Login

स्वप्नसखा _ भाग ६

आधी अलिप्त असलेला तरुण नायिकेचा स्वप्नसखा कसा बनतो
स्वप्नसखा _भाग ६


शेखरच्या ठासून बोलण्यामुळे कल्पनाला खूपच वाईट वाटलं. ती शेखरवर मनापासून प्रेम करत होती. तिला वाटत होतं की राजकारण आणि संसार आपण दोन्ही आघाड्यांवर खूप यशस्वीपणे वाटचाल करू. एकदा तिच्या मनात आलं की प्रेमासाठी आपण राजकारणाचा त्याग करायला हवा होता. शेखरने सारासार विचार करून हा निर्णय घेतला होता. कल्पनाने प्रेमापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व दिल्याचे पाहून नाही म्हटलं तरी शेखरला थोडं वाईट वाटलं होतं. परंतु त्याने आतापर्यंत पाहिले होते की राजकारणात पडलेली व्यक्ती राजकारणालाच प्राधान्य देते. त्यासाठी इतर नात्यांकडे दुर्लक्ष झालं तरी तिला चालतं. एकतर शेखरला राजकारणाबद्दल तिरस्कार होता आणि तो तसा सरळमार्गी होता. त्याला कोणतेही छक्केपंजे माहीत नव्हते. त्याला मनापासून वाटत होतं प्रेम केलं तर ते निभवायला हवं आणि लग्न केलं तर तो संसार एक बंधन न वाटता आपोआप सहजीवन फुलायला हवं. आपल्या जोडीदाराबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर असायलाच हवा.

कल्पनाला दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा होता आणि शेखरला तसं नको होतं. शेवटी दोघांचे मार्ग वेगळे झाले. शेखरने आपलं भवितव्य घडवण्यासाठी सुरुवातीला मुंबई गाठली. योगायोगाने त्याला एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात मुंबईतच नोकरी मिळाली. तिथे सुद्धा त्याने भाड्याने जागा घेऊन आपलं बस्तान बसवलं. कल्पनाची त्याला रोजच आठवण यायची असं काही नव्हतं परंतु एकांतात कल्पना त्याच्या मनात डोकावून जायची. शेखरचा स्वभाव स्वप्नाळू जगात वावरण्याचा नव्हता. प्राप्त परिस्थितीत कसं जगायला हवं हे तो ठरवू शकत होता. आपल्या नवीन जीवनात त्याने बँकेच्या प्रमोशनच्या परीक्षा दिल्या आणि आता त्याची पोस्टिंग बोरगाव या नवीन ठिकाणी झाली होती. शेखरने कितीही नाही म्हटलं तरी कल्पनाची आठवण त्याला तो एकटा असताना कधीतरी यायचीच.

ह्या निसर्गसुंदर गावात त्याला खूप आवडलं होतं. इथली माणसं त्याला खूप आवडली. हळूहळू तो या गावात रुळत होता. श्रीकांतचे घर पण त्याला आवडलं होतं. शेखरला कळत होतं की अंजली पण त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होती. अंजली तशी साधी सरळ मुलगी होती परंतु श्रीकांतच्या घरात शेखर राहत होता त्यामुळे तो तिच्याशी अंतर राखूनच वागत होता. उगाच त्यांचा काही गैरसमज झाला तर आपल्याला ही जागा सोडावी लागेल. सध्याच्या परिस्थितीत त्याला हे परवडणार नव्हतं. शेखरच्या सभ्य वागणूकीमुळे मुळे त्याला श्रीकांतने महिना झाल्यावरदेखील तिथे राहण्याची परवानगी दिली होती. इथे येऊन शेखरला चार महिने झाले होते. सकाळी कधी कधी अंजू त्याला चहा द्यायला यायची तेव्हा ती त्याच्याशी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करायची. तो वाचत असलेल्या पुस्तकाबद्दल त्याचं मत विचारायची. शेखर मात्र जेवढ्यास तेवढेच बोलायचा. अंजूला त्याचे हे वागणं रुचत नव्हतं. तिला वाटायचं बाहेर सर्वांसमोर शेखर आपल्याशी मनमोकळं बोलतो परंतु इथे आपण दोघेच असताना तो अवघडल्यासारखं वागतो. अजून थोडी ओळख झाल्यावर त्याला याच्याबद्दल विचारायला हवं.

कल्पनापासून दूर झाल्यानंतर शेखरने ठरवलं होतं की आता मुलींशी बोलताना चार हात दूर राहूनच बोलायला हवं. त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पुरेपूर जाणीव होती आणि मुली आपल्यावर पटकन भाळतात हे त्याला माहित होतं. उगाचच कोणत्याही मुलीचा आपल्याबद्दल गैरसमज व्हायला नको म्हणून तो जेवढ्यास तेवढेच बोलत होता. शेखरला तो बँकेत असल्यामुळे आता गावातली बरीच लोकं ओळखू लागली होती. त्याचा स्वभाव सगळ्यांना मदत करण्याचा होता. तो सगळ्यांशी प्रेमाने बोलायचा. वरिष्ठ नागरिकांना तर तो फारच आदराने वागवत असे. त्यामुळे अल्पावधीतच लोकांचे त्याच्याबद्दल खूप चांगलं मत झालं होतं. तो सुट्टी घेऊन कधी घरी गेला तर येणारे सर्व विचारायचे आज शेखर साहेब नाहीत का. शेखर परतून आल्यावर त्याचे सहकारी त्याला हे सांगायचे तेव्हा त्याला मनापासून आनंद व्हायचा. अंजुला शेखर आवडू लागला होता त्यामुळे ती त्याच्याशी बोलण्याची एकही संधी सोडत नव्हती. तो इकडे आल्यापासून ती अगदी जास्तच बारकाईने स्वतःची तयारी करण्यात लक्ष घालत होती. तयारी करताना तिच्या मनात यायचं शेखरला कोणता रंग आवडत असेल. तिला वाटायचं की कधीतरी शेखरने आपल्याला पाहून छान दिसतेस असं म्हणावं. खाण्यापिण्यातल्या शेखरच्या आवडीनिवडी तिने आता हेरल्या होत्या. रात्री झोपताना तिच्या मनात शेखरचेच विचार असायचे. त्याच्या स्वप्न रंजनातच ती निद्रेच्या अधीन होऊन जायची.

क्रमशः

(अंजूच्या मनात शेखर बद्दल काय भावना असतील पाहूया पुढील भागात)


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all