला, कारण माझंही तुझ्यासारखंच आहे. मलाही हवं हक्काचं कुणीतरी, मलाही सोबत हवी. आपुलकी, प्रेम, जिव्हाळ्याचं नातं हवं. प्रेमळ स्पर्शही हवा; पण ते फक्त मिठी, हातात हात घट्ट पकडणे आणि किस करणे, बस इतकंच... त्यापुढे नाही. रोमान्स आणि प्रेमाची परिभाषा माझ्यासाठी अशा सौम्य स्पर्शाएवढीच मर्यादित आहे. मला लैंगिक आकर्षण, ओढ नाही जाणवत. इतर मैत्रिणींप्रमाणे सुप्त इच्छा किंवा फॅंटसीज नाहीत माझ्या, कारण स्पर्शानेच प्रेम व्यक्त करता येतं असं नाही वाटत मला किंवा नात्यात प्रणय नसेल तर नातं टिकूच शकत नाही, असंही नाही. प्रेम, नातं, लग्न, इंटिमसी हे शारीरिक संबंधापलिकडेही असू शकतात. शिव-पार्वतीसारखी प्लॅटोनिक रिलेशनशिप मलाही अनुभवता यावी, असं वाटतं. देवी पार्वतीला श्राप होता देवी रतीचा; पण शिव-पार्वतीच्या नात्यातलं प्रेम कमी झालं का? नाही ना! मग आजच्या युगात का ते शक्य नाही, असं वाटायचं. माझ्यासाठी जेवढी स्थळे आली त्यापैकी सगळेच पुरुष एका माळेचे मणी असायचे पण तू खरंच तसा नाहीस. तुला कळेल माझं मन, माझ्या भावना, माझ्या प्रेमाची परिभाषा आणि रोमान्सची सीमाही! म्हणूनच मी हा निर्णय घेतला." ती त्याच्या डोळ्यांत बघत बोलत होती आणि तो थक्क होऊन ऐकत होता.
"मग तुला खात्री आहे, तू माझ्यात तुझा जोडीदार पाहू शकशील?" तो तिच्या डोळ्यातले भाव टिपत म्हणाला.
"हो, माझा शोध खरंच संपलाय कारण माझ्या फिलिंग्स तूच समजू शकतो, असं मला वाटतं; पण..." तिने त्याच्याकडे पाहिले आणि शांत झाली.
"पण काय?" त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"तू मुव्ह ऑन केलंयस ना पूर्ण? की अजूनही मनात तीच आहे? हे बघ, तसं असेल तर सांग. माझा नवरा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसाठी आयुष्यभर झुरत राहणारा नको मला... बघत होते मी तुझे एक्सप्रेशन्स, ते सगळं सांगताना किती रेस्टलेस आणि किती खंत होती तुझ्या चेहऱ्यावर... " ती काहीशी रुसून म्हणाली.
तो हलकेच हसून म्हणाला, "अगं ती खंत यासाठी की आमचं नातं मोडलं पण त्यासोबतच मी माझी मैत्रीणही गमावली. याव्यतिरिक्त काही नाही. मी केलंय मुव्ह ऑन. तू आवडलीस म्हणून आलो, नाहीतर कांदेपोहे तर मलाही करता येतात आणि काळजी करू नको, आपलं लग्न झाल्यावर हृता आली ना परत तर मी त्या मालिकांमधल्या नवऱ्यांसारखा नाही वागणार. तन-मन-धनाने फक्त तुझाच असेल मी कायम!"
ती लगेच लाजली पण एक विचार डोकावला आणि ती म्हणाली, "नाही, नको. आपण लग्न नको करायला."
"का? काय झालं अचानक?" त्याने गोंधळून विचारले.
"आपण एकमेकांना समजून घेऊ पण घरी सगळ्यांच्या अपेक्षा असतील आपल्यांकडून. संसाराला एक वर्षही पूर्ण व्हायचं राहील; पण सगळे म्हणतील पाळणा लवकर हलवा वगैरे आणि मला खरंच त्या गोष्टी... म्हणजे लहान मुले आवडतात मला पण त्यासाठी मनाविरुद्ध फिजिकल होणं, आय कान्ट..." तिने तिच्या मनातली घालमेल व्यक्त केली.
"बस एवढंच! माझ्याकडे त्यावर उपाय आहे. आर्टिफिशियल गर्भधारणेविषयी आपण किती ऐकलंय. बरेच जण हे करतात, आपणही करू. जेव्हा घरचे हट्ट करतील तेव्हा..." तो तिला विश्वासात घेत म्हणाला.
"अय्या खरंच! किती हुशार आहेस तू! चेहऱ्यावरून वाटत नाहीस पण आहेस हुशार." ती त्याची फिरकी घेत म्हणाली.
"ह्म्म. कळलं तुमचं मत, आता परवानगी असेल तर चला खाली राणी सरकार!" तो त्याचा हात पुढे करत म्हणाला.
"हो चला, अहो!" तिनेही लाजत त्याच्या हातात हात दिला आणि दोघेही खाली गेले.
खाली सगळे हॉलमध्ये बसले होते. त्यांनी आपापल्या कुटुंबियांना होकार कळवला. ती बातमी ऐकून दोन्ही कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. वडीलधारी माणसे त्यांच्या लग्नाच्या तयारीविषयक चर्चेत गुंतले; पण ते दोघे मात्र त्यांच्या स्वप्नातल्या संसाराची गोष्ट लिहिण्यात रमले.
समाप्त.
©®सेजल पुंजे
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा