Login

स्वप्नभूल.. भाग ७

स्वप्नभूल.. कथा एका रहस्याची..
स्वप्नभूल - भाग ७
© शिवप्रिया

आता मात्र नंदिनीची पाचावर धारण बसली. तिने घाबरत बोलायला सुरुवात केली.

“मी.. मी नंदिनी.. नंदिनी सयाजीराव कोंडे देशमुख.. कोल्हापूरहून आलेय.”

“अरे व्वा! कोल्हापूरहून आलीयेस का? बरं.. छान.. छान.. चला मग सांगा फ्रेंड्स, कोल्हापूरची फेमस गोष्ट काय आहे?”

त्या टोळीमधल्या म्होरक्याने प्रश्न केला.

“कोल्हापूरची लवंगी मिरची आणि कोल्हापुरी चप्पल..”

त्याने प्रश्न विचारताच त्यातल्या एका मुलीने उत्तर दिलं.

“मग कोल्हापूरची शान असलेली कोल्हापूरी चप्पल तू तुझ्या पायातून काढायची आणि डोक्यावर घेऊन आपल्या वर्गापर्यंत चालत जायचं. समजलं? हीच तुझी आजची परेड.. उद्याच उद्या बघू.. चला लागा कामाला..”

त्या म्होरक्याने नंदिनीकडे पाहून जणू आदेशच दिला होता. नंदिनीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पण अचानक नंदिनीला अस्वस्थ वाटू लागलं. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते. अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटू लागला. तिचं डोकं जड होऊ लागलं. अंगाला दरदरून घाम फुटू लागला. वातावरणात एक विचित्र उदासीनता जाणवू लागली. आणि पुन्हा तिला त्या अस्पष्ट आकृत्या दिसू लागल्या. समोर जमलेल्या मुलांच्या घोळक्यात तिला त्या बायकांचे अस्पष्ट चेहरे दिसू लागले. मोठमोठ्याने हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. नंदिनीने दोन्ही हात आपल्या कानावर ठेवले आणि ती त्या जोरजोरात येणारा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू लागली. पण त्या आवाजाचा ध्वनी वाढतच चालला होता. पुन्हा एक अंधुकशी आकृती एका स्त्रीला खेचून नेताना नंदिनीला दिसू लागली. इतक्यात तो म्होरक्या पुन्हा गरजला,

“चला मॅडम, लागा कामाला.. चप्पल डोक्यावर घेऊन परेड करत वर्गात जा.. नाहीतर…”

त्याच्या दरडावण्याने नंदिनी भानावर आली. हळूहळू डोकं दुखण्याचं कमी होऊ लागलं. तिने सावकाश डोळे उघडले. समोर त्याच मुलांचा घोळका तिच्याकडे पाहून हसत होता. तिच्या मनात नाना प्रश्न उभे राहिले होते.

“अरे बापरे! आपण इथे कशासाठी आलोय आणि हे काय चाललंय? मी अशा वातावरणात, यांच्या संगतीत कशी राहणार? आता मला कोण वाचवायला येईल? यातून माझी कशी सुटका होईल?”

नंदिनी प्रचंड घाबरली होती. अनोळखी शहरात, अनोळखी लोकांत ती आता पुरती अडकली होती. कायम आईवडिलांच्या छत्रछायेखाली वाढलेली, गावात भाऊ समरजीतची जरब इतकी होती की, कोणी तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नव्हतं. आता नंदिनीला तिच्या भावाची प्रचंड आठवण येत होती. काय करावं तिला समजत नव्हतं. पण त्यांनी सांगितलेलं करण्याशिवाय गत्यंतरही नव्हतं. डोळ्यातलं पाणी थांबण्याचं नाव घेत नव्हतं. भीतीने हृदयाची धडधड वाढली होती. आणि आता त्या मुलांनी आकडे मोजायला सुरवात केली होती. दहा आकडे मोजून होण्याच्या आत तिला तिच्या पायातली चप्पल काढून डोक्यावर घ्यायची होती. आता नंदिनीचा नाईलाज झाला आणि तिने पायातली चप्पल काढली. खाली वाकून तिने पायातून काढलेली चप्पल हातात घेतली आणि ती चप्पल उचलून डोक्यावर ठेवणार इतक्यात मागच्या बाजूने आवाज आला.

“थांब.. काय करतेस हे?”

नंदिनीसह सर्वांचीच नजर त्या आवाजाच्या दिशेने वळाली. समोरून एक उंचपुरा, गव्हाळ रंगाचा मुलगा चालत त्या घोळक्याच्या दिशेने येत होता. त्याने अंगात लाईट ब्लू कलरची जीन्स आणि काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला होता. वाऱ्याने उडणाऱ्या मानेवर रूळणाऱ्या त्याच्या सिल्की केसातून हात फिरवत तो पुढे येत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. व्यायामाने कमावलेलं त्याचे बळकट बाहू आणि ओठांवर मिशीची महिरप त्याला शोभून दिसत होती.

“राजा, सोड तिला.. तिच्यासोबत असं वागू नकोस.. नाहीतर…”

तो जोरात गरजला.

“नाहीतर काय? काय करशील? हे बघ युवी.. मी तुझ्या नादाला लागत नाही, तसं तूही माझ्या भानगडीत पडू नकोस. हे आमचं दरवर्षीचं आहे.. तुला त्यात पडायची गरज नाही. मुकाट्याने इथून निघून जा..”

त्या टोळीचा म्होरक्या म्हणजेच राजा गरजला.

“मला तुझ्या भानगडीत पडायची हौस नाही; पण तू जे करतोयस, ते फार चुकीचं आहे. कॉलेजमध्ये जुनियर्सचं असं रॅगिंग करणं कायद्याने गुन्हा आहे. हे थांबव सगळं नाहीतर मी प्राचार्यांकडे तुझी तक्रार करेन. समजलं?”

राजा छद्मी हसला.

“तू माझी कम्प्लेंट करणार? जा कर जा.. कोणी माझं काही वाकडं करू शकणार नाही. विसरलास काय माझा बाप कोण आहे ते? या कॉलेजचे ट्रस्टी आहेत. तुझी कुठे उचलबांगडी करतील ना की, ते तुलाही कळायचं नाही. आणि हिची रॅगिंग केली तर तुला काय फरक पडतो रे? कोण लागते तुझी ती?”


त्याच्या खोचक प्रश्नावर युवराजने राजाकडे पाहिलं आणि एकदा नंदिनीकडे पाहिलं आणि तो म्हणाला,

“मी तिला ओळखतो. माझी खूप जवळची मैत्रीण आहे. आमच्या नात्यातलीच आहे. ती माझ्याचकडे येत होती पण तुम्ही तिचा रस्ता मध्येच अडवलात. सो राजा, तू तिला सोड.. नाहीतर मी तुला माझा चांगलाच इंगा दाखवेन. बघायचाय का?”

डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट चोळत युवराज म्हणाला तसा राजाही त्याच्या अंगावर धावून गेला आणि सोबतीला त्याचे मित्रही धावत युवराजवर चाल करून आले.

“तुझा इंगा उघड्या डोळ्यांनी बघायला आम्ही काय पोरींसारखं हातात बांगड्या भरल्या नाही. चल होऊन जाऊ दे दोन हात!“

असं म्हणत राजाने दोन हात करण्याचा पवित्रा घेतला. तो युवराजच्या अंगावर धावून जाऊ लागला. आता त्यांच्यात हाणामारी होण्याची शक्यता दिसतच होती की, समोरून त्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ.अभ्यंकर येताना दिसले. मुलांचा घोळका पाहून ते जागीच थांबले.

“काय गडबड सुरू आहे? सर्वजण का जमले आहात? चला आपापल्या वर्गात जा.. राजा, तुझं सुरू झालं का? अरे कॉलेज सुरू तरी होऊ दे..”

त्यांनी करड्या स्वरात विचारलं तसं राजा आणि युवराज शांत झाले. काहीच घडलं नाही अशा अविर्भावात वावरू लागले.

“काही नाही सर.. कुठे काय? आम्ही जुनियर्सना त्यांचा क्लासरूम शोधण्यात मदत करत होतो. बाकी काही नाही.”

राजाने उत्तर दिलं.

“बरं, बरं.. ठीक आहे. चला आपापल्या वर्गात जाऊन बसा.. गो टू युवर क्लास..”

अभ्यंकरसर दटावून म्हणाले तसं सर्व मुलं तिथून पांगली आणि आपापल्या वर्गाच्या दिशेने जाऊ लागली. राजाने जाताना वळून युवराजकडे रागाने पाहिलं आणि त्याला खुन्नस देत तो तिथून जाऊ लागला. जणू काही ‘पाहून घेईन तुला’ अशी त्याची देहबोली सांगत होती. युवराज नंदिनीजवळ आला.

“हॅलो, मी युवराज सुभेदार.. सेकंड ईयर बीजी..”

त्याने हसून हात पुढे केला. मग नंदिनीनेही फार आढेवेढे न घेता त्याच्या हातात हात मिळवला आणि म्हणाली,

“हाय, मी नंदिनी कोंडे देशमुख.फर्स्ट ईयर बीजी.. माझा वर्ग मला सापडत नाहीये. तूम्ही सांगू शकाल?”

“तुम्ही? काय म्हणालीस? तुम्ही..”

युवराज मोठमोठ्याने हसू लागला. ती मात्र आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.

“असा काय हा वेड्यासारखा हसत सुटलाय?”

ती स्वतःशीच पुटपुटली.

“अगं, आपण कॉलेजमध्ये आहोत. इतकी फॉर्मल काय होतेस? अहो जावो वैगरे.. सरळ युवराज म्हण.. अरेतुरे केलं तरी चालेल.”

तो पून्हा दिलखुलासपणे हसला तसं तिनेही हसून त्याला प्रतिसाद दिला. इतक्यात त्याच्या पाठीवर कोणतरी थाप मारली.

“हाय युवी..”

त्याने मागे वळून पाहिलं. शाल्मली आणि शेखर मागे उभे होते.

“अरे हाय, कसे आहात? आणि कधी आलात तुम्ही? मी तुम्हाला कधीचा शोधत होतो.”

शेखर आणि शाल्मलीला पाहून युवराजला आनंद झाला होता.

“तेच तुझी ती हिरोगिरी सुरू होती ना तेंव्हाच आलो आम्ही. राजा बरोबर एकदम युद्धालाच उतरला होतास.. बाय द वे, मला सांग हिला कसा ओळखतो? खरंच तुझ्या ओळखीची आहे?”

शेखर मिश्किलपणे म्हणाला.

“नाही.. हिला मी पहिल्यांदाच पाहतोय. मी अशीच राजाला थाप मारली होती.”

युवराज डोळे मिचकावत म्हणाला. ते ऐकून सर्वजण मोठ्याने हसले. युवराज शेखर आणि शाल्मलीकडे पाहून म्हणाला,

“एनी वे, मी तुमची ओळख करून देतो. ही नंदिनी कोंडे देशमुख.. जर्नलिझमच्या पहिल्या वर्षासाठी नवीन ऍडमिशन. आणि नंदिनी, हा माझा मित्र शेखर आणि शाल्मली.. माझ्याच वर्गात आहे. प्रचंड हुशार मुलं आहेत ही.. आतापासूनच त्यांना मोठमोठ्या न्यूज चॅनलकडून ऑफर्स येताहेत..”


पुढे काय होईल? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©शिवप्रिया

0

🎭 Series Post

View all