स्वप्नसखा _भाग १६
कल्पनाला खूप काळानंतर पाहिल्यानंतर
शेखरची कळी खुलली होती. त्याच्या मनात आलं प्रबळ इच्छाशक्ती असली की एखादी गोष्ट खरंच साध्य होऊन जाते. कदाचित कल्पनाने आपला राजकारणाचा निर्णय बदलला असेल आणि तोच ती आपल्याला सांगायला आली असेल असं शेखरला मनोमन वाटलं. नाहीतर तिचं असं विशेष काय काम असणार की ती आपल्याकडे यावी.
"कल्पना कशी आहेस तू? कसं काय चाललंय तुझं आणि असं काय विशेष काम आहे सांगून तरी टाक माझी उत्सुकता ताणून धरू नकोस."
"शेखर मी माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला आले आहे. पुढच्याच महिन्यात लग्न आहे नक्की यायचं हं. थांब काकूंना पण मी बाहेर बोलवते."
कल्पनाने असं म्हणताच शेखरचा चेहरा पडला. त्याला वाटलं कल्पना आपल्याला भेटली नसती तर बरं झालं असतं आणि आपल्या अनुपस्थितीत आईला पत्रिका देऊन गेली असती तर खरंच खूप चांगलं झालं असतं. इतक्यात शेखरची आई बाहेर आली.
"अगं कल्पना तू कधी आलीस? काय विशेष!"
"काकू पुढच्याच महिन्यात माझं लग्न आहे आणि तुम्ही सगळ्यांनी अगदी सकाळपासून लग्नाला यायचं बर का. काकांना पण सांगा. अरे शेखर तू माझं अभिनंदन पण करणार नाहीस का! कोण मुलगा आहे हे तरी विचार."
"अरे हो. मनःपूर्वक अभिनंदन. आता सांग कोण मुलगा आहे! तुझ्याच क्षेत्रातला आहे का?"
"हो अगदी बरोबर ओळखलं. माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे. ते सुद्धा दोघेही राजकारणातच आहेत. राजकारणावर बोलता बोलता आमची मैत्री झाली. आमचे विचार जुळले आणि आम्ही दोघांनी लग्न करून संसार थाटायचं ठरवलं."
"कल्पना तुझं मला खूप कौतुक वाटतं एक मुलगी असून पण तू राजकारणात इतकी सक्रिय आहेस आणि खरंच तू त्यात खूप मोठी झेप घेशील हे मी खात्रीने सांगू शकते."
"हो ना शेवटी तुझ्या मनासारखं झालं तुला हवा तसा राजकारणातला मुलगा मिळाला हे खूप चांगलं झालं." काहीतरी बोलायचं म्हणून शेखर बोलला. त्याच्या मनात आलं शेवटी तिने तिचंच खरं केलं. आपल्यापेक्षा तिला राजकारण जास्त प्रिय वाटलं या विचाराने शेखर नकळत दुखावला गेला. एका अर्थी बरंच झालं. ही राजकारणाने झपाटलेली माणसं संसार म्हणजे दुय्यम मानतात. कल्पना आता दुसऱ्या कोणाची तरी होणार. तिच्याबरोबरचा आपला ऋणानुबंध आता संपला.
कल्पनाला पण नाही म्हटलं तरी थोडं वाईट वाटत होतं. शेखर तिचं पहिलं प्रेम होतं. मनाच्या एका कोपऱ्यात त्याचं अस्तित्व कितीही नाही म्हटलं तरी राहणारच होतं. तिच्या मनात आलं शेखर दाखवत नसला तरी पण त्याला वाईट वाटलंच असणार. त्याच्या आयुष्यात नवीन ठिकाणी कोणी मुलगी आली असेल का. शेखर तसा बुजरा आहे. तो स्वतःहून कोणाशी काहीच बोलणार नाही. तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. तिने अचानक विचारले,
"शेखर मी तर आता माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करेन. नवीन ठिकाणी तुझ्या पण बऱ्याच ओळखी झाल्या असतील. त्यात मैत्रिणी पण असतील. तुला आहे की नाही कोणी मैत्रीण. मला माहित आहे तू तर कोणाशी बोलायला जाणार नाहीस. पण मुली मात्र तुझ्याशी बोलायला नेहमीच उत्सुक असतात." कल्पनाच्या बोलण्यामुळे शेखरच्या डोळ्यासमोर अंजूचा चेहरा उभा राहिला. परंतु तो सारवासारव करत बोलला,
"नाही गं माझी कोणीच मैत्रीण नाही."
कल्पना निघून गेल्यावर शेखरच्या मनात आलं चला एक ऋणानुबंध आता संपला.
(कल्पना शेखरच्या आयुष्यातून निघून गेल्यामुळे त्याच्या मनात अंजू विषयी काही वेगळ्या भावना निर्माण होतील का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा