स्वप्नसखा _ भाग ८
अंजु दुसऱ्या दिवशी कॉलेजमधून लायब्ररीत गेल्यावर शेखरला कोणतं पुस्तक द्यायचं याचा विचार करू लागली. अंजूची दहावीची परीक्षा होईपर्यंत तिला कादंबरी वाचायला परवानगी नव्हती. दहावीची परीक्षा झाल्यावर बाबांनीच तिला एक सुंदरशी कादंबरी वाचायला दिली होती. योगिनी जोगळेकर लिखित `ज्योतिर्मयी` ही तिने वाचलेली पहिलीच कादंबरी. ती पहिलीच कादंबरी तिला इतकी आवडली की ती कादंबरी तिने तीन वेळा वाचून काढली. त्या कादंबरीतील नायक सलीलच्या ती प्रेमातच पडली. तिला सलील हे नाव पण खूप आवडलं. त्यानंतर तिने योगिनी जागळेकर, कुसुम अभ्यंकर, शैलाजा राजे सुमती क्षेत्रमाडे यासारख्या दिग्गज लेखकांच्या अनेक कादंबऱ्या वाचल्या. शेखर साठी तिने पहिल्या प्रथम वाचलेली आणि तिला आवडलेली ज्योतिर्मयी कादंबरी निवडली. मधलाच वार असल्यामुळे फरशी गर्दी नव्हती. त्याचवेळी तिने शेखरला पत्र लिहिलं आणि कुणाला दिसू नये म्हणून पुस्तकात ठेवलं. एकदा तिला वाटलं असं पत्र देणं योग्य नाही. पत्र फाडून टाकायचा विचार तिच्या मनात आला. पत्र फाडण्यासाठी तिने ते हातात घेतलं सुद्धा. परंतु तिला ते फाडावसं वाटलं नाही. शेवटी तिने विचार केला जे होईल ते होईल पण आपल्या भावना शेखर पर्यंत पोचण्यासाठी हाच एक मार्ग आहे.
बँकेत आल्यावर शेखर स्वतःच्या कामात या गोष्टी विसरून गेला. संध्याकाळी घरी गेल्यावर त्याने पाहिलं अंजू ओसरीतल्या झोपाळ्यावर बसून त्याची वाटच पाहत होती. संध्याकाळचा चहा शेखरला तिनेच दिला. रात्रीचे जेवण झाल्यावर नेहमीसारखाच तो सर्वांशी गप्पा मारायला बसला. अंजू अधूनमधून त्याच्याकडे पाहत होती परंतु त्याने अंजूकडे बघायचं टाळलं. त्याने मनाशी ठरवलं होतं की अंजूला अजिबात प्रोत्साहन द्यायचं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा घेऊन अंजू शेखरच्या खोलीत गेली. शेखर आवरतच होता.
"शेखर आज मी तुमच्यासाठी ही एक कादंबरी आणली आहे. तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला खूप आवडेल." शेखरने एकदा त्या कादंबरीकडे पाहिलं आणि म्हणाला,
"अंजली मी शक्यतो अशा कादंबऱ्या वाचत नाही. मला ऐतिहासिक, वैचारिक पुस्तकं वाचायला आवडतात."
"हो ते मला माहीत आहे. ही कादंबरी मी दहावी झाल्यानंतर पहिल्याप्रथम वाचलेली कादंबरी आहे. योगिनी जोगळेकरांच्या सर्वच कादंबऱ्या खूप छान असतात. तुम्ही वाचून तर बघा आणि मग मला सांगा."
"बर ठीक आहे तू तिथे ठेव. कादंबरी मी वाचून झाली की परत देईन. ही तुझ्या लायब्ररीची दिसते आहे. परत करायची ठराविक वेळ असेल नाही का."
"असं काही नाही मी स्वतः तिथे लायब्ररीयन म्हणून काम करते त्यामुळे हरकत नाही."
"काहीही असलं तरी आपण नियम पाळलेले बरं मी देईन लवकरच परत."
त्याला कादंबरी देऊन निघाल्यावर दिवसभर अंजूच्या मनात तेच विचार येत होते की आपलं पत्र शेखर वाचेल का. पत्र वाचल्यावर तो आपल्याबद्दल काय विचार करेल. आपल्या आई-बाबांना सांगणार तर नाही ना! या विचाराने अंजू घामाघुम झाली. अशा तऱ्हेचे प्रेमपत्र तिने पहिल्यांदाच कुणा मुलाला लिहिलं होतं.
शेखरच्या मनात येत होतं आज ही स्वतः चहा घेऊन आली आणि आपल्याला एक कादंबरी तिने वाचायला दिली. आता तिने दिलीच आहे तर कादंबरी वाचून बघूया.
शेखरच्या मनात येत होतं आज ही स्वतः चहा घेऊन आली आणि आपल्याला एक कादंबरी तिने वाचायला दिली. आता तिने दिलीच आहे तर कादंबरी वाचून बघूया.
रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांशी गप्पा मारून शेखर झोपायला आला. आल्यावर त्याने ती कादंबरी लवकर परत द्यायची म्हणून तीच वाचायला घेतली. त्याने सुरुवातीला सहज पानं चाळायला सुरुवात केली. सुरुवातीच्या पाच-सहा पानानंतर त्याला एक कागद दिसला. त्याला आधी वाटलं की चुकून अंजूचा काहीतरी कागद राहिला असेल. म्हणून त्याने तो बाजूला काढून ठेवला. कादंबरी वाचायला सुरुवात केल्यावर त्याच्या लक्षात आलं की खरोखर कादंबरी मनाची पकड घेणारी आहे. लेखिकेची लेखनशैली अप्रतिम आहे. थोडी पाने वाचल्यावर त्याने तो कागद उचलून पुन्हा पुस्तकात ठेवला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की यावर काहीतरी मजकूर लिहिलाय. त्याने तो कागद उघडून पाहिला आणि तो एकदम अचंबित झाला. अंजुने त्याला प्रेमपत्र लिहिलं होतं. अंजू असं काही पाऊल उचलेल असे त्याला अजिबात वाटलं नाही. तरी त्याला ते प्रेमपत्र वाचण्याची इच्छा झाली.
क्रमशः
(अंजुने प्रेमपत्रात काय लिहिलं होतं पाहूया पुढील भागात)
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा