Login

स्वप्नसखा _ भाग १८

आधी अलिप्त असणारा तरुण नायिकेचा स्वप्नसखा कसा बनतो
स्वप्नसखा _भाग १८

ते बाबांशी नंतर बोलणार आहेत हे आईचं वाक्य ऐकून अंजूच्या पायाखालची जमीन सरकली. तिने ठरवलं समजा बाबा आणि त्यांच्या मित्रांमध्ये बोलणं झाल्यावर तो मुलगा आपल्याला बघायला आला आणि त्याला आपण पसंत पडलो तर आपलं स्वप्न हवेतच विरून जाईल. शेखरशी एकदा निर्णायक बोललेच पाहिजे. नकार असला तरी त्याने स्पष्ट सांगावं. काहीतरी शक्कल लढवलीच पाहिजे. अंजूला ती संधी लवकरच प्राप्त झाली. एक दिवस तिने लायब्ररीत सुट्टी घेतली त्यामुळे संध्याकाळी ती घरीच होती. आईबाबा पण लवकरच बाहेर पडले होते. शेखरच्या बँकेत इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते घरी लवकर आला.

शेखरला लवकर घरी आलेलं पाहून ती आनंदली. आल्या आल्याच शेखरने सांगितले की त्याला फक्त चहाच हवा आहे. अंजूने तातडीने चहा केला आणि त्याच्या खोलीत गेली. चहा देता देता ती बोलली,

"शेखर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्या दिवशी आईने बाबांच्या मित्राच्या मुलाविषयी सांगितलं ते तुम्ही ऐकलं असेलच. मला असं वाटतंय की आई बाबा माझं त्या मुलाशीच माझं लग्न करून देतील. तुम्हाला माझ्याविषयी काही वाटत नाही हे माझ्या लक्षात आलं आहे. मी तुम्हाला लिहिलेली पत्र तुम्ही फाडून टाकली आहेत ना. फाडली नसतील तर ती मला आताच परत करा. उगाच त्या पत्रामुळे पुढे मागे काही गोंधळ नको. तुम्ही सुद्धा विसरून जा की मी तुम्हाला पत्रं लिहिली होती आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आहे."

"अंजली खरं सांगू का मी ती पत्र फाडली नाहीत. इतक्या सुंदर भाषेत तु तुझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझी हिंमतच झाली नाही फाडायची. दुसरं म्हणजे मी तुझ्या आई बाबांच्या उपकाराखाली आहे. मी तसा विचार कधी केलाच नाही. तु मला थोडा वेळ दे. मी तुला सांगतो."

"आता आई बाबा येतील मी जाते बाहेर. माझ्यावर आता खूप दडपण आलं आहे." आई बाबा आले आणि त्यांनी शेखरला घरात पाहून विचारलं,

"शेखर तू लवकर आलास. तुझी तब्ब्येत बरी आहे ना."

"हो काका बँकेत आज इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यामुळे लवकर काम थांबवावं लागलं."

"अगं अंजू उद्या ताई येणार आहे दोन दिवसांसाठी. जावईबापू कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहेत." ताई येणार म्हणजे आपण ताईला सांगून आईबाबांच्या कानावर आपल्या प्रेमाबद्दल घालू शकतो. कदाचित शेखर उपकाराच्या ओझ्याखाली आपल्याबद्दल काहीच विचार करत नसेल.

रात्री झोपताना शेखर विचार करत होता. नाही म्हटलं तरी अंजूच्या समंजस स्वभावामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल थोड्याफार हळुवार भावना निर्माण झाल्या होत्या. कदाचित काका काकूंना काहीच आक्षेप नसावा आपण उगाचच घाबरत आहोत. अंजूचे आपल्यावर मनापासून प्रेम आहे त्यामुळे ती शेवटपर्यंत आपली साथ निभावू शकेल. शिवाय तिच्यावर चांगले संस्कार आहेत. ती आपल्या आईबाबांशी पण प्रेमाने, आदराने वागेल हयात काही शंकाच नाही. आता आपल्याला कल्पनाचे पण काही बंधन नाही. तसेही त्याने कुठेतरी वाचलेले त्याला आठवलं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करावं. म्हणजे
संसाररुपी सागरात सुखाची भरती असते. त्याने मनोमन अंजूला हो म्हणण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला शांत झोप लागली.

(अन्जुचे स्वप्न साकार होईल का? तिचा स्वप्नसखा तिचाच होईल का पाहूया पुढील भागात)