स्वप्नसखा _ भाग ३
आईच्या आठवणीने शेखरला जाणवले की आपण इथे सुखरूप आलोय आणि आपली व्यवस्थित सोय झाली आहे हे घरी कळवलं पाहिजे. दुपारचं जेवण झाल्यावर पाच वाजताच तो तयार होऊन बाहेर आला.
"काका इथे जवळपास पब्लिक फोन कुठे आहे. मला घरी फोन करायचा आहे."
"बाहेर पडल्यावर लगेचच पानपट्टीचे दुकान आहे. तिथे फोन आहे."
सर्वप्रथम त्याने घरी फोन केला. आईला किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. त्याने आईला नियमित पत्र लिहिण्याचं कबूल करून फोन ठेवला. त्याने आजूबाजूला कायकाय आहे सर्व पाहून ठेवलं. तो बँकेपर्यंत जाऊन आला. त्याच्या गतीने तो दहा मिनिटात पोहोचू शकत होता. येताना तो असाच मध्ये खायला म्हणून काही सुका खाऊ घेऊन आला. त्यातली दोन पाकीट त्याने काकूंच्या हातात दिली.
"अरे हे कशाला आणलंस."
"असू दे असंच तोंडात टाकायला बरं."
दुसऱ्या दिवशी तयार होऊन बँकेत जायला निघाला तेव्हा अंजू तिथेच उभी होती. ती त्याच्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर शेखर लगेच बाहेर पडला. तो लवकरच बँकेत गेला. ही ब्रँच फार मोठी नव्हती. मॅनेजर धरून सात माणसं होती. त्यात एक विवाहित महिला कर्मचारी होती. सर्व स्टाफशी ओळख झाल्यावर त्याने कामाला सुरुवात केली. त्या वेळी सर्व काम लेजर मध्ये नोंदी करून लेखी स्वरूपात व्हायचं. नाशिक शहराच्या मानानं इथे शांत वातावरण होतं. कामाचा जास्त ताण नव्हता. इथे त्याला तीन वर्ष काढायची होती. रात्री जेवल्यावर त्याने पुस्तकांच्या कपाटा कडे नजर टाकली.
"तुमच्याकडे पुस्तकांचा खूप मोठा संग्रह दिसतोय."
"आम्हाला तिघांनाही वाचनाची आवड आहे. तुला कोणतंही पुस्तक वाचायचं असेल तर तू वाचू शकतोस. परंतु माझी एक अट आहे. पुस्तकाची पानं दुमडायची नाहीत." श्रीकांतने सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
शेखरने पडत्या फळाची आज्ञा घेऊन एक ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतली. अंजू म्हणाली,
"तुम्हाला पण ऐतिहासिक कादंबऱ्या आवडतात का. मला पण ऐतिहासिक पुस्तके आवडतात."
"खरं सांगायचं तर मला सर्वच प्रकारची पुस्तके आवडतात. ऐतिहासिक जास्त आवडतात. ह्या जगात पुस्तकांसारखा सच्चा मित्र नाही."
"अगदी बरोबर बोललास शेखर. मी पण आताच निवृत्त झालो आहे. पण पुस्तकांमुळे वेळ कसा जातो कळतसुद्धा नाही. बरं तुला आमचं हे बोरगाव कसं वाटलं. एकंदरीत इथे शांत वातावरण असतं."
"हो गाव छान आहे. रस्त्याला दुतर्फा हिरवीगार झाडं आहेत. शहराच्या मानाने इथलं वातावरण पण शांत आहे. तुमचं घरसुद्धा अगदी मला हवं तसं आहे." सरिताने त्याला विचारले,
"सकाळी तू किती वाजता उठतोस आणि तुला बँकेत किती वाजता जावं लागेल ते सांग म्हणजे तुझा चहा, न्याहारी आणि डब्याची वेळेत तयारी होईल."
"काकू तुम्हाला जमेल तसं करा. जास्त धांदल करू नका. एखाद्या दिवशी डबा नाही मिळाला तरी चालेल."
" अरे असं कसं तू दिवसभर बाहेर राहणार आणि माझ्या मदतीला ही अंजू असेलच न."
अंजू आणि शेखरने एकाच वेळी एकमेकांकडे पाहिले. अंजूच्या मनात आलं हा कसला हँडसम आहे. आज पहिल्यांदाच त्याने आपल्याकडे पहिलं. शेखरच्या मनात आलं ही दिसायला चारचौघींसारखी आहे पण चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज आहे. डोळे काळेभोर आहेत. लांबसडक केसांची एक वेणी हिला शोभून दिसते. आवाज पण गोड आहे. ही बहुदा गात असावी. तिथून उठून शेखर रूममध्ये गेला. त्याने खिडकी उघडली आणि वाऱ्याची एक सुंदर झुळूक आली. शेखर मोहरुन गेला. खिडकीतून चंद्राची कोर सुंदर दिसत होती. त्याला कल्पनाची आठवण आली आणि आपसूकच त्याच्या चेहेऱ्यावर एक स्मितहास्य उमटलं. शेखरला एकांतात अनेकदा कल्पनाची आठवण येई. आता सुद्धा कल्पनाशी मैत्री झाल्यापासूनचे सारं काही त्याच्या डोळ्यापुढे अलगद तरळून गेलं.
(कल्पना कोण आहे आणि शेखरचे आणि तिचं काय नातं आहे पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा