स्वप्नसखा _ भाग ५
खरं तर शेखर काही बोलण्या अगोदरच कल्पनाने त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं होतं. तेव्हा त्याला आश्चर्यच वाटलं होतं. एखादी मुलगी स्वतःहून तिचं प्रेम व्यक्त करते हे त्याच्यासाठी नवीनच होतं. तो असा पटकन व्यक्त होणाऱ्यातला नव्हता. पण मनात डोकावून बघितलं असता त्याच्या लक्षात आलं होतं की तोही नकळत तिच्यावर प्रेम करू लागला होता. कॉलेजची पहिली दोन वर्षे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. महाबळेश्वरला म्हणूनच त्याने मावळत्या दिनकराला साक्षी ठेवून त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती.
शेखर त्याचा अभ्यास सांभाळून कल्पनाला कॉलेजच्या बाहेर सुद्धा भेटत होता. कॉलेजमध्ये त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. दोघांपैकी कोणी एक कॉलेजमध्ये आलं नाही की दोघेही बेचैन व्हायचे.
जसजसं ते एकमेकांना जास्त ओळखत गेले तेव्हा शेखरला जाणवलं की ही तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात खूप रस घेत आहे आणि तिला राजकारण हेच आपलं पुढचं क्षेत्र म्हणून निवडायचं आहे. शेखरला राजकारणाचा प्रचंड तितकारा होता. त्याचं स्पष्ट मत होतं की राजकारणी लोक हे कधीही कोणाशी एकनिष्ठ राहत नाहीत. जेव्हा कोणती गोष्ट स्वतःवर शेकते तेव्हा ते बाजू पलटायला तयार असतात. त्यावेळी कोणी केलेली मदत सुद्धा ते विसरून जातात. म्हणूनच शेखर द्विधा मनःस्थितीत होता. कल्पना आपल्या प्रेमात आकंठ बुडाली असली तरी ती प्रेमासाठी राजकारणाला तिलांजली देऊ शकेल का? ती जितक्या गंभीरपणे राजकारणात रस घेते त्यावरून सध्या तरी ते अशक्य दिसतंय. अगदी लगेच लग्न करायचं नसलं तरी लग्नाचा निर्णय घेताना हा मुद्दा उपस्थित राहणारच आहे.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना कल्पना स्वतःहून त्याला म्हणाली,
"शेखर आता हे आपलं कॉलेजचे शेवटचे वर्ष आहे. पुढे आपण जरी काही शिकायचं म्हटलं तरी कदाचित आपले मार्ग वेगळे होतील. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि तुझं सुद्धा माझ्यावर तेवढेच प्रेम आहे. दोन तीन वर्षांनी लग्न करायची वेळ आली की मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तू माझ्याशी लग्न करशील ना!" शेखर जरी तिच्यावर प्रेम करत असला तरी लग्नाचं ऐकून तो एकदम विचारमग्न झाला. शेखर तिच्यावर प्रेम करत असला तरी लग्नाचा त्याने इतक्यात विचार केला नव्हता. शिवाय कल्पना जर राजकारणातच स्थिर होणार असेल तर त्याला अशा मुलीशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि म्हणूनच तो अजून पर्यंत तिच्याशी लग्नाचं काही बोलला नव्हता. हीच वेळ होती सारं काही स्पष्टपणे बोलण्याची. पूर्णपणे विचार करून शेखर म्हणाला,
"कल्पना तुला तर माहीतच आहे की मला राजकारणात काडीचाही रस नाही. तुला त्या क्षेत्रातच आपलं आयुष्य घडवायचं आहे. असं असताना आपण लग्न करण्यात काय शहाणपणा आहे बरं. आपलं लग्न जर झालं तर आंधी सिनेमासारखे आपलं व्हायला नको."
"शेखर अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या राजकारण करून सुद्धा आपलं घर संसार खूप चांगल्या तऱ्हेने चालवत आहेत. मी पण आपल्या घराकडे, मुलांकडे व्यवस्थित लक्ष देऊन राजकारणात सक्रिय राहीन. आज माझे बाबा राजकारणात स्वतःचा ठसा उमटवून आहेत. मी शाळेत असतानाच ठरवलं होतं की राजकारणातच काहीतरी भरीव कार्य करायचं."
"कल्पना तू आता असं बोलतेस परंतु तुझी राजकारणाची ओढ पाहून मला असं वाटत नाही की राजकारण आणि संसार दोन गोष्टी तू एकाच वेळी व्यवस्थित सांभाळू शकशील."
"शेखर माझं खरंच मनापासून तुझ्यावर प्रेम आहे. फक्त मी राजकारणात सक्रिय असणार म्हणून तू मला दूर करू नकोस. "आंधी" हा केवळ एक चित्रपट होता. प्रत्येक वेळी असंच घडत नाही. असं झालं तर राजकारण हे फक्त पुरुषांच क्षेत्र होईल. मी तुला राजकारणात रस घे असं जबरदस्तीने कधीच सांगणार नाही. तुला जे काही काम करायचे ते तू तुझ्या मनाने कर."
"कल्पना आपण आपले मार्ग आपल्या परीने चोखळलेले बरे. मी सर्वसामान्य माणसासारखा धोपट मार्गावरून चालेन आणि तू राजकारणात यश संपादन कर."
"शेखर लग्न नाही तरी कमीत कमी आपल्यात मैत्री तर नक्कीच राहू शकते ना."
"तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम असताना तू माझ्याशी मैत्रीचं नातं कसं बरं निभावू शकशील. उद्या तुझं आणि माझं वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झाल्यावर त्यात निश्चितच प्रॉब्लेम होऊ शकतात. तुझं माझ्यावर खरं खरं प्रेम असेल तर तू राजकारणाला तिलांजली देऊ शकशील का?"
शेखरचं म्हणणं ऐकल्यानंतर कल्पना एकदम गप्प राहिली. तिच्या चेहऱ्याकडे पाहून शेखरला तिचे उत्तर कळलं आणि तो म्हणाला,
"बघ ना राजकारण तुला इतकं प्रिय आहे की तू माझ्यावर जीवापाड प्रेम करत असून सुद्धा राजकारणासाठी प्रेमाला तिलांजली देऊ शकतेस. त्यामुळे आपण इथेच एकमेकांना अलविदा म्हणूया."
"बघ ना राजकारण तुला इतकं प्रिय आहे की तू माझ्यावर जीवापाड प्रेम करत असून सुद्धा राजकारणासाठी प्रेमाला तिलांजली देऊ शकतेस. त्यामुळे आपण इथेच एकमेकांना अलविदा म्हणूया."
क्रमशः
(शेखरच्या ह्या बोलण्यामुळे दोघांच्याही भावी आयुष्यावर काय परिणाम झाला असेल पाहुया पुढील भागात)
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा