Login

स्वप्नपूर्ती भाग २

Dream Of Making Home

स्वप्नपूर्ती भाग २

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, नवीनच लग्न झालेल्या शमा आणि राघवने घर घ्यायचे ठरवले होते. आता पुढे....
त्यानंतरच्या दर रविवारी दोघेही साईट पहाण्यासाठी जात होते. तेव्हा नुकत्याच वाईत जुने वाडे पाडून नव्या इमारती उभ्या राहू लागल्या होत्या. अनेक अपार्टमेंटमध्ये जाऊन त्यांनी पाहिले, पण दोघांनाही ते पसंत पडत नव्हते. दोघांनाही गावी ऐसपैस घरात रहायची सवय होती. त्यामुळे इथे फ्लॅट सिस्टीमची घरे पहातानाच त्यांना नकोसे वाटत असे.


त्यामुळे त्यांनी एक दोन गुंठे जागा विकत घ्यायचे ठरवले. आधी जागा घेऊ, जमेल तेव्हा घर बा़ंधू असा विचार केला. आता शहरालगत जागा घेण्याची सोय उरली नव्हती. त्या जागा बिल्डर्सनी काबीज केल्या होत्या. त्यामुळे शहरापासून थोडेसे लांब जाऊन त्यांनी जागेचा शोध घेतला. त्यांना हवी तशी जागा मिळाली तसे पटकन त्यांनी जागेचा व्यवहार करुन टाकला. यात शमाचीच खूप गडबड चालली होती. न जाणो राघवचे मत बदलले तर....अशी भीती तिला वाटत होती.


जागा घेतली आणि शमा त्या जागेच्या प्रेमातच पडली. आपण त्या जागेत घर बांधले आहे आणि आपण तिथे रहायला गेलो आहोत अशी स्वप्ने तिला पडू लागली. लवकरात लवकर घर बांधण्यासाठी काय करावे लागेल याच्या विचारातच ती कायम गढून गेलेली असायची. त्यामुळे तिला आता सार्वजनिक नळावरुन पाणी भरण्याचा त्रास वाटेनासा झाला. आता हे काही दिवसांसाठीच आहे अशी तिच्या मनाची समजूत झाली होती.



तिने आपल्या पगाराचे काटेकोर नियोजन केले.
पगार आल्यावर पहिल्यांदा घरासाठी बचत करायची. उरलेल्यातून संसारोपयोगी वस्तू घ्यायच्या असे तिने ठरवले.
शमा स्वतःच्या हौशी, नव्या साड्या, दागिन्यांची इच्छा दाबायची. खरे तर नवीन लग्न झाले होते तिचे. तिच्या मैत्रिणी म्हणायच्या,

"शमा, तू तर फार काटकसरी झालीस. सणावारालाही काही खरेदी करत नाहीस. असे का?"
ती फक्त हसून म्हणायची,

"अगं, आता घर घेण्याचा विचार आहे. त्यामुळे या बाकीच्या गोष्टींसाठी थोडे थांबते. नवीन साड्या, दागिने घेतले नाहीत तर फारसा फरक पडणार नाही. घर होणे महत्वाचे."

नोकरी करणाऱ्या बायका धुणीभांडी करण्यासाठी बाई लावत. शमाने मात्र काटकसर करून तेही पैसे वाचवले. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी ती सगळे काम स्वतः आवरुन जात असे. भाजी घेताना सुद्धा ती फार विचारपूर्वक भाजी खरेदी करत असे. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी भाजी जरा स्वस्त मिळते म्हणून ती बाजार समितीच्या आवारात भाजी घेण्यासाठी जात असे. कांदे, बटाटे, लसूण तिथूनच घाऊक प्रमाणात आणत असे. रोज रात्री पै न पै चा हिशोब ती करत असे.

जागा घेतल्यावर एक वर्षाने तिने राघवच्या मागे टुमणे लावले.
" आपण घराचे बांधकाम सुरू करुयात."

"अगं, एवढे पैसे कुठून आणायचे? घर बांधणे सोपे आहे का? उगाच म्हणत नाहीत, लग्न पहावे करुन, विहिरी बघावी खणून आणि घर पहावे बांधून.... खूप खर्च येतो."

"एक काम करुयात. एखाद्या सिव्हिल इंजिनिअरकडून खर्चाचा अंदाज घेऊयात. घर जमेल तसे बांधूयात. आधी एक रुम आणि संडास बाथरुम बांधूयात. सध्या तरी आपण दोघेच तिथे रहाणार आहोत. मग जमेल तसे बाकीचे घर वाढवूयात." शमा म्हणाली.

हो नाही करता करता राघव तयार झाला. जागा दाखवून दोघातिघांकडून प्लॅन काढून घेतला. त्यापैकी जो प्लॅन आवडला त्याबाबत इंजिनिअरशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. आपली पैशांची अडचण ही सांगितली.

यावर इंजिनिअरने त्यांच्यापुढे पर्याय ठेवला.
"तुम्ही बॅंकेकडून गृहकर्ज का घेत नाही? जास्त वर्षांसाठी गृहकर्ज घेतले तर हप्ता कमी बसतो. सगळेजण सर्रासपणे कर्ज घेतात."
राघव कर्ज घ्यायला अजिबात तयार नव्हता. "त्यापेक्षा जागा कुठे पळून जात नाही. रिटायरमेंट नंतर जे पैसे मिळतील त्यातून आपण घर बांधू" असे राघवचे म्हणणे होते.
शमाने सगळे कॅल्क्युलेशन करुन त्याला पटवून दिले की, "गृहकर्ज घेणे तोट्याचे नाही.
तसेच जरी आपल्याला हप्त्यापोटी जास्त पैसे भरावे लागले तरीही पैसे साठवून घर घ्यायचे म्हंटले तर आपले अख्खे आयुष्य भाड्याच्या घरात जाईल. त्यामुळे हा पर्याय निवडणे योग्य आहे."

हा पर्याय राघवला पटतो का? तो यासाठी तयार होतो की रिटायरमेंट नंतर घर बांधायचा आपला हेका कायम ठेवतो? हे पाहूया पुढील भागात..
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.


0

🎭 Series Post

View all