Login

स्वप्नसखा _ भाग १

आधी अलिप्त असणारा तरुण नायिकेचा स्वप्नसखा होतो
स्वप्नसखा _ भाग १

एका अपरिचित तरुणाने श्रीकांत सानेंच्या दारावर टकटक करत परवानगी घेत विचारले,

"मी आत येऊ का?"

उन्हाळ्यातील रविवार, सकाळचे अकराच वाजले होते. तरीही अगदी रणरणीत ऊन जाणवत होतं. इतक्या उन्हात ह्या तरुणाचे माझ्याकडे काय बरं काम असेल! श्रीकांतने क्षणभर विस्मयाने त्याच्याकडे पाहिलं. लगेचच भानावर येत तो म्हणाला,

"हो या ना. या बसा." सोफ्याकडे निर्देश करत त्याने म्हटलं आणि स्वयंपाक घरच्या दिशेने पाहत तो म्हणाला,

"सरिता जरा पाणी आण गं "

त्या तरुणाला पाण्याची नितांत गरज होती. बहुदा तो बाहेरगावरून थेट त्यांच्याकडेच आला असावा.
त्याने एका घोटात पाणी संपवलं आणि कृतज्ञतापूर्वक सरिता कडे म्हणजेच श्रीकांतच्या पत्नीकडे पाहिलं.

"बोला आपलं काय काम आहे? मी ओळखलं नाही तुम्हाला." तो तरुण चांगला उंचापुरा आणि दिसायला देखणा होता. सावळा तजेलदार वर्ण, बोलके डोळे,भव्य कपाळावर भांग पडलेले नागमोडी वळणाचे केस त्याला शोभून दिसत होते. प्रथमदर्शनी तरी तो चांगल्या घरातला दिसत होता. स्वतःची ओळख करून देत तो म्हणाला,

"नमस्कार, माझे नाव शेखर राजे. मी ह्या गावातील एका सरकारी बँकेत अधिकारी पदावर उद्यापासून रुजू होणार आहे. मी मूळचा नाशिकचा आहे. मी आजच ह्या गावात आलो आहे. उतरल्यावर राहण्यासाठी जागेची चौकशी केली तेव्हा एका सद्गृहस्थाने तुमचं नाव आणि पत्ता दिला. मला असं कळलं की तुम्हाला तुमची एक खोली भाड्याने द्यावयाची आहे."

हे ऐकताच श्रीकांतच्या लक्षात आलं की त्याने घराबाहेर `खोली भाड्याने देणे` आहे असा बोर्ड लावला आहे. खरं तर बोर्ड लावून दोन महिने होऊन गेले होते आणि कोणी त्या संदर्भात चौकशी केली नव्हती त्यामुळे श्रीकांत ते विसरूनच गेला होता. तसं एकदोघानी चौकशी केली होती पण श्रीकांतला ते योग्य वाटले नाहीत. तो लगेच शेखरला म्हणाला,

"आम्हाला ही खोली एखाद्या वयस्कर पुरुषाला अथवा स्त्रीला द्यायची आहे. तरुणाला खोली द्यावी असं माझ्या पत्नीला वाटत नाही."

"हे बघा मी तुम्हाला शब्द देतो की माझ्याकडून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. मी तुमच्या नियमांप्रमाणे वागेन. एक तर मी बराच वेळ बँकेत असेन आणि तुम्ही सांगाल तेंव्हढ भाडं मी देऊ शकेन कारण भाडं मला आमच्या बँकेकडून मिळणारं आहे. मी चांगल्या घरातील मुलगा आहे. नाशिकला माझे आईबाबा आणि एक लहान भाऊ आहे. बाबा सरकारी कार्यालयात उच्च पदावर कार्यरत आहेत आणि माझी आई शाळेत शिक्षिका आहे. माझ्याकडे माझ्या बँकेचं आयकार्ड, पॅनकार्ड आणि इतर जरुरी असणारी सर्व डॉक्युमेंट आहेत." शेखरने होता होईल तेव्हढी आपली जमेची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला.

"तुमचं म्हणणं ठीक आहे पण आमच्या घरात आम्ही दोघं आणि आमची तरुण मुलगी आहे. त्यामुळे तिला पण अवघडल्यासारखं होईल. आमची दुसरी लग्न झालेली मुलगी जी इथे गावातच राहते ती सुद्धा अधूनमधून राहायला येते. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही तुमची सोय दुसरीकडे केली तर बरं होईल."

शेखरला बँकेत जाण्यायेण्यासाठी हे घर खूप सोयीचं होतं. तो चालत जाऊ येऊ शकत होता त्यामुळे त्याचा वेळ वाचला असता. पुन्हा एकदा प्रयत्न करण्याच्या हेतूने भावनिक साद घालत तो म्हणाला,

"काका मी खूप आशेने तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही नाही म्हणू नका. हे घर मला खूप सोयीचं होईल. हवं तर तुम्ही मला सुरुवातीला एक महिन्यासाठी खोली भाड्याने द्या आणि नंतर माझं वास्तव्य तुम्हाला त्रासदायक वाटलं तर मी ही खोली खाली करेन.'

शेखरच्या लाघवी बोलण्यामुळे श्रीकांत द्विधा मनःस्थितीत सापडला. शेवटी त्याने सरिताशी सल्लामसलत करायचं ठरवलं.

"ठीक आहे तुम्ही थोडा वेळ बसा. मी माझ्या पत्नीशी बोलून बघतो."

श्रीकांत आत गेला आणि शेखर बसल्या बसल्या घराचे निरीक्षण करू लागला. त्याची नजर सर्वप्रथम पुस्तकांच्या कपाटावर स्थिरावली. कपाटभर पुस्तकं नीट रचून ठेवली होती. ती रचताना सुद्धा प्रत्येक पुस्तकाचे नाव नीट दिसेल अशी ठेवली होती. त्याला वाचनाची प्रचंड आवड होती. त्यामुळे तो खुश झाला. घर छान टापटीप ठेवलं होतं. श्रीकांतने आत जाऊन सरिताला सर्व सांगितलं. तिने पाणी देताना शेखरला ओझरते पहिले होते. आता त्याला नीट निरखून पाहण्याच्या उद्देशाने बाहेर डोकावून पाहिलं.

(श्रीकांत आणि सरिता शेखरला राहण्यासाठी खोली भाड्याने देतील की नाही पाहूया पुढील भागात)