Login

स्वप्नसखा _ भाग ७

आधी अलिप्त असणारा तरुण नायिकेचा स्वप्नसखा कसा बनतो
स्वप्नसखा _भाग ७


अंजुला जाणवत होतं की तिच्या मनात शेखर बद्दल प्रेमभावना जागृत झाली आहे. परंतु ती हे कोणाजवळ बोलू शकत नव्हती. गावात तिच्या पाच-सहा मैत्रिणी होत्या परंतु खास अशी कोणीच नव्हती. ही भावना आपण मैत्रिणीकडे अगदी मनमोकळेपणे व्यक्त करू शकतो. शेखरला आपल्या मनातली भावना कळेल का हा विचार ती करत होती. तशी अंजू आणि शेखर एकमेकांसमोर एकटे येण्याचे प्रसंग फार येत नव्हते. सकाळी शेखर साडेआठ वाजताच घराबाहेर पडे. अंजू कॉलेजमधून दुपारी यायची आणि चार वाजता पुन्हा लायब्ररीत जायची. संध्याकाळी घरी यायची त्यावेळी शेखर त्याच्या रूममध्येच असायचा. संध्याकाळच्या वेळी कधी कधी आई-बाबा देवळात किंवा काही आणायच्या निमित्ताने बाहेर पडत असत. अंजूला ती एकच संधी शेखर समोर व्यक्त होण्याची दिसत होती. नंतर तिच्या मनात आलं समजा आपण सकाळी चहा द्यायला जातो तेव्हा एखादं पुस्तक शेखरला दिलं आणि त्यातून आपल्या त्याच्या विषयीच्या भावना प्रकट केल्या तर त्याला काय वाटेल. अंजुला भीती वाटत होती समजा शेखरने ते पत्र घेऊन आई-बाबांना दाखवलं तर मग आपलं काय राहिलं. त्यापेक्षा एक दिवस त्याच्याशी बोलून बघूया.

शेखरशी बोलण्याची अंजूची खूप प्रबळ इच्छा होती आणि ती लवकरच फलद्रुप झाली. एका संध्याकाळी आई बाबा बाहेर गेले असताना शेखर लवकर घरी आला.

त्याला असं अचानक घरी आलेलं पाहून अंजुने त्याला विचारलं,

"आज तुम्ही लवकर आलात. तुम्हाला बरं वाटतंय ना."

"हो मी बरा आहे आमच्या बँकेत आज इलेक्ट्रिसिटी मध्ये काहीतरी बिघाड झालाय आणि तो आज दुरुस्त होण्याची शक्यता नाही. म्हणून मग आम्ही सगळेच आज लवकर निघालो घरी."

"अच्छा असं आहे. तुम्ही फ्रेश व्हा मी तुमच्यासाठी पोहे आणि चहा घेऊन येते."

"तुम्ही त्रास नका करून घेऊ मला फक्त चहा द्या जेवण पण उशिराच झालं आहे."

अंजुने पोहे करण्यामध्ये वेळ न घालवता एक मस्त आलं घातलेला कडक चहा केला आणि ती शेखरला खोलीत द्यायला गेली. शेखर तिला म्हणाला,

"तुम्ही चहा ठेवा तिकडे मी घेईन. तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही करू शकता."

"चहा घेता घेता तुम्ही माझ्याशी थोडं बोललात तर तुम्हाला काही अडचण नाही ना."

"छे छे बोला ना तुम्ही." काय करावं बोलावं की न बोलावं. अंजू द्विधा मनःस्थितीत सापडली. शेखरचा आपल्याबद्दल गैरसमज तर होणार नाही ना. तिने मनाचा निश्चय केला आणि ती म्हणाली,

"आता आई-बाबा लवकरच घरी येतील. शेखर मला तुम्हाला एक सांगायचंय. मला तुम्ही खूप आवडता. तुम्ही माझ्याशी मैत्री कराल का. अगदी स्पष्ट सांगायचं तर माझ्याही नकळत मी तुमच्यावर प्रेम करू लागले आहे."

क्षणभर शेखर गांगरला. त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. खरं तर मुली स्वतःहून पुढाकार घेऊन कधी असे बोलत नाहीत. आपल्या बाबतीत कल्पना आणि आता ही अंजू दोघीही जरा जास्तच धीट वाटतात. तो गडबडीने म्हणाला,

"तुम्ही हे मनात सुद्धा आणू नका. मला तुमच्या घरात राहायला जागा मिळाली हे माझं खूप भाग्य आहे. उद्या तुमच्या आई-बाबांना कळलं तर मी त्यांची खूप मोठी फसवणूक करतोय असं त्यांना वाटेल. त्यांच्या उपकाराची मी अशी परतफेड कधीच करणार नाही."

"अहो असंच काही नाही. कदाचित माझ्या आई-बाबांच्या मनात सुद्धा तसंच असू शकेल. तसेही मला तुमच्या उत्तराची घाई नाहीये. तुम्ही थोडा विचार करा आणि मग मला सांगा."

त्या रात्री शेखरला अजिबात झोप आली नाही. त्याने कल्पनाशिवाय इतर कोणत्याही मुलीचा कधी विचारच केला नव्हता. आता या अंजूच्या बाबतीत तर तो असा विचार कधीच करू शकत नव्हता. त्याने तिच्या आई-बाबांना कबूल केलं होतं की तुम्हाला आवडणार नाही असे मी कधीच वागणार नाही.

रात्रीचे दोन वाजून गेले तरी अंजूला आज झोपच येत नव्हती. ती या कुशीवरून त्या कुशीवर सारखी वळत होती. आईने तिला विचारलं सुद्धा,

"काय गं झोप येत नाही का. बरं वाटत नाही का तुला. गरम पाणी आणि ओवा देऊ का म्हणजे तुला बरं वाटेल."

"नाही नाही आई मी आता झोपतेच आहे."

शेखरने अंजुला नाही म्हटलं तरी तिला त्याच्याबद्दल उलट आदरच वाटला. तो आपल्या आई-बाबांना दिलेल्या शब्दाला जागतोय हे पाहून तिला आनंद झाला. तिने मनाशी ठरवलं की शेखरशी प्रत्यक्ष बोलता येत नसलं तरी आपण आता त्याला एक पत्र लिहून पुस्तकातून ते त्याला वाचायला देऊया. त्याच्याविषयीच्या आपल्या भावना किती खऱ्या आहेत हे पाहून तो आपल्याबद्दल नक्कीच विचार करेल. मनातल्या मनात अंजलीने असं ठरवल्यावर मात्र तीला शांत झोप लागली. तिने ठरवलं की लायब्ररीत आपल्याला वेळ असतो तेव्हा आपण निवांतपणे पत्र लिहू आणि लायब्ररीतल्याच एखाद्या पुस्तकात घालून त्याला ते देऊ या.

क्रमशः

(अंजलीच्या भावना ती पत्राद्वारे शेखरला सांगू शकेल का पाहूया पुढील भागात)


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all