Login

स्वप्नयात्रा

बहीण भावाच्या स्वप्नांसाठी सर्व काही त्याग करते आणि मोठं झाल्यावर भाऊ तिचं स्वप्न पूर्ण करतो. दोघांची साथ त्यांना यशापर्यंत पोहचवते.
स्वप्नयात्रा


आरव आणि त्याची मोठी बहीण सायली हे दोघेही साध्या कुटुंबात वाढलेले. वडील ऑटो चालवायचे आणि आई घरी शिवणकाम करून घरखर्चाला हातभार लावायची. घरात जास्त पैशांचा ओघ नव्हता, पण स्वप्न मात्र मोठी होती, विशेषतः आरवची.

लहानपणापासून आरवचं एकच स्वप्न, इंजिनियर व्हायचं. कुठेही एखादी जुनी मशीन दिसली की तो ती उघडून त्यात काय आहे ते पाहायचा. घरातल्या सगळ्यांना त्रास व्हायचा, पण सायली मात्र नेहमी त्याला प्रोत्साहन द्यायची.

“काहीतरी वेडं स्वप्न बाळगतोस तू… पण मला माहित आहे, एक दिवस नक्की जमवशील,” ती त्याला म्हणायची.

सायलीला मात्र आपलं शिक्षण दहावीपर्यंतच करता आलं. घरची परिस्थिती परवडत नव्हती म्हणून ती शिवणकाम शिकली आणि आईसोबत काम करू लागली. ती नेहमी म्हणायची, “माझं स्वप्न तितकं मोठं नाही… पण मी तुझं स्वप्न पूर्ण होताना पाहणार!”

काळ जसजसा गेला…आरव बारावीत आला. त्याने CET, JEE सारख्या परीक्षांची तयारी सुरू केली. कॉलेजची फी, क्लासेस, पुस्तके‌ सगळं खूप महाग होतं. वडिलांना जमत नव्हतं. आईने हिशेब काढला, पण हातात पैसे पुरतच नव्हते.

त्या रात्री सायली बराच वेळ शांत होती. आई-वडील झोपल्यानंतर तिने आपली जुनी बिसकिटाची पेटी काढली. त्यात बऱ्याच वर्षांची साठवलेली शिलाईची कमाई होती, जेमतेम काही हजार. पण तिच्या डोळ्यात आशा होती.

“इतकं पुरेल ना?” तिने स्वतःलाच विचारलं आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण रक्कम आईच्या हातात दिली.

आईला डोळ्यात पाणी आलं. “ तुझं काय? तूच स्वतःचं जीवन सांभाळायचं ना?”

सयाली हसली, “माझं आयुष्य नंतरही सांभाळता येईल. आरवचं स्वप्न आत्ता सांभाळायला हवं.” आरवला हे माहितही नव्हतं.

आरवने मन लावून अभ्यास सुरू केला. घरात सुविधा खूप कमी, टेबल नव्हे तर पडद्यामागच्या छोट्या कणसावर बसून अभ्यास करायचा. लाईट गेली तर मेणबत्ती पेटवून गणिताचे प्रश्न सोडवायचा.

सायली मात्र रात्री उशिरापर्यंत कपड्यांवर लेस लावत बसायची. शिवणयंत्राचा आवाज आणि अभ्यासाचा पानांचा आवाज, दोघांची मेहनत एकाच छताखाली एकत्र धडधडत होती.

कधी कधी आरव थकून जायचा, उत्साह कमी व्हायचा.
एकदा तर त्याने पुस्तक बंद केले, “दीदी, मला वाटतं मी नाही करू शकत. एवढं कठीण आहे… आपण का एवढा त्रास घेतोय?”

सयालीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “अरे, त्रास घेतोय कारण हे आपलं स्वप्न आहे. जिंकायचंय आपल्यालाच.”

तिच्या आवाजात अशी शक्ती होती की आरव पुन्हा बसून अभ्यास करायचा.

परीक्षेचा दिवस आला. जसजश्या परीक्षा जवळ आल्या, तसा ताण वाढत गेला. पण आरवने तयारी केली होती. परीक्षेच्या दिवशी घरात शांतता होती. सयालीने त्याला डब्यात आलू पराठा ठेवला.

“यशाचा पहिला घास मी तुला आज देणार आहे,” ती म्हणाली. किती साधं वाक्य होतं, पण त्या दिवशी आरवला ते शक्ती देऊन गेलं.

निकालाचा दिवस आला. निकालाच्या दिवशी आरवचा हात थरथरत होता. तो स्कोअरकार्ड पाहतो तर त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले होते! तो आनंदाने ओरडला आणि सरळ सायलीच्या मिठीत गेला.

“दीदी, जमलं! मी जमवलं!” आई-वडीलही भावुक झाले. पण खरे आनंदाश्रू तर सायलीच्या डोळ्यातून वाहत होते.
“मला माहित होतं… तू हे करू शकतोस!”

कॉलेजच्या फीचा प्रश्न आला. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मोठी फी लागणार होती. वडिलांनी विचारलं,
“आपल्याकडे एवढे पैसे नाहीत… काय करू?”

सायलीने हसत उत्तर दिलं, “आपण काहीतरी नक्की मार्ग काढू.”

तिने जवळच्या बुटिकमध्ये अधिक वेळ काम करायला सुरुवात केली. तिचा दिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत भरलेला. कधी हाताला सूया टोचून रक्त यायचं, कधी डोळे दुखायचे. पण ती कधी तक्रार करायची नाही.

निर्णय झाला, आरवचं भविष्य महत्वाचं. हळूहळू पैसे जमा झाले आणि शेवटी त्याचा प्रवेश झाला.

आरवने कॉलेजमध्ये खूप मेहनत केली. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो नाव कमवू लागला. स्वतःच्या मेहनतीसोबत त्याला सतत बहीणीचा संघर्ष आणि तिचं प्रेम आठवायचं.

त्याने ठरवलं, “मी बहीणीसाठी काहीतरी मोठं करून दाखवणार.”

चार वर्षांनी…

आरव इंजिनियरिंग पूर्ण करून एका मोठ्या कंपनीमध्ये निवडला गेला. त्याचा पहिला पगार आला.

त्या दिवशी तो सरळ बुटिकमध्ये गेला. सायली नेहमीप्रमाणे शिवणकाम करत होती.

आरवने तिच्या हातात लिफाफा ठेवला. “दीदी, हा माझा पहिला पगार… आणि हा तुझाच आहे. कारण माझ्या प्रत्येक यशात तुझा वाटा सर्वात मोठा आहे.”

सायली स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ वाहू लागला. “मी काही केलं नाही रे… तूच मेहनत केलीस,” ती म्हणाली.

आरवने हळू आवाजात उत्तर दिलं, “माझी मेहनत प्रकाश होती… पण तूच माझा दिवा होतीस.”

आरवला बहीणीचा एक छोटा ध्यास माहित होता, तिला स्वतःचं छोटंसं बुटिक सुरू करायचं होता. त्याने काही काळानंतर तिला मोठं सरप्राइज दिलं.

एक दिवस त्याने तिला एका जागेवर नेलं. एक सुंदर छोटं दुकान, आत टेबल, मशीन, कपड्यांचे स्टँड सजलेले.

“दीदी, हे तुझं बुटिक आहे. ‘सायली क्रिएशन्स’, तू मला उभं केलंस… आता तुझी वेळ आहे चमकण्याची.”

सायलीचा आवाज गळून गेला. ती एकच वाक्य म्हणू शकली, “माझा भाऊ माझं स्वप्नही पूर्ण करेल… हे मी कधी कल्पनाही केली नव्हती.”

आरव नोकरीत चांगलं काम करू लागला. सायलीचं बुटिकही वाढू लागलं. दोघांनी मिळून घरातले सर्व दिवस बदलले. त्यांच्या कुटुंबाने कधी स्वप्नं मोठी पाहिली नव्हती… पण त्यांनी दाखवून दिलं, स्वप्न मोठं नाही,
ते पूर्ण करण्याची इच्छा मोठी असते आणि साथ असेल तर अशक्यही शक्य होतं.


समाप्त
0