स्वप्नसखा _भाग २०
अंजू लायब्ररीतून घरी आली तेव्हा सगळेच जण ओसरीवरच गप्पा मारत बसले होते. आज अंजुने अबोली रंगाची केशरी काठ असलेली कलकत्ता कॉटन ची साडी नेसली होती. ती तिच्या गव्हाळ रंगाला शोभून दिसत होती. केसांची पाठीवर सैलसर वेणी सोडली होती. कानातले झुमके तिच्या हालचालींबरोबर हलकेच हिंदकळत होते. शेखर आल्यापासून ती तिच्या साजशृंगाराकडे जास्तच लक्ष देत होती. ती आल्यावर तिने प्रथम शेखकडेच पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या मनात आलं अंजू खूप सुंदर नसली तरी तिच्यात एक प्रकारचा चार्म आहे. तिचे डोळे टपोरे आणि बोलके आहेत. बोलण्यात एक प्रकारचे मार्दव आहे. आताच काकू म्हणाल्या अंजू सुंदर गाते. खरं तर ती नुसती बोलते तेव्हा तिच्या आवाजातील गोडवा जाणवतो. शेखरला वाटलं अंजलीकडे आपण याआधी इतक्या बारकाईने पाहिलेच नाही कारण आपल्या डोळ्यांवर कल्पनाचे झापड होते. शेखर आणि अंजू दोघांचीही नजर एकमेकांत गुंतली होती. आजूबाजूला कोणी आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. त्या दोघांना भानावर आणण्या करता अनिता म्हणाली,
"अगं अंजू ये ना अशी बावरल्यासारखी पायरीवरच का थांबलीस?"
"हो हो ना. तुम्ही सर्व आज इथे कसे बसले म्हणून जरा आश्चर्य वाटले. ताई काहीही म्हण तू आलीस की घरात चैतन्य निर्माण होतं."
"हे अगदी खरं आहे. कसं असतं ना मुलीच्या लग्नाआधी ती घरी असते. आपल्याला माहित असतं की ती इथेच आहे आपल्याबरोबर. त्यामुळे घरातील इतर सदस्यांसारखीच ती असते. पण लग्न झाल्यावर माहेरी ती अगदी थोड्या काळासाठी येते त्यामुळे ती आपल्या सर्वांची केंद्रबिदू होते. आणि म्हणूनच अनिता तू चार दिवसासाठी आलीस तरी फक्त चार तासांसाठी आली आहे असंच वाटतं."
"अंजू जा तू हात पाय धुऊन कपडे बदलून ये तोपर्यंत आम्हाला शेखरशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे." हे नुसतं ऐकलं तरीही अंजूच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. तिला हा विषय कोणता ते नक्कीच माहीत होतं. अंजू आत गेल्यावर बाबा शेखरला म्हणाले,
"शेखर तू ऐकलंच असशील की माझ्या एका मित्राचा मुलगा अंजूला बघायला येणार आहे. त्याआधी मला तुला काही विचारायचं आहे. तुझ्या घरी पण तुझं लग्नाचं बघत असतील ना. तुला कशी मुलगी हवी आहे."
"माझ्या घरी तशी माझ्या लग्नाची काही घाई नाहीये. मी आधीच सांगितले की मी चांगला स्थिरस्थावर झाल्यावरच लग्न करणार आहे. माझ्या आई-बाबांनी मी कोणत्याही मुलीशी लग्न केलं तरी चालेल असं म्हटलं आहे. कोणत्याही म्हणजे त्यांना माहिती आहे की मी लग्न करीन तर ती मला योग्य असेल अशीच मुलगी असेल." अंजूच्या बाबांच्या मनात आलं की हे एक प्रकारे चांगलं झालं. म्हणजे शेखरला अंजू पसंत असेल तर तो आपल्याला आत्ताच त्याबद्दल काही सांगू शकेल. थोडा विचार करून बाबा शेखरला म्हणाले,
"शेखर मी आता तुला थेटच विचारतो. तू आमच्या अंजूला आता एवढे दिवस पाहतो आहेस आमच्या घरातलं वातावरण आमचे स्वभाव तुला चांगलेच कळले असतील. तुला पत्नी म्हणून आमची अंजू आवडेल का? माझी मुलगी म्हणून मी सांगत नाही पण ती एक खूपच गृहकर्तव्यदक्ष तर आहेच शिवाय सर्वांना मदत करणारी अशी आहे. घरातल्या सर्वांना सांभाळून घेणारी आहे."
"काका तुम्ही मला असं अचानक विचारलं त्यामुळे माझा थोडा गोंधळ उडाला आहे. मी तुम्हाला थोडा विचार करून सांगितलं तर चालेल का. मुख्य म्हणजे मला त्याआधी अंजूशी थोडं बोलायचं आहे."
"अरे हो शेखर काही हरकत नाही असं काही लगेच तू उत्तर दिलं पाहिजे असं नाही. शिवाय अंजुशी तुला बोलायचे तर उद्या अनायसे रविवार आहे. आपल्या गावात एक सुंदर टेकडीचा परिसर आहे. तू आणि अंजू संध्याकाळी तिथे फिरायला जा म्हणजे तुम्हाला एकांतात नीट बोलता येईल."
"तुम्ही अंजूला याबद्दल काही बोलला आहात का तिच्या मनाचा कौल घेतला आहात ना!"
"हो म्हणजे काय तिच्या मनाचा कौल घेऊनच आम्ही तुला विचारतो आहोत."
(शेखरला माहिती आहे अंजूचे त्याच्यावर प्रेम आहे आता तो काय ठरवेल हे पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा