स्वप्नसखा _भाग १९
दुसऱ्या दिवशी अंजू कॉलेज मधून आली तेव्हा अनिता आली होती. अंजुने ठरवलं की जेवण झाल्यावर लायब्ररीत जायच्या आधी ताईशी बोलायला हवं. जेवल्यावर आई बाबा जरा आडवे झाल्यावर अंजू ताईला म्हणाली,
"बाबांच्या मित्राचा मुलगा आहे त्याबद्दल बाबा आणि त्यांच्यात काही चर्चा चालू आहे माझ्या लग्नाची. ताई आता मी तुला खरं सांगते माझं शेखरवर प्रेम आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे." ताई आनंदाने मोठ्याने बोलली,
"अंजू हे मी तेव्हाच ओळखलं होतं. शेखर खूप चांगला मुलगा आहे. मी त्याला जास्त भेटली नाही पण एखाद्याची परीक्षा अगदी लगेच होते. अगं हे तू तुझ्या बाजूने बोलते आहेस. त्याचं पण तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे तुला कळलं आहे का."
"तेच ना ताई. अगं तो आई बाबांच्या उपकाराखाली दबला गेला आहे. त्याला वाटतं की त्याने माझ्याशी लग्न करणं म्हणजे त्यांचा विश्वासघात करण्यासारखं आहे. तूच आता हे त्रांगडे सोडव."
"हे बघ तू काळजी करू नकोस. आई बाबा उठले की शेखर घरी यायच्या आधी मी त्यांच्याशी बोलेन." आता कुठे अंजूच्या जीवात जीव आला.
दुपारचा चहा झाल्यावर लायब्ररीत जायला थोडा वेळ असताना अनिताने शेखरचा विषय काढला.
"बाबा शेखरला इथे राहायला येऊन दहा अकरा महिने झाले असतील ना. भाडं वगैरे वेळेवर देतो ना!"
"अगं अनिता शेखरसारखा लाख मुलगा दिवा घेऊन शोधला तरी मिळणार नाही. तू भाड्याचे काय विचारतेस! तो अधून मधून घरी येताना खाऊ आणतो, कधी भाजी पण आणतो. इतकंच काय हिने कधी हे संपलं आहे, ते संपलं आहे असं सांगताना त्याच्या कानावर आलं तर ते पण घेऊन येतो. खूप गुणी मुलगा आहे."
"अहो बाबा इतका गुणी मुलगा घरात असताना तुम्ही अंजूसाठी तुमच्या मित्राचा मुलगा का बघता आहात? हे असं झालं ना की काखेत कळसा आणि गावाला वळसा. तुम्ही एकदा शेखरला विचारून तर बघा. त्याचं दुसरीकडे काही असेल तर फार तर तो नाही म्हणेल."
"अगं अनिता माझ्या मनातलं बोललीस. हे कितीतरी दिवस आमच्या दोघांच्याही मनात आहे. आम्ही दोघेच असताना कितीतरी वेळा बोलतो पण आपल्याला एक जावई तर खूप चांगला मिळाला आहे. आता शेखर आपला जावई झाला तर किती छान होईल. पण नंतर मनात येतं की शेखर किती देखणा आहे. शिवाय बँकेत ऑफिसर आहे. त्याच्या काय अपेक्षा आहेत माहिती नाही ना. अंजू तुला आवडतो का शेखर!"
अंजू लागलीच तिथून उठून निघून गेली.
"अरे बापरे ही लाजली वाटतं. तिने अजिबात जाणवूही दिलं नाही की तिला तो आवडतोय. अर्थात आपले संस्कारच तसे आहेत."
"बाबा आज मी पण आहे तर रात्री जेवल्यावर गप्पा मारताना तुम्ही सहज म्हणून हा विषय काढा."
"बरं बाई तू म्हणतेस तर विचारून बघतो. शेखर माझा जावई झाला तर सोन्याहून पिवळे. आम्हाला तरी दुसरं काय हवंय."
आता अंजूच्या हृदयाची धडधड वाढली होती. काय होईल कळत नाही. तिने लायब्ररीत जायची तयारी केली. निघताना तिने लाजतच सांगितलं,
"मी येते लायब्ररीत जाऊन."
ती जातानाच गणपतीच्या देवळात गेली. तिने मनोभावे आपली ईच्छा व्यक्त केली.
(बाबा शेखरकडे विषय काढतील का! त्याचं उत्तर काय असेल बघूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा