Login

स्वप्नपूर्ती भाग ३

Dream Of Making Home

स्वप्नपूर्ती भाग ३


©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, इंजिनिअरने गृहकर्ज घेण्याचा पर्याय सुचवला होता. शमाची तयारी होती, पण राघव तयार नव्हता. आता पुढे...

शमाने वारंवार सांगूनही राघव ऐकायला तयार नव्हता. यावर मग शमाने एक पर्याय सुचवला. तिच्याकडे सासर माहेरचे मिळून जवळपास वीस तोळे सोने होते.
" एवढे सोने तर मी काही वापरत नाही. यापैकी हातात दोन बांगड्या आणि मंगळसूत्र ठेवून बाकी सोने आपण गहाण ठेवूयात आणि जसे आपल्याकडे पैसे येतील तसे सोडवूयात." हे ऐकल्यावर तर राघव चिडलाच.
"तुझे दागिने गहाण ठेवायचे? तुझ्या मनात हा विचार आलाच कसा?"

हा राघवचा त्रागा पाहून शमा शांत बसली. तिची घरासाठी चाललेली तगमग राघवच्या लक्षात आली. त्याने गृहकर्ज काढण्याबाबत अधिक चौकशी केली. त्यानंतर स्वतःच्या पीएफ वर थोडे कर्ज काढले. वडीलांना सांगून गावाला शेतीसाठी असलेल्या सोसायटीतून थोडे कर्ज उचलले. घराचे काम सुरू झाले...

शमाला खूप आनंद झाला. ती रोज शाळेत जाण्यापूर्वी व शाळेतून येताना बांधकामाकडे चक्कर मारत असे. तसे ते दूर होते, पण आपले घर या भावनेने तिला चालत जाताना ते दूर वाटायचेच नाही. दोनवेळा गेल्यावर ती बांधकामावर पाणी मारत असे. पाणी मारायला गडी ठेवण्याचे पैसे तिने वाचवले. तसे ते खूप नव्हतेच, पण तेवढे तरी का घालवा असा विचार तिने केला व हट्टाने राघवला गडी ठेवू दिला नाही.


दीड वर्षानंतर अखेर घर पूर्ण झाले. घराच्या किल्ल्या हातात आल्या.
राघव हसत म्हणाला,
"शमा, बघ, आपले घर झाले एकदाचे. आपण यशस्वी झालो."
शमा काही न बोलता आपुलकीने घराच्या भिंतींवरुन हळुवारपणे हात फिरवत होती, जणू प्रत्येक विटेत तिचं अस्तित्व तिला जाणवत होते.


घर सजले होते...फुलांची आरास, रांगोळी, समईच्या प्रकाशात देवघर उजळून निघाले होते.
सकाळपासून शमा धावपळ करत होती. पुजाविधीसाठी पाणी आणणे, पाहुण्यांसाठी जेवण मांडणे, सगळे तिच्या खांद्यावर होते. तिला क्षणभरही उसंत नव्हती, तरीही ती अजिबात दमली नव्हती.

वास्तूशांतीसाठी आलेल्या जावा, नणंदा म्हणाल्या,
"शमा वहिनी, किती सुंदर सजवलंय घर ! खूप छान दिसतंय."
शमा समाधानाने हसली.

तिचे आईबाबा आले होते. आईच्या डोळ्यांत अश्रू होते. ती शमाला जवळ घेत म्हणाली,
"बाळा, तू घरटं बांधण्याचे पाहिलेले स्वप्न आज खरे झाले. तुमच्या दोघांची जिद्द पाहून समाधान वाटले."

बाबा फक्त शांत उभे राहिले. मुलीच्या त्यागाची त्यांना जाणीव होती.


पुजाविधी संपल्यावर आलेले पाहुणे घर पाहून कौतुक करू लागले.
"वा राघव, एवढं सुंदर घर घेतलंस!"
"खरंच, राघवने काय पराक्रम केला आहे! एवढ्या कमी वयात घर बांधणे सोपे नाही."

घर बांधण्याचे सगळे श्रेय राघवला दिले जात होते. शमा शांतपणे बाजूला उभी होती. तिच्या स्वप्नातले घरकुल आज तयार झाले होते. तिच्यासाठी आजचा दिवस सोन्याहून पिवळा होता. याचे श्रेय कुणाला मिळतेय, कुणी कष्ट घेतले या गोष्टी तिच्यासाठी दुय्यम होत्या.

पण त्याच वेळी राघव उभा राहिला.

तो म्हणाला,
"तुम्ही सगळे माझं कौतुक करत आहात, पण खरं सांगू , केवळ शमाच्या हट्टामुळे हे घर झाले आहे. हे स्वप्न साकार करण्यामागे खरी ताकद आहे शमा. मला हे स्वप्न बघणे शक्यच नव्हते.

तिने तिची प्रत्येक हौस बाजूला ठेवली, पै न पै वाचवली. वेळप्रसंगी माझा राग सहन केला. हे घर तिच्या त्यागाचं प्रतीक आहे. ती या घरासाठी जेवढी राबली आहे तेवढे तर मलाही जमले नसते. सकाळ संध्याकाळ पाणी मारायला ती दोन किलोमीटर अंतर चालत यायची.
जर हे घर कोणाचं असेल, तर ते शमाचं आहे."

क्षणभर हॉलमध्ये शांतता पसरली. नंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
सगळ्या नजरा शमाकडे वळल्या. तिच्या डोळ्यांतलं पाणी आता अभिमानाने चमकत होते.


नणंदेने पुढे येऊन शमाचा हात धरला.
"खरंच वहिनी, तुम्ही ग्रेट आहात. आजकाल स्त्रिया स्वतःचा आधी विचार करतात. तुम्ही घरासाठी जो त्याग केलात तो खरंच प्रशंसनीय आहे."

सासुबाई म्हणाल्या,
"शमा, तू सगळ्यांसाठी आदर्श आहेस. एवढ्या शांतपणे एवढं मोठं स्वप्न साकार करणं सोपं नाही."

शमाच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आले, पण आता ते आनंदाचे होते.


दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये सगळीकडे फक्त एकच चर्चा...राघव-शमा यांचे घर.
तिच्या सोबतच्या शिक्षिका शमाला म्हणाल्या,
"शमा, तुझा नवरा तर सगळ्यांसमोर तुझा त्याग मान्य करतोय. खरंच, तू खूप भाग्यवान आहेस."
शमा हलकेच हसली,
"भाग्यवान तर आहेच मी, मी फक्त घरटं बांधलंय. त्यात राघव माझ्या पाठीशी उभे आहेत, हेच खरे समाधान आहे."


त्या रात्री शमा आपल्या घराच्या बाल्कनीत उभी होती. चंद्रप्रकाशात घर उजळून निघाले होते, पण त्यापेक्षाही शमाचा चेहरा चमकत होता.
राघव तिच्याजवळ आला. तिचा चेहरा स्वतः कडे वळत तो तिच्या डोळ्यांत पहात म्हणाला,

"आज खुश आहेस ना?"

शमा म्हणाली,
"खूप... तुम्ही माझा त्याग सर्वांसमोर सांगितलात, पण घर बांधायला तुम्ही ही पैसे जमा केले होते. मला कुणाचे कौतुक नको होते. तुम्ही माझे ऐकले आणि घर बांधायला तयार झालात हेच माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. आता यानंतर मी तुमच्याकडे कसलाच हट्ट करणार नाही."

राघवने तिचा हात घट्ट धरला.
"शमा, तू आहेस म्हणून हे घरटे उभे झाले आहे. तुझ्याविना मी काहीच करु शकलो नसतो."


त्या घराच्या चार भिंतींमध्ये आता फक्त रंग आणि सजावट नव्हती, तर प्रेम, त्याग, विश्वास आणि एकमेकांच्या अस्तित्वाची जाण होती.

ते घर फक्त घर नव्हतं, ते होतं घरटं...चिमण्यांनी काडी काडी जमवून बांधलेले !
समाप्त.©® सौ.हेमा पाटील.


0

🎭 Series Post

View all