Login

स्वप्नसखा _भाग २२

आधी अलिप्त असणारा तरुण नायिकेचा स्वप्नसखा कसा बनतो
स्वप्नसखा _भाग २२


दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासूनच अंजूची लगबग चालली होती. संध्याकाळचे चार वाजतात कधी आणि आपण शेखर बरोबर टेकडीवर जातो कधी असं तिला झालं होतं. अनिता तिच्या हालचाली गालातल्या गालात हसत पहात होती. तिला अंजूचा उतावळेपणा पाहून खूप मजा येत होती. अर्थात तिला माहिती होतं की प्रत्येक मुलीची हीच अवस्था असते. शेखरला पण अंजुला असं एकांतात भेटण्याची ओढ लागलीच होती. काय कपडे घालायचे हे सुद्धा त्याने ठरवून ठेवलं होतं.

दुपारी चहा झाल्यावर दोघांनी निघायचं ठरवलं होतं. अंजू शेखर बरोबर जाण्यासाठी म्हणून खास वेळ घेऊन तयार झाली होती. ती मोरपिशी रंगाची सिल्कची सुंदर साडी नेसली होती. त्याच रंगाच्या बांगड्या तिने घातल्या होत्या. तिच्या मनात येत होतं आज आपल्या वेणीवर माळायला गजरा नाही. इतक्यात अनिता तिकडे आली आणि तिने तिच्या वेणीवर गजरा माळून दिला. ती सकाळी मैत्रिणीकडे म्हणून गेली होती तेव्हा तिने मोगऱ्याचे गजरे आणले होते. मोगऱ्याच्या सुगंधाने अंजूच्या चित्तवृत्ती बहरून आल्या. शेखर तयार होऊन बाहेर येऊन बसला होता. अंजू तयार होऊन बाहेर आली आणि शेखर ने तिच्याकडे नखशिखांत पाहून घेतले. अंजू खूपच स्मार्ट दिसत होती. मग ते दोघं निघाले.

हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणात गारवा होताच. दोघं चालतच निघाले होते.

"साधारण किती वेळ लागतो टेकडीवर जायला" शेखर ने विचारले.

"पंधरा मिनिटात जाऊ आपण. मध्ये एक उसाच्या रसाचा गुऱ्हाळ आहे तिथे उसाचा रस खूप सुंदर मिळतो आपण त्याचा आस्वाद घेऊ आणि मग पुढे जाऊ." रस पिण्यासाठी दोघेजण थांबले असतान गुऱ्हाळवाले दादा म्हणाले,

"काय ताई लगीन ठरलया का"

अंजूला एकदम लाजल्यासारखे झाले. दोघे टेकडी जवळ आल्यावर चढायला लागले तेव्हा अंजुला वाटत होतं की शेखरने तिचा हात धरावा. आणि शेखरला वाटत होतं की आपण अंजूचा हात धरलेला तिला आवडेल का. मध्येच एका उंच पायरीजवळ अंजू अडखळत असताना शेखर ने तिला हात दिला. त्याच्या हातात हात दिल्यावर तिच्या मनात आलं माझा हात त्याच्या हातात जीवनभर राहू दे. दोघांनी वरती आल्यावर आधी देवळात जाऊन देवीचे दर्शन घेतलं.

टेकडीवर जास्त वर्दळ नव्हती. एक मोठा खडक बघून दोघे तिकडे बसले.

"या टेकडीवर तू आधी सुद्धा आली असशील ना अंजू."

"हो आम्ही मैत्रिणी, घरातले बरेच वेळा आलो होते टेकडीवर. कोजागिरीला तर गावातली खूप लोक टेकडीवर येतात. इथून पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन घेणं म्हणजे स्वर्गसुख असतं. आपण पण आपलं लग्न झाल्यावर येऊया कोजागिरी पौर्णिमेला." असं बोलल्यावर अंजुने जीभ चावली. शेखर हसून म्हणाला,

"हो नक्की येऊया. अंजू लग्न व्हायच्या आधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यानंतर तुला तुझा निर्णय बदलायचा असेल तर तू बदलू शकतेस."

अंजू विचार करू लागली असं हा काय सांगणार आहे की ज्यामुळे आपण आपला निर्णय सुद्धा बदलू शकतो. तिने पुन्हा देवीला प्रार्थना केली माझ्या स्वप्नांचा चुराडा होऊ देऊ नकोस.

(शेखरने अंजुला त्याच्या प्रेमाबद्दल सांगितल्यावर ती तिचा निर्णय बदलेल का पाहूया पुढील भागात)