Login

स्वप्नसखा _ भाग १५

आधी अलिप्त असणारा तरुण नायिकेचा स्वप्नसखा कसा बनतो
स्वप्नसखा _भाग १५


आज खूप दिवसांनी शेखर घरी येणार म्हणून त्याची आई मालती सारखी आतबाहेर करत होती. तिला अशा फेऱ्या मारताना पाहून शेखरचा लहान भाऊ शंतनू म्हणाला,

"अगं आई तू कितीही फेऱ्या मारल्या तरी दादा येणार तेव्हाच येणार."

"तू गप रे आईच्या भावना आई झाल्याशिवाय तुला कळणार नाहीत." इतक्यात रिक्षा दारात थांबली. शेखरला पाहून नकळतच आईचे डोळे पाणावले. शंतनू लगेच दादाची बॅग घ्यायला पुढे सरसावला.

"दादा ह्यावेळी बॅग जड दिसतेय बँकेवर डल्ला मारलास की आमच्यासाठी भेटवस्तू आणल्या आहेस." शेखरने आईचा हात धरून घरात प्रवेश केला.

"हे काय बाबा दिवस नाहीत घरात."

"अरे येतीलच इतक्यात. महत्वाच्या कामानिमित बाहेर गेले आहेत." चहा पाण्याबरोबर थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शेखर बाहेर ओसरीवर झोपाळ्यावर येऊन बसला. ही त्याची खूप आवडती जागा होती. त्याला पाहून समोरच्या बंगल्यातील राधा मावशी पुढे आल्या. त्याची त्यांनी प्रेमाने चौकशी केली. राधा मावशींच्या मनात होत की त्यांच्या रेवतीशी शेखरचे लग्न व्हावं. त्याबद्दल त्या नेहमी सूचक बोलायच्या. शेखरने त्यांना कधीच दुजोरा दिला नाही.

रात्री बाबा घरी आल्यावर सगळे जेवायला बसले. ताटात पुरणपोळी पाहून शेखर खूप खुश झाला.

"आई तिकडे त्या काकूंच्या हाताला पण तुझ्या सारखीच चव आहे. मुख्य म्हणजे त्या अगदी प्रेमाने आग्रह करून मला खावू घालतात." आई मस्करीने म्हणाली,

"काय रे शेखर तू म्हणत होतास ना की त्यांना एक तरुण मुलगी आहे. तिच्या हाताला पण तशीच चव असेल. घालायची का मागणी तिला."

"आई तुझं आपलं काहीतरीच." असं बोलताना शेखरच्या डोळ्यांसमोर अंजूचा चेहरा आला. आपण नाही तर तिला बहुतेक करमत नसेल. रात्री मस्त सगळे गप्पा मारत बसले. शंतनूने बाहेर जाऊन दादाच्या आवडीचं कसाटा आईस्क्रीम आणलं. रात्री झोपताना शेखरच्या मनात येत होतं की उद्या कल्पनाची भेट व्हायला हवी. आपण थेट तिच्या घरी जाणे प्रशस्त दिसणार नाही. राजनला सोबत घेऊन तिच्या घरावरून एक फेरफटका मारायला हवा. कदाचित तिची भेट होईल. तिच्या आठवणीत मग्न असताना त्याला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता झाल्यावर तो त्याच्या मित्राला राजनला भेटायचा विचार करतच होता की दस्तुरखुद्द कल्पनाच त्याच्या घरी आली.

"अरे शेखर तू आला आहेस घरी. तुला बघून खूप आनंद झाला. मला वाटलं होतं की तू भेटणार नाहीस."

इथे कल्पनाला पाहून शेखरला आपल्या प्रबळ
ईच्छाशक्तीचं कौतुक वाटलं. त्याच्या मनात आलं आपली ईच्छाशक्ती किती प्रबळ आहे. कल्पनाला किती महिन्यांनी बघतो आहोत. आहे तशीच आहे. अजूनही अवखळपणा तोच आहे. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पण अजिबात कमी झाला नाही. आपल्या वाटा वेगळ्या झाल्यापासून आजच आपण हिला बघतोय. हिला कधी आपली आठवण येत असेल का! शेखरची तंद्री लागलेली पाहून कल्पना त्याच्यापुढे हात हलवत म्हणाली,

"अरे शेखर किती महिन्यांनी भेटतो आपण माझं स्वागत तरी कर."

"अगं ये ना. कशी आहेस? आज आपल्या भेटीचा योग होता म्हणूनच मी बहुतेक आलो घरी.
तुझ्या घरी सगळे कसे आहेत. हो आणि तुझं राजकारण कसं चाललंय? आज तुला घरी कसं यावंसे वाटलं."

"आज तसंच विशेष कारण आहे. मला वाटलं होतं तुझ्या आईलाच सांगावं लागेल."

(कल्पनाचे असे काय काम असेल पाहूया पुढच्या भागात)