Login

स्वप्नसखा _ भाग २१

आधी अलिप्त असणारा तरुण नायिकेचा स्वप्नसखा कसा बनतो
स्वप्नसखा _भाग २१


अंजू जरी हातपय धुवायला आत मध्ये आली असली तरी तिचे कान बाबा बाहेर शेखरशी काय बोलतात याकडेच लागून राहिले होते. जेव्हा तिने ऐकलं की तू आणि अंजू उद्या गावातील टेकडीवर जाऊन फिरून या ती एकदम मोहरून गेली. तिच्या डोळ्यासमोर ती आणि शेखर हात धरून टेकडी चढतायेत असं दृश्य आलं. चढता चढता तिचा एकदम तोल जातो आणि शेखर तिला सावरून धरतो. शेखरच्या त्या काल्पनिक स्पर्शाने सुद्धा अंजू रोमांचित झाली. ती अशी कल्पनाचित्र रंगवत असतानाच सर्व आत मध्ये आले. बाबा म्हणाले,

"अंजू उद्या शेखरला आपल्या गावातील टेकडी दाखव बरं का." दोघांना मस्करीत अनिता म्हणाली,

"टेकडीवर काय काय आहे ते बाबा विचारणार आहेत शेखर तेव्हा नीट लक्ष देऊन टेकडी बघ बरं का.". सगळे हसायला लागले. चहा घेतल्यावर शेखर त्याच्या खोलीत गेला. अंजुने आई बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिले. दोघेही खूप समाधानी दिसत होते. बाबा घरामागच्या बागेत गेले आणि आई तिची आवारावर करायला गेल्या. अनिता आणि अंजू दोघी पुन्हा बाहेर ओसरीवर आल्या.

"एका माणसाची कळी अशी अवेळी कशी खुलली बुवा. चेहरा कसा एकदम चमकायला लागला आहे."

"ताई तू पण ना काहीही बोलतेस. अगं पण शेखरला माझ्याशी काय बोलायचं असेल काही कळत नाही. तो आमच्या लग्नाला होकार देईल ना."

"अंजू तू आता नसत्या शंका काढू नकोस. उद्या संध्याकाळी छान तयार होऊन त्याच्या बरोबर जा आणि आल्यावर मला सांगण्यासारखं असेल ते सांग. अगदी सगळं सांगण्याची काही गरज नाही."

"ताई" असं बोलून ती आत जायला उठली आणि न बघता दारातून आत शिरली आणि तिची शेखरशी टक्कर झाली. अगदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे शेखरने अंजुला सावरले नाहीतर ती पडणारच होती. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत त्याच स्थितीत होते. पहिल्यांदाच एकमेकांचे स्पर्श झाल्यामुळे दोघांच्या हृदयात अनामिक धडधड होत होती. इतक्यात अनिता तिकडे येत म्हणाली,

"शेखर ती नाही पडणार. आता सोडा तिला."

शेखरने अंजुला पटकन सोडलं आणि तो "मी आलोच" म्हणत घराबाहेर गेला. शेखर ह्यावेळी कुठे गेला असेल ह्या विचारात अंजू आईला मदत करायला गेली. रात्रीची जेवणं झाल्यावर सर्व झोपायला गेले पण अंजुला काही केल्या झोपच येईना. तिला उद्याची संध्याकाळ कधी होते असे होऊन गेलं होतं. ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता ती झोपेच्या अधीन झाली.

इकडे शेखर पण विचार करत होता आपण लग्नाच्या आधी अंजुला कल्पना बद्दल सगळं सांगायला हवं. उद्या इतर कोणाकडून तिला काही कळलं तर तिला खूप वाईट वाटेल. तिला सांगितल्यावर ती तिचा निर्णय बदलेल का. ती आपल्यावर प्रेम करत असली तरी होणाऱ्या नवऱ्याचं आधी कोणावर तरी प्रेम होतं हे कोणी स्वीकारू शकत नाही. तरी सुद्धा मला तिला सांगावेच लागेल. त्याचा निर्णय पक्का झाल्यावर त्याला झोप लागली.

(शेखरचे कल्पनावर प्रेम होते हे ऐकून अंजूला काय वाटेल पाहूया पुढील भागात)