स्वप्नसखा _भाग १०
सकाळी शेखर तयार होऊन बँकेत जायला निघाला तेव्हा काका त्याला म्हणाले,
"उद्या सरिताचा वाढदिवस आहे त्यामुळे आज आमची मोठी लेक अनिता चार दिवस माहेरपणासाठी येणार आहे. ती जरा बडबड्या स्वभावाची आहे. तुला डिस्टर्ब होईल तेव्हा सांभाळून घे."
"अहो काका असं काय बोलता. ताई त्यांच्या घरी माहेरी येणार आहेत. मला जरी बहीण नसली तरी मित्र त्याच्या लग्न झालेल्या ताई बद्दल बोलतो ना. मुलींना माहेरी आल्यावर किती बोलू आणि किती नको असं झालेलं असतं. किती दिवसांनी त्या आपल्या आईबाबांच्या छत्र छायेखाली मायेच्या विसाव्याला येत असतात. त्यामुळे ताई घरात असतील तेव्हा मला आनंदच होईल."
"बरं निघ आता तुला उशीर नको व्हायला. डबा घेतलास न. वेळेवर जेवत जा रे पोरा."
संध्याकाळी शेखर घरी आला तेव्हा अनिता आलेली होती.काकानी तिची शेखरशी ओळख करून दिली. तेव्हा तिच्या बडबड्या स्वभावाची चुणूक त्याला पहायला मिळाली. इतक्यात अंजू लायब्ररीतून आली. आल्याबरोबर तिने अनिताला मिठी मारली.
"ए ताई किती दिवसांनी आलीस. मी तुला आम्हाला विसरू देणार नाही. कळलं ना लवकर लवकर यायचं. आधी माझ्यासाठी काय आणलं ते दाखव."
"अरे अंजू क्या बात तुझा चेहरा गुलाबी झाला आहे. प्रेमात वगैरे पडलीस की काय! काय गं खरं ना!"
अनिताने असं म्हणताच अंजुचा चेहरा गोरामोरा झाला. तिने हळूच शेखरकडे पाहिलं. तो दोघींचा संवाद ऐकून गालातल्या गालात हसत होता. अंजू आणि अनिता एकमेकिंचा हात हातात घेऊन घरात गेल्या. दोन बहिणीमधील प्रेमळ संवाद तो पहिल्यांदाच ऐकत होता. त्याला खूप मजा वाटली. त्याच्या मनात आलं काकूंचा उद्या वाढदिवस आहे. त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायला हवी. त्याच्या लक्षात आलं अरे आपल्या आईचा पण उद्याच वाढदिवस. विलक्षण योगायोग आहे. आता पुढच्या वेळी घरी जाताना आईला पण साडी घेतली पाहिजे. काकूंना सकाळी साडी द्यायची असेल तर आताच काकू आणि आईसाठी पण साडी घेऊन ठेवूया. त्याच्या मनात आल्याबरोबर तो काकांना सांगून बाहेर पडला. बँकेत असल्यामुळे गावातले व्यापारी त्याच्या परिचयाचे झाले होते. त्या पैकीच एका दुकानात गेला. तो गेल्याबरोबर काउंटरवरचा मॅनेजर उठून पुढे त्याच्या स्वागताला गेला.
"अलभ्य लाभ! साहेब आज तुम्ही साडी घ्यायला आलात. एकटेच आलात. अहो वहिनी साहेबाना पण आणायचे होते."
"अहो माझं अजून लग्न झालं नाही. मी माझ्या आई आणि काकू साठी साडी घ्यायला आलो आहे. त्यांना शोभेल अशी साडी दाखवा."
मॅनेजरने गजा नावाच्या माणसाला शेखरला हव्या असलेल्या साड्या दाखवायला सांगितल्या. त्याने दोघींसाठी सौम्य रंगाच्या सिल्कच्या महागातल्या दोन साड्या घेतल्या. एका लिंबू रंगाच्या नाजूक डिझाइन असलेल्या साडीवर त्याची नजर खिळून राहिली. त्याच्या मनात आलं ही साडी कल्पनाला खूप शोभून दिसली असती. तो थोडा हळवा झाला. एकदा त्याने विचार केला अंजू आणि अनिता ताईला साडी घ्यावी. पण लगेच त्याने तो विचार दूर सारला. उगाच अंजुचा गैरसमज झाला असता. तो बिल भरायला काउंटरवर गेल्यावर मॅनेजर त्याच्याकडून पैसे घेईच ना. शेखर त्याला म्हणाला,
"तुमच्याकडे चांगल्या साड्या मिळतात म्हणून मी इथे आलो. मी अशा फुकट साड्या घेऊ शकत नाही. ते माझ्या तत्वात बसत नाही."
त्याने पैसे दिले आणि तो बाहेर पडला. समोरच मोगऱ्याचा गजरेवली बसली होती. त्याने तिघींसाठी गजरे घेतले. त्याला मोगऱ्याचा सुगंध खूप आवडायचा. नाशिकला तो आईसाठी सुद्धा गजरा विकत घ्यायचा. एक बरं होतं उद्या सुट्टीचा दिवस होता. त्याने सकाळीच काकूंना त्यांच्या लेकी ओवाळतील तेव्हाच साडी द्यायचं ठरवलं.
(अंजुला अनिताने विचारलेल्या प्रश्नावर अंजू तिला काय उत्तर देईल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा