स्वप्नसखा _भाग १२
अंजूच्या लग्नाबद्दल बाबा बोलल्यामुळे तिच्या मनात काहूर उठलं होतं. तिने ठरवलं की आता लवकरच शेखरला अजून एक पत्र लिहायला लागेल. अनिता ताई चार दिवस राहणार होती. ती गेल्याशिवाय काही करता येणार नाही. जेवण झाल्यावर शेखर बाहेर जाऊन सगळ्यांसाठी आइस्क्रीम घेऊन आला. थोडा वेळ सर्वांनी हसत खेळत गप्पा गोष्टी केल्या. नंतर शेखर आपल्या खोलीत गेला. आई बाबा पण थोडा वेळ आराम करायला गेले. अनिता आणि अंजू बाहेर ओसरीवर गप्पा गोष्टी करत थांबल्या. अनिता अंजुकडे रोखून पाहत म्हणाली,
"काय गं हा शेखर स्वभावाने चांगला वाटतो ना! आपल्या घरातलाच एक झाल्यासारखा वाटतोय. मला खरं खरं सांग तुला तो आवडतो ना!"
"आवडतो असं काही नाही. पण स्वभावाने चांगला आहे. शिवाय आई बाबांचं काय म्हणणं आहे ते माहित नाही."
"तू त्याच्याशी बोलत असशील ना. त्याच्या आयुष्यात कोणी दुसरी मुलगी आहे की नाही ते जाणून घे. तो पुढाकार घेत नसेल तर तू बोल त्याच्याशी."
"मी बोलते अधूनमधून. कदाचित बाबांनी राहायला जागा दिली या दडपणाखाली तो जास्त बोलत नसावा."
"मी काय म्हणते अंजू मी बाबांशी बोलून बघू का?"
"इतक्यात नको. जरा थांब." इतक्यात आई आतमध्ये चहा करायला गेली म्हणून ह्या दोघी लगबगीने आत गेल्या.
"आई तुला चैन पडत नाही का! एक दिवस तरी आराम कर ना."
"हो गं बायनो. तसं रोज पण अंजू मला मदत करतेच. बाबा सुद्धा काहीबाही करत असतात. इतकंच काय शेखरसुद्धा बँकेतून येताना अधूनमधून भाजी, कधी काही खाऊ घेऊन येतो. खूप चांगला मुलगा आहे." अनिता पटकन म्हणाली,
"जावई करून घे ना." आई आणि अंजू दोघीही तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिल्या.
"अनिता अगदी माझ्या मनातलं बोललीस गं! इतका चांगला जावई मिळायला भाग्य लागतं. अगं तो चांगला वागतो म्हणून आपण त्याला गृहीत धरू नये."
"अगं एकदा तू आणि बाबा त्याला विचारून तर बघा. कदाचित त्याला स्वतःहून बोलायला अवघड वाटत असेल."
"नाही! इतक्यात ह्या विषयावर त्याच्याशी बोलणं योग्य नाही. देवाच्या मनात असेल तर तसंच होईल. आपण वाट बघूया."
आईच्या मनात पण हेच आहे ऐकून अंजुला आनंद झाला. एका अर्थी तिला ग्रीन सिग्नलच मिळाला होता.
आजच्या सुग्रास जेवणामुळे दुपारी सगळ्यांनी फक्त चहाच घेतला.
चार दिवसांनी अनिता घरी गेली. अंजुने पुन्हा एक सुंदर प्रेमपत्र लिहून पुस्तकातून शेखरला दिले. ह्या वेळी तिने त्याला स्पष्टपणे सांगितलं की पुस्तकात वाचण्यासारखं अजून काहीतरी आहे. शेखरला पण उत्सुकता लागून राहिली की आज अंजुने काय लिहिलं असेल. रात्रीची जेवणं झाल्यावर तो लवकरच खोलीत आला. त्याने अंजुने दिलेलं पुस्तक काढलं. पुस्तक कोणतं ते पहायच्या आधी त्याने अंजुचे पत्र उघडले. ह्यावेळी त्याने पहिले की तिने दोन तीन वेळा प्रिय लिहून खोडले होते आणि चौथ्यांदा पुन्हा प्रिय लिहिलं होतं. अंजू आता धीट झाली होती. तिने तिच्या भावना मुक्तपणे व्यक्त केल्या होत्या. नाही म्हटलं तरी एखाद्या मुलीला आपल्याबद्दल असं सगळं वाटतंय हे पाहून तो आतून सुखावला होता.
नंतरच्या आठवड्यात अंजू कॉलेजतर्फे बाहेर सहलीला गेली होती. ती नसल्यामुळे घरात शांतता होती. ती सकाळी चहा नाश्ता द्यायला यायची तेव्हा शेखरशी थोडंफार बोलायची. तो निघताना ती मुद्दाम बाहेर घुटमळत राहायची. चोरून चोरून त्याच्याकडे पाहायची. आता ती नव्हती तर शेखरला जाणवत होतं की आपण काहीतरी मिस करतोय. त्याच्या लक्षात आलं की जरी आपल्याला अंजू बद्दल प्रेम वाटत नसलं तरी तिचं आजूबाजूला असणं आपल्याला आवडतेय.
(शेखरला जाणवणारी अंजूची अनुपस्थिती म्हणजेच प्रेमाची चाहूल तर नसेल ना)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा