Login

स्वप्नांच्या सावलीत उगवलेला प्रकाश भाग - १

अपयश आलं, पण आदित्य थांबला नाही. स्वतःवर विश्वास ठेवून त्याने यशाचा मार्ग शोधला.
स्वप्नांच्या सावलीत उगवलेला प्रकाश भाग - १


डोंगररांगेच्या कुशीत वसलेलं लहानसं गाव, निंबाळे. या गावात फार काही घडत नसे. सकाळी कोंबड्याचा आरव, दुपारी शेतातली शांतता आणि संध्याकाळी देवळाच्या घंटेचा नाद, एवढंच आयुष्य.

याच गावात राहत होता आदित्य देशमुख. वय फक्त बावीस. डोळ्यांत मोठी स्वप्नं… पण हातात रिकामेपण.
आदित्य हुशार होता, अभ्यासात चांगला होता, पण नशिबानं त्याला लवकरच कठीण धडे शिकवायला सुरुवात केली होती.
वडील, रमेश देशमुख, शेतकरी. आई, सुमन, साधी, शांत, पण मुलासाठी जीव ओवाळून टाकणारी. आदित्य बी.एस्सी. पूर्ण करून शहरात गेला होता. मोठ्या नोकरीचं स्वप्न घेऊन.

गावात सगळ्यांना वाटायचं, “हा मुलगा काहीतरी मोठं करणार.” पण शहरानं त्याचं स्वागत अपयशानं केलं.
एक नोकरी… मग दुसरी… मग तिसरी… प्रत्येक वेळी उत्तर तेच, “आम्ही तुम्हाला कळवू.” पण कुठलाच फोन आला नाही.

महिन्यांचे महिने गेले. पैसे संपले. स्वप्नंही थकली.
एक दिवस शेवटी आदित्य गावात परत आला.
बसस्टँडवर उतरतानाच त्याच्या पावलांत ओझं होतं.
डोळ्यांत अपराधीपणा.

आईने त्याला पाहिलं आणि काहीही न विचारता मिठीत घेतलं. “थकलास का रे?” एवढंच विचारलं. त्या एका वाक्यानं आदित्यचा बांध फुटला. “आई… मी हरलोय,” तो म्हणाला. आई हसली. “हरणं म्हणजे थांबणं नसतं, बाळा.” पण आदित्यला ते ऐकायचंच नव्हतं. गावात परतल्यावर त्याचं आयुष्य आणखी कठीण झालं.

लोकांचे प्रश्न… टोमणे… “काय रे, शहरातून काहीच नाही मिळालं?” “इतकं शिकूनही शेतीच करणार?” तो हसून टाळायचा, पण आतून तुटत गेला. एक संध्याकाळी, तो शेतात बसून माती हातात घेऊन विचार करत होता, “मी नेमकं कुठे चुकलो?” तेवढ्यात त्याला आवाज आला,
“मातीला दोष देऊ नकोस.”

तो वळला. समोर उभा होता भाऊराव पाटील, गावातला सर्वात वृद्ध माणूस. लोक त्यांना “गावाचा शहाणा” म्हणायचे. “माती तुझ्या हातात आहे, आदित्या,” भाऊराव म्हणाले. “पण तू तिला ओळखायला नकार दिलास.”
आदित्य हसला, कटू हसू. “आता काय उपयोग?”
भाऊराव जमिनीवर बसले.

“उपयोग हा शेवटी दिसतो. सुरुवातीला नाही.” त्या दिवशी पहिल्यांदा कुणीतरी आदित्यशी टोमण्याविना बोललं.
भाऊरावांनी त्याला आपली गोष्ट सांगितली, ते कधी काळी शहरात मोठ्या नोकरीवर होते. अपघातात सगळं गेलं. गावात परत आले. लोक हसले. पण त्यांनी शेतीत नवे प्रयोग केले.

आज संपूर्ण गाव त्यांच्यावर अवलंबून होतं. “अपयश तुला संपवत नाही,” भाऊराव म्हणाले. “ते तुला नव्यानं घडवतं.” त्या रात्री आदित्यला झोप लागली नाही.
पहिल्यांदा त्याला वाटलं, कदाचित मी पळालो नाही, तर लढू शकतो.

पुढच्या दिवशी त्यानं एक निर्णय घेतला. तो पुन्हा शहरात जाणार नव्हता. तो इथेच काहीतरी करणार होता. पण “काय” हे त्यालाच माहीत नव्हतं. त्याने शेतात काम सुरू केलं, आई-वडिलांसोबत. सूर्य उगवायच्या आधी उठणं,
घाम गाळणं, हाताला फोड.

पहिल्या आठवड्यातच त्याचे हात दुखू लागले. मनात विचार आला, मी हे आयुष्य झेपवू शकतो का? तेवढ्यात आईचा आवाज आला, “थोडं सहन कर. सुरुवातीला सगळंच अवघड असतं.” आदित्यला जाणवलं, आईचं आयुष्यही असंच अवघड गेलं होतं.

पण ती कधी तक्रार करत नव्हती. हळूहळू आदित्यने शेतीकडे वेगळ्या नजरेनं पाहायला सुरुवात केली. तो इंटरनेटवर नवीन पद्धती वाचू लागला. सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, थेट विक्री. गावात लोक हसले. “मोबाईलवर शेती शिकतोय!” “याला काय कळणार?”

पण तो थांबला नाही. पहिल्यांदा अपयश आलं. पिक खराब झालं. तोटा झाला. त्या रात्री आदित्य पुन्हा शेतात बसून रडला. तेवढ्यात भाऊराव पुन्हा आले. “रडलास तर पाणी वाढेल,” ते हसून म्हणाले. “पण पीक उगवायला वेळ लागतो.”

आदित्य शांत झाला. त्याला जाणवलं, ही लढाई बाहेरची नाही. ती आतली आहे आणि तो लढायला तयार होत होता. पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती… जी त्याच्या विश्वासाला हादरवणार होती.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all