स्वप्नसखा _ भाग २३(अंतिम)
शेखर काय बोलणार आहे ते त्याने बोलावं म्हणून अंजुने वाकून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
त्याने पण तिची उत्सुकता ताणून न धरता बोलायला सुरुवात केली.
"अंजू मध्ये मी घरी जाऊन आल्यावर तू मला विचारलं होतंस मला कोणी मैत्रीण आहे की नाही. तेव्हा मी कोणी मैत्रीण नाही असं म्हटलं होतं. पण अंजू मी कॉलेज मध्ये असताना माझं एका मुलीवर प्रेम होतं. अर्थात तेव्हाही तिनेच पुढाकार घेऊन माझ्याशी मैत्री केली. मला पण ती आवडली आणि आम्ही दोघंही एकमेकांवर कधी प्रेम करू लागलो आम्हाला कळलंच नाही. तिचे वडील राजकारणात होते. तिला सुद्धा राजकारणात खूप रस होता. मला राजकारणाचा प्रचंड तिटकारा आहे. ह्या गोष्टीवरून आमचे मतभेद झाले आणि आमचे मार्ग वेगळे झाले. आता म्हणजे गेल्या तीन चार वर्षांपासून आमची काहीच गाठभेट नाही. आता गेलो होतो तेव्हा ती लग्नाची पत्रिका द्यायला आली होती. पुढच्याच महिन्यात तिचं लग्न आहे. आता हे ऐकून तुला तुझा निर्णय बदलायचा असेल तर तू बदलू शकतेस. मी तुला आता हे सांगण्याचं कारण म्हणजे उद्या तुला दुसरीकडून हे कळलं तर आपल्यात गैरसमज व्हायला नकोत."
"शेखर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही तुमच्या भुतकाळाबद्दल मला काही सांगितलं नसतं तरी मला काहीच वाटलं नसतं. मी तुम्हाला पहिल्या प्रथम पाहिलं तेव्हाच माझं मन तुमचं झालं. तुम्ही ही गोष्ट मला सांगून तुम्ही मनाचे किती सच्चे आहात हे दाखवून दिल. मला खात्री आहे आपलं नातं शेवटपर्यंत अबाधित राहील."
"अंजू मला पण तुझ्याबद्दल तीच खात्री आहे म्हणून तर मी तुझ्याशी लग्नाला तयार झालो. मी जरी तुझ्याकडे पहायचो नाही तरी तुझ्या उत्कट प्रेमभावना मला आज पर्यंत नेहमीच जाणवत आल्या आहेत. एक मुलगी असून तू मला पत्र लिहिण्याचा धीटपणा दाखविला त्यातूनच तुझ्या प्रेमाची गहराई कळून येते."
"शेखर मी माझ्या आई-बाबांकडे बघते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की नवरा बायको मध्ये असंच नातं असलं पाहिजे. प्रेम प्रत्येक वेळी बोलूनच व्यक्त व्हायला हवं असं नाही ते कृतीतून पण कळतं. माझ्या आई-बाबांच्या वेळी तर ठरवून लग्न व्हायची आणि सहवासाने प्रेम वाढत जायचं. त्यांनी त्यांच्या प्रेमभावना नेहमीच नजरेतून आणि कृतीतून दाखवून दिल्या. आम्ही काही पैशाने फार श्रीमंत नाही. परंतु एकमेकांबद्दल जिव्हाळ्याचे बंध कायमच आहेत."
"हो गं अगदी खरं आहे. माझ्या आई-बाबांमध्ये पण असंच सुंदर नातं आहे. म्हणूनच मला पहिल्या दिवसापासून तुमच्या घरी कधी परकेपणा जाणवलाच नाही. असं वाटायचं की आपण आपल्याच घरात राहतोय. काका काकूंनी मला आपलं मानलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे."
"तुमचा स्वभाव पण खूप चांगला आहे. तुम्ही आल्या दिवसापासून आमच्या सर्वांमध्ये मिसळून गेला आहात."
"अंजू तुझ्या स्वभावातील साधेपणा मला खूप भावतो आणि मला हेही माहितीये की तू अडचणीत असलेल्यांना नेहमी मदत करतेस. मला त्या आजीने तुझ्याबद्दल सांगितलं आहे. आज आपण पहिल्यांदाच भेटलो त्याची आठवण म्हणून मी तुझ्यासाठी छोटीशी भेट आणली आहे."
"अय्या मी सुद्धा आपली पहिली भेट संस्मरणीय ठरावी म्हणून एक छोटीशी वस्तू आणली आहे. आधी तुम्ही काय आणले ते दाखवा."
शेखरने पॅन्टच्या खिशातून सुंदर लांबट आकाराची डबी काढली आणि अंजूच्या हातात दिली.
"तूच बघ उघडून आत काय आहे ते." त्यात एक सुंदर पेन होतं. आनंदाने म्हणाली,
"किती सुंदर पेन आहे. काय विलक्षण योगायोग आहे मी सुद्धा तुमच्यासाठी एक पेनच आणले आहे."
"हे नुसतं पेन नाहीये ह्या आपल्या भावना आहेत. लग्न झाल्यावर पण तु मला प्रेमपत्र लिहू शकतेस बरं का!"
"शेखर आता तुम्हाला सुद्धा मला एक सुंदर प्रेम पत्र लिहावं लागेल."
"हो नक्की लिहीन पण त्यासाठी मला तुझी प्रेमपत्र वाचून सराव करावा लागेल. त्यासाठी तुला भरपूर प्रेमपत्र लिहावी लागतील. मी असा एकांतात एखाद्या ओढ्याच्या काठी तुझी पत्र वाचत गालातल्या गालात हसत स्वप्नरंजनात, सभोवताली तू आहेस असं समजून रंगून जाईन अगदी एखाद्या सिनेमात दाखवतात तसं."
"तुम्ही पण किती छान बोलता अगदी ऐकत राहावं असं वाटतं."
शेखरने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला अलगद मिठीत घेतलं. अंजुने पण त्याच्या खांद्यावर मान ठेवून मावळत्या दिनकराच्या साक्षीने आपल्या स्वप्नसख्याला मिठी मारली. तिचा स्वप्नसाखा आता कायमचा तिच्या हृदयात राहणार होता.
समाप्त
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा