स्वप्नसखा _भाग १७
संध्याकाळी सात नंतर अंजू लायब्ररीतून परत आल्यावर शेखर त्यांच्या घरी पोहोचला. अंजू त्याची आतुरतेने वाट पाहतच होती. ती कधीपासून आत बाहेर करत होती. इतक्यात बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला आणि जवळजवळ पळतच ती बाहेर आली. शेखरला पाहून तिला खूप आनंद झाला. रिक्षाचे पैसे देऊन झाल्यावर शेखरने पण पायऱ्या चढताना अंजूकडे पाहिले. शेखरला पण तीन-चार दिवस अंजू न दिसल्यामुळे तिची अनुपस्थिती जाणवत होती. तिने त्याला विचारले,
"कशी गेली सुट्टी."
"सुट्टी खूप छान झाली. आईने खूप आग्रह करून वाढल्यामुळे थोडं वजन वाढल्यासारखे वाटते आहे."
"आता बँकेत जायला लागल्यावर ते आपोआपच कमी होईल काळजी करू नका. याचा अर्थ तुम्हाला आग्रह केल्यावर तुम्ही भरपूर जेवता वाटते. आईला सांगायला हवं."
"नाही हा मला जेवढे जेवायचं असतं तेवढेच मी जेवतो. तू आणि आई बाबा कसे आहात."
"आई बाबा आत्ताच बाजारात भाजी वगैरे आणायला गेले आहेत. तुम्ही हातपाय धुवून फ्रेश व्हा मी तुम्हाला चहा घेऊन येते."
शेखर त्याच्या रूम मध्ये गेल्यावर अंजू त्याच्यासाठी चहा करायला किचनमध्ये गेली. तो येणार म्हणून तिने आधीच कांदे पोहे करून ठेवले होते ते थोडे गरम केले आणि पोहे घेऊन त्याच्या रूममध्ये गेली. ती आल्यावर त्याने तिच्या हातात द्राक्षांची पेटी दिली.
"सध्या द्राक्षांचा सीजन आहे म्हणून आमच्या नाशिकची प्रसिद्ध द्राक्ष घेऊन आलो आहे."
"अरे वा आम्हाला सर्वांना द्राक्ष खूप आवडतात. आधी थोडे कांदेपोहे घ्या. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते."
"तू प्रत्येक वेळी एवढा त्रास कशाला करून घेतेस मला नुसता चहा चालला असता थोड्या वेळाने तर जेवायचं आहे."
"त्रास कसला तुमच्यासाठी काही करण्यात मला आनंदच मिळतो." काय बोललो हे लक्षात आल्यावर अंजुने पटकन जीभ चावली. ती तिथेच घुटमळत राहिली. तिला त्याच्याशी बोलायचं होतं म्हणून ती म्हणाली,
"तुमच्या घरच्या काही गमती जमती सांगा की मला. तिथे तुमचे जुने मित्र मैत्रिणी तुम्ही गेल्यावर भेटायला येत असतील ना. कोणी एखादी खास मैत्रीण असेल ना त्यांच्यात." अंजूच्या प्रश्नाचा रोख कळून शेखर उत्तरला,
"खरं सांगायचं तर माझे मित्र जास्त आहेत. मैत्रिणी नाहीतच मला." हे ऐकून अंजूला खूप छान वाटलं. त्याच्याशी बोलणं वाढवण्यासाठी ती म्हणाली,
"मैत्रिणी असायला काही हरकत नाही. आपलं मन मोकळं करण्यासाठी एखादी तरी मैत्रीण हवीच." अंजूला वाटलं की तो म्हणेल की तूच माझी मैत्रीण आहेस. कसचं काय. अंजू नुसती मनातल्या मनात मांडे खात होती. इतक्यात आई बाबांचा आवाज आला म्हणून अंजू लगबगीने बाहेर आली. शेखर गालातल्या गालात हसत होता.
"अगं अंजू हे पटकन एका प्लेट मध्ये काढून आण. आज बऱ्याच दिवसांनी आप्पाकडचे गरम गरम चमचमीत बटाटेवडे खायची इच्छा झाली."
"अगं ह्यांना म्हटलं आपण उद्या करूया बटाटेवडे. पण ह्यांना त्या वासाने आताच खावेसे वाटले. मग काय आणले." इतक्यात शेखर पण बाहेर आला.
"काकू काही म्हणा घरी कितीही स्वादिष्ट बटाटेवडे केले तरी गाडीवरच्या बटाटवड्याची चव न्यारीच."
"आता तू पण ह्यांचीच बाजू घे. बरं का अंजू आज बाजारात ह्यांचे एक जुने मित्र भेटले होते. तुझी अगदी खोदून खोदून चौकशी करत होते."
"माझी चौकशी का बरं!"
"अगं त्यांचा मुलगा लग्नाचा आहे. त्यांना गावातलीच मुलगी हवी आहे. बाबांना भेटणार आहेत ते."
हे ऐकून अंजूच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
(आता अंजू काय करेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा