सांज कातर कातर, जीवा हुरहूर हुरहूर
तुझ्या एका आठवाने, काया थरथर थरथर
येतो, गेलास सांगून, डोळे ओलसर ओलसर
किती वाट आता पाहू, पापणी थरथर थरथर
कधी येशील सांग ना, मन माझे अधीर अधीर
वाऱ्या, संदेश ने माझा, लावू नको उशीर उशीर
सोबतीने झुललेला , स्वप्नझुला अधर अधर
ओढ जीवाची पाहूनि, निःशब्द ही लहर लहर
स्वप्न आठवता सारे, वेडा जीव कातर कातर
मुखचंद्राच्या दर्शना, खुळे मन चकोर चकोर
तुझ्या विरहात दाटले, अंतरात काहूर काहूर
आस दाटता भेटीची, वेडे मन आतुर आतुर
लक्ष आठव नि येती , अश्रुधारा नंतर नंतर
कसे सांगू रे साजणा, नको आता अंतर अंतर
काय अर्थ रे अर्थाला! जर तुझ्यामाझ्यात अंतर
तुझ्या माझ्या संसाराला, पुरे आता प्रेमाचा मंतर
गेला कधीचा दूरदेशी, प्रिय माझा भ्रतार भ्रतार
तुझ्या भेटीचा सोहळा, मनी वाजे सतार सतार
सुवर्णसाक्षी हा जसा, क्षितिजाला भास्कर भास्कर
स्वप्न तुझ्या सोबतीचे, व्हावे माझे साकार साकार
© स्वाती अमोल मुधोळकर
(अर्थाला = पैशाला )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा