Login

स्वप्नसखा _ भाग ९

आधी अलिप्त असणारा तरुण नायिकेचा स्वप्नसखा कसा बनतो
स्वप्नसखा _भाग ९


कल्पना चे शेखरवर प्रेम होते परंतु तिने कधीच शेखरला पत्र लिहिलं नव्हतं. आज अंजुने पुस्तकात घालून आपल्याला पत्र लिहिलं आहे. आपण ते न वाचता तसेच ते पुस्तक वाचून झाल्यावर तिला देऊन टाकूया. म्हणजे तिला एक प्रकारे आपलं उत्तरच मिळेल. पण असं आपण केलं तर ती खूपच दुखावली जाईल. तिने तिच्या भावना व्यक्त केल्या असतील. असं जाणीवपूर्वक तिला टाळणं योग्य नाही. पत्र वाचायला काहीच हरकत नाही. अंजुने पत्रात काय लिहिलं असेल हा विचार करतच त्याने पत्र उघडलं,

शेखर,

तुम्हाला कोणते संबोधन वापरावे ह्याबद्दल माझी द्विधा मनःस्थिती असल्या कारणाने मी फक्त शेखर लिहिलं आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका आणि माझ्या आई बाबांना ह्या पत्राबद्दल काहीही कळू देऊ नका. प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. कोणाचं कोणावर कधी प्रेम जडेल कोणीही सांगू शकत नाही. जेव्हा प्रेम दोन्ही बाजूंनी होतं तेव्हा तो एक प्रेमसोहळा असतो. त्यात दोघंही रंगून जातात. ते दोघांचं एक मोरपंखी स्वप्न असतं. एकमेकांच्या सान्निध्यातले क्षण कापरासारखे लवकर उडून जातात आणि एकमेकांच्या विरहाचा एक क्षण युगासारखा भासतो. मी तुम्हाला पाहिल्या क्षणापासून तुम्ही माझ्या मनमांदिरात स्थानापन्न झाला आहात.

जेव्हा समोरची व्यक्ती सुद्धा प्रेम करते हे माहित नसतं तेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या भावना व्यक्त कराव्या लागतात नाहीतर आपल्या प्रेमावर दुसऱ्या कोणाची मोहोर उमटण्याची शक्यता असते. तू माझ्यावर प्रेम कर म्हणून कोणीच कोणावर प्रेम करू शकत नाही. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय ते मला ठाऊक नाही. परंतु शेखर मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतेय. अर्थात तुमच्या पण माझ्याबद्दल त्याच भावना असाव्यात असा माझा आग्रह नाही.

अंजुने अजून बरंच काही लिहिलं होतं. मराठी भाषेतील सौंदर्याचा नजराणाच तिने पत्राद्वारे अर्पण केला होता. शेखरच्या मनात आलं बापरे !ही मुलगी आपल्यावर इतकं प्रेम करत असेल असं वाटलंच नाही. पण नक्कीच हिचं प्रेम उथळ वाटत नाही. आपल्याला हिच्याबद्दल असे काहीच वाटत नाही. एकतर हिच्या आई बाबांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. आपण पूर्णतः अनोळखी असून त्यांनी आपल्याला भाड्याने खोली दिली आहे. काकू रोज आपल्याला प्रेमाने सकाळच्या चहापासून सर्वच देत आहेत. त्यांच्या हाताला चव आहेच शिवाय आईच्या मायेचा स्पर्श आहे. अंजू म्हणाली होती की पत्र वाचल्यावर फाडून टाका. पण असं तिने आपल्याला लिहिलेले हे पाहिलं पत्र फाडणं योग्य होईल का? एक प्रकारे हा तिचा अपमानच होईल.

शेखरच्या खोलीत काकू आणि अंजुव्यतिरिक्त दुसरं कोणी येत नव्हतं. त्यासुद्धा फक्त कधी नाश्ता आणि चहा देण्याकडे. बहुतेकदा शेखर बाहेरच चहा घ्यायला जायचा. शेखरने ते पत्र न फडता तसेच त्याच्या एका डायरीत ठेवण्याचे ठरवले. त्याने विचार केला आपण जर तिला उत्तर दिलं नाही तर ती आपल्याकडून तिला काही प्रतिसाद नाही असं समजून जाईल. रात्री ह्या सर्व गोष्टींचा विचार करताना त्याला निद्रादेवी प्रसन्न झाली.

(शेखरच्या आयुष्यात घडणाऱ्या नवीन घडामोडींमुळे त्याच्यावर काय परिणाम होईल पाहूया पुढील भागात)