स्वप्नसखा _भाग ११
अंजू आणि अनिता आत गेल्यावर अंजूच्या मनात आलं ताईने आपली चोरी पकडली आहे. तिला आपल्या मनातल्या शेखर बद्दलच्या भावना सांगाव्यात की नाही. अनिता तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली,
"हे बघ अंजू तुझं कोणावर प्रेम असेल तर आधीच सांग. आई बाबांजवळ बोलायला तुला अवघडल्यासारखं वाटेल म्हणून मला सांगून टाक. नंतर आई बाबा तुझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करतील तेव्हा त्यांना तोंडघशी पडल्यासारखं व्हायला नको."
अंजुने विचार केला अजून शेखरच्या मनात काय आहे हे कळलं नाही. ताईला आताच काही सांगण्यात अर्थ नाही म्हणून सारवासारव करत ती म्हणाली,
"नाही गं ताई! तसं काही असलं तर तुला नक्की सांगेन."
आज अंजू आणि अनिताने आईला किचन मध्ये येऊच दिलं नाही. आईला मस्त तयार होऊन हॉल मध्ये बसायला सांगितलं. आई तयार झाली तरी ती अधूनमधून किचन मध्ये जाऊन बघत होती. सर्व तयारी झाल्यावर दोघींनी आईला पाटावर बसायला सांगितले. शेजारी दुसऱ्या पाटावर बाबांना बसवले. काकांनी हाक मारून शेखरला पण बोलावले. शेखर तयारच होता. तो काकूंसाठी घेतलेली साडी आणि गजरे घेऊन बाहेर आला. झब्बा आणि पायजम्यामध्ये तो देखणा दिसत होता. काही क्षण अंजू त्याच्याकडे पाहत राहिली. अनिताच्या ते लक्षात आलं. काका शेखरला म्हणाले,
"ये बैस. आज सरिताचा वाढदिवस म्हणून दोघींनी खास घाट घातला आहे. आज खूप लाड चालले आहेत आईचे."
"हो ना घरात मुली असल्या की त्यांना सगळं करायचं सुचतं. आम्ही मुलं कायम आईला हे कर, ते कर सांगत असतो. आता आम्ही पण आईसाठी काही विशेष बेत करू."
अंजू आणि अनिताने आईची ओवाळणी केली तिला सुंदर डाळिंबि रंगाची सिल्क साडी दिली आणि मोत्याची कुडी दिली. काकांनी पण नाजुकसा हार आणला होता. सर्वांचं झाल्यावर काकू उठू लागल्यावर शेखरने त्यांना पुन्हा पाटावर बसवलं. त्याने आणलेली सुंदर मोरपिशी सिल्कची साडी आणि गजरा दिला. उरलेले दोन गजरे त्याने अनिताच्या हातात दिले. काकूंना गहिवरून आले,
"शेखर कशाला इतकी महागाची साडी आणलीस. नुसत्या शुभेच्छा द्यायच्या ना. माझा आवडीचा मोगऱ्याचा गजरा पण आणलास! खरंच तुझ्यामुळे आमची मुलाची हौस पण भागली."
"असं कसं काकू आज तुमच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस. तुम्ही आईच्या मायेने रोज सकाळी उठून माझ्यासाठी घाईघाईत किती काय काय करता. त्याची किंमत कधीच होऊ शकणार नाही. बरं तुम्हाला आवडली का साडी?"
"खूपच सुंदर आहे." इतक्यात काका म्हणाले,
"अरे आता नुसत्याच गप्पा मारणार आहात का! त्या सुग्रास जेवणाच्या सुगंधाने पोटात कावळे ओरडू लागले आहेत. काय शेखर तुला लागली ना भूक!"
"रोजच्यापेक्षा जास्त."
"आई आणि बाबा तुम्ही तिथेच बसा. मी आणि अंजू ताट तयार करून आणतो. तुम्हाला वाढतो आणि आम्ही दोघी नंतर बसतो."
"ए पोरींनो नाही हा. सर्व जेवण बाहेर घेऊन या. आपण सर्वांनी एकत्र जेवायचं आहे."
"बरं बरं आज तुझं ऐकायलाच हवं."
सर्वांची हसत खेळत जेवणं चालली होती. अंजू मुद्दामहून शेखरच्या समोर बसली होती. अधून मधून ती शेखरकडे पाहत होती. अनिता अंजूची धावपळ बघत होती. अळुवडीचा आस्वाद घेत शेखर म्हणाला,
"सर्वच जेवण खूप छान झालं आहे त्यात अळूवडी मस्त कुरकुरीत चविष्ट झाली आहे." लगेच अनिता बोलली,
"आमच्या अंजुने केलीय अळूवडी. तिच्या हाताला चव आहे. होणारा नवरा एकदम खुश होईल."
अंजुने लाजून शेखरकडे पाहिलं. तो जेवणात मग्न होता. काका म्हणाले,
"हो हो आता अंजूसाठी स्थळ बघायला सुरुवात केलीच आहे. येत्या एकदोन वर्षात तिच्या लग्नाचा बार उडवून देऊ. शेखर तुझ्या पाहण्यात एखादा चांगला मुलगा असेल तर सांग."
"हो नक्की सांगेन काका."
(आता अंजू काय करेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा