Login

स्वरागिनी भाग 3

Marathi Story
स्वरागिनी भाग 3

मागच्या भागात, रागिनीने गाणं शिकण्याचा विचार सोडून दिल्याचे आपण वाचले. आता पुढे
*****

रागिनी ने गाणं विसरायचं ठरवलं होतं पण बाबांचं स्वप्न आणि गाणं काही तिच्या मनातून जात नव्हतं. तशातच तिला आधार मिळाला तो तिच्या सासर्‍यांचा. (मधुकर रावांचा).
मधुकरराव स्वभावाने चांगले होते.घरात घडणाऱ्या गोष्टींकडे त्यांचे बारीक लक्ष होते पण आनंदी ताई समोर त्यांचं काही चालायचं नाही. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या परीने विजयला समजवण्याचा प्रयत्न केला होता पण उपयोग झाला नाही म्हणून मग त्यांनी स्वतःच एक युक्ती लढवली होती.
विजय आणि आनंदी ताई घरात नसताना मधुकरराव आणि रागिनीची गाण्याची मैफल जमत जमत होती. रागीनी ला गाताना पाहून मधुकर रावांना ही खूप समाधान वाटे. मधुकर रावांच्या रूपाने आपले बाबाच आपली हौस पूर्ण करतात या विचाराने रागिनी ही खुश होती. पण बाबांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे दुःख मात्र तिच्या मनात दाटून येई. आपण एवढेही करू शकलो नाही याची खंत तिला आतून सतत टोचत होती.
*****
दिवसा मागून दिवस गेले, वर्षा मागून वर्ष. आई आई म्हणणारी रागिनी आता स्वतःच आई झाली होती.
पहिला मुलगा झाल्यामुळे आनंदी ताई खुश होत्या. विजयने आपल्या मुलाचे नाव विकास ठेवले होते. विकास नंतर दोन वर्षांनी अजून एका किलकारीने घर गजबजून गेले होते. यावेळी च्या किलकारीने रागिणीच्या हृदयाची धडधड वाढविली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता कारण तिला या किलकारीत सुरांचा आवाज ऐकू येत होता. तिचे मन तिला सांगत होते की ही माझी मुलगी माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करेल आणि मोठी गायिका होईल. मुलीच्या जन्माबरोबरच तिने हे पक्के केले होते की कितीही विरोध झाला तरी तिला गाणं शिकवायचं.
रागिनी कन्येचे नाव स्वरा ठेवले.
******
दोन्ही मुलं मोठी होऊ लागले.विकास चे सगळे लक्ष खेळात असायचे.लाडका नातू म्हणून आनंदी ताई त्याला मनासारखे वागू द्यायच्या. स्वरा मात्र आईचा पदर धरून मागे - मागे फिरायची. या दरम्यानच रागिनिने तिला सुरांची ओळख करून द्यायला सुरुवात केली. स्वराही सुरांकडे ओढली जात होती.एखादे गाणे तिच्या कानावर पडले की ते ती अगदी शांत चित्ताने ऐकायची. स्वराला गाणं शिकवण्याविषयी ती मधुकर रावांशीही बोलली होती.
स्वरा सात वर्षांची झाली होती.एक दिवस संध्याकाळी चार वाजता विजय आणि आनंदी ताई हॉल मध्ये बसले होते.रागिणी स्वराला घेऊन बाहेर निघाली होती.

" मी स्वराला घेऊन बाहेर चालले आहे.मला यायला थोडा उशीर होईल."
रागिणी आनंदी ताईंना म्हणाली.

'कुठे निघाल्या तुम्ही दोघी?"
चहा घेत असलेल्या विजय ने विचारले.

" स्वराला गाण्याचा क्लास लावणार आहे.आजपासून नवीन ब्याच सुरू होणार आहे. क्लास संपल्यावर तिला घेऊनच परत येईल."
हे एकूण विजय आणि आनंदी ताई दोघेही चिडले.

" काय ? कोणाला विचारून तिला गाण्याच्या क्लास ला चालवलस तू ?"
विजय ने चढ्या आवाजात विचारले.

"त्यात कोणाला काय विचारायचे? मी तिची आई आहे.याबाबतीत डिसिजन घेण्याचा मला पूर्ण हक्क आहे."
रागिणी ही चिडून म्हणाली.

यानंतर आनंदी ताई काही बोलणार तोच मधुकरराव म्हणाले,
" बरोबर आहे तिचं आणि याबाबतीत तिने मला विचारले आहे."

"तुम्हाला विचारले आणि तुम्ही लगेच हो म्हणाले."
आनंदी ताई मधुकर रावांकडे रागाने बघत म्हणाल्या.

" तुला जसा तुझ्या नातवाला चुकीच्या सवयी लावण्याचा अधिकार आहे ना तसा मला पण माझ्या नातीला चुकीच्या सवयी लावण्याचा अधिकार आहे."

आता मधुकर रावांचा देखील आवाज वाढला होता.

त्यामुळे आनंदी ताई काही बोलल्या नाही.

मधुकर राव पुढे म्हणाले,
" स्वरा गाणं शिकणार हा माझा निर्णय आहे तेव्हा कोणीही मध्ये काही बोलणार नाही.
रागिणी तू निघ, तुम्हाला उशीर होईल."

मधुकर रावांच्या या बोलण्यामुळे रागिनीची ही अजून हिम्मत वाढली. काहीही न बोलता ती स्वराला घेऊन बाहेर पडली.आज तिला सगळं आकाश मोकळं असल्यासारखे भासत होते. इथेच अर्धी लढाई जिंकल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते.मोठ्या आत्मविश्वासाने ती स्वराला घेऊन सूररंजनी या संगीत इन्स्टिट्यूट मध्ये गेली.
सूर रंजनी हे नावाजलेले संगीत इन्स्टिट्यूट होते. इथे सगळ्या प्रकारचे म्युझिक शिकवल्या जायचे तसेच गायनाचेही क्लासेस होत होते.
क्लास जॉईन करण्यापूर्वी इथे प्रत्येकाला गाऊन दाखवायला सांगायचे. रागिनीने स्वराला आत मध्ये सोडले. ती बाहेर बसली. प्रदीप गायकवाड हे गायन क्षेत्रातील नावाजलेले गायक सर्वांना गाणं शिकवणार होते. त्यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गाणं गायला लावलं. स्वराचा नंबर आला.

" बाळा ,तुझं नाव काय ?"......... प्रदीप

"स्वरा "........... स्वरा हळू आवाजात म्हणाली.

"अजून एकदा मोठ्याने सांग.".........

यावेळेस स्वरा मोठ्याने म्हणाली,
"स्वरा."

"स्वरा,अरे वा तुझं नाव तर खूपच छान आहे.
मग स्वरा कुठले कुठले स्वर माहित आहेत तुला."

यावर स्वरा काहीच बोलली नाही.

"तू आम्हाला सर्वांना गाणं म्हणून दाखवणार का?"
यावेळेस प्रदीप ने तिला जरा हसून विचारले

"हो......"

"कोणतं गाणं गाणार तू?"

"गणपती बाप्पाचं. आई म्हणते कोणत्याही कामाची सुरुवात गणपती बाप्पाला नमस्कार करून करायची असते. आज मी गाण्याचा क्लास लावणार ना मग याची सुरुवात गणपती बाप्पाला नमस्कार करून करणार."

एवढ्या वेळ शांत वाटणारी स्वरा एवढं छान बोलू शकते यावर प्रदीप चा विश्वासच बसत नव्हता. आता त्याला तिच्या बोलण्याचं कौतुक वाटलं."

"ठीक आहे मग सुरुवात कर.."........प्रदीप

स्वराने हात जोडले आणि गायला सुरुवात केली.

गजानना, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

एवढे गाऊन ती थांबली आणि म्हणाली,
" एवढेच येत मला."

तिच्या या वाक्यावर प्रदीप ला हसू आले.
त्याने तिला विचारले,
"या आधी तू गाण्याचा क्लास लावला होता का?"

"नाही."

" मग हे गायला तुला कोणी शिकवले?"

" आईने. ती खूप छान गाते."

" अच्छा, तर मग तुझ्या आईला उद्या मला भेटायला सांग."

" ती आत्ता बाहेरच थांबली आहे."
"आई आत्ता इथे आहे."

"हो, मी जाऊन बोलावू का?"

"नको तू थांब. मी सांगतो कोणालातरी "

प्रदीप ने तिथे असलेल्या मदतनिसास रागिनीला बोलवायला पाठवले.
अचानक पहिल्याच दिवशी असं बोलवल्यामुळे रागिनी थोडीशी भांबावली. 'स्वराकडून काही चुकलं की काय' असा विचार करत ती संगीत रूम मध्ये पोहोचली.

" मी आत येऊ का?"

"हो या ना."

"नमस्कार मी रागिनी स्वराची आई.
काय झालं काही चुकलं का स्वराचं.मला असं अचानक बोलावलं."
रागिनी ने जरा अडखळत विचारलं.

"अहो नाही काही चुकलं म्हणून नाही बोलावलं तुम्हाला.
आणि खरंतर इथे आलेला प्रत्येक मुलाचं काही ना काही चुकणारच कारण ते शिकण्यासाठीच तर आले आहेत."

"मग का बोलावलं मला."

"इथे मी प्रत्येकाला गाणं गाण्यासाठी सांगितलं होतं प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीचं गाणं म्हटलं. पण तुमची मुलीगी गणपती बाप्पाचं गाणं म्हणाली आणि ते म्हणण्याचं कारण ही तिने मला सांगितलं. आणि तिला गाणं शिकवणारी तिची आईच असल्याच सांगितलं. एक परिपक्व सुरांची जाणकार इथे बाहेर बसली आहे म्हटल्यावर तुम्हाला बाहेर कसं बसू देणार."

हे ऐकून रागीनीचे टेन्शन जरा कमी झालं होतं.

" हो पण आत्ता मी गात नाही लहानपणी गाणं शिकले होते."

" एकदा गाणं शिकल्यावर सहसा कोणी ते विसरत नाही. असं माझं मत आहे."
पुढे ते म्हणाले

"तुमची हरकत नसेल तर दोन ओळी गाऊन दाखवाल."

'एवढ्या मोठ्या गायकाला नाही तरी कसं म्हणायचं आणि त्याच्यासमोर गाणं गाताना काही चुकलं तर'या दुहेरी विचारात रागिनी होती.

तेवढ्यात परत एकदा प्रदीप म्हणाला,
" काय विचार करताय अहो अगदी दोन ओळी ही चालतील."

रागिनीने धीर करून गायला सुरुवात केली..

घन ओथंबून येती बनात राघू ओगिरती
घन ओथंबून येती बनात राघू ओगिरती
पंखावरती सर ओघळती झाडातून झडझडती
घन ओथंबून येती बनात राघू ओगिरती....

एवढे गाऊन रागिनी थांबली. तिथे असणारा प्रदीप सह प्रत्येक जण तिच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाला होता.
ती थांबल्यावर प्रदीप तिला म्हणाला,

" थांबलात का ?पूर्ण करा गाणं,तुमचा खूप छान आवाज आहे."

रागिनीने पुन्हा गायला सुरुवात केली. पूर्ण गाणं झाल्यावर प्रदीप ने तिला गाणं गात राहण्याचा सल्ला दिला आणि म्हणाला
" मला स्वराला शिकवायला खूप आवडेल. जिला पहिला गुरु आईच लाभली आहे ती नक्कीच सुरांवर राज्य करणार."

प्रदीपच्या या बोलण्याने रागिणीला आनंद झाला.

क्लास संपल्यानंतर ती स्वराला घेऊन सरळ आपल्या माहेरी गेली.
अनघा ताईंना नातीला आणि मुलीला बघून आनंद झाला.

" अरे माझ्या सोना आलीस तू. दादूला का नाही आणलं?"
अनघाने स्वराला विचारले.

"आम्ही सरळ क्लास वरून आलो ना इकडे म्हणून"....
स्वरा मान हलवत म्हणाली.

"कोणता क्लास?"

"गाण्याचा, आज्जी मला पण आता आईसारखे गाता येणार."
स्वरा लाडा- लाडात म्हणाली.

तिचे हे शब्द कानावर पडताच अनघाने रागिनीकडे बघितले
रागिणीच्या डोळ्यात पाणी होते ते तिने साडीच्या पदराने टिपले.
स्वराला तिने बाहेर खेळायला पाठवले आणि ती बाबांच्या फोटो समोर उभी राहून अनघाला म्हणाली,

"आई , बाबांचे स्वप्न आता माझी स्वरा पूर्ण करणार."

" अग पण विजयराव आणि आनंदी ताई."

" आई किती दिवस? अजून किती दिवस मी सगळ्यांच्या मनासारखं करायचं. माझं काय? माझं सोड आता माझ्या मुलीच्याही मनासारखं करायचं नाही का?
स्वराला गाणं आवडतं. तिनेही दुसऱ्यांसाठी स्वतःच मन मारायच. ते काही नाही आता मी कोणालाही मध्ये येऊ देणार नाही. मी स्वराला गायिका बनवणारच."

" जो काही निर्णय घेशील तो विचार करून घे बाई उगीच त्या छोट्या जीवाची ओढाताण नको."
अनघा काळजीने म्हणाली. पण त्याचबरोबर ह्या वेळेस मात्र रागिणीच्या डोळ्यात तिला आत्मविश्वास दिसत होता.

*******
मधुकर रावांच्या पाठिंबामुळे स्वराचे गाण्याचे शिक्षण व्यवस्थित चालू होते. स्वराही न चुकता रोज रियाज करत होती. तिच्याबरोबर रागिनीने ही आपला रियाज चालू ठेवला होता.स्वरा प्रदीप ची तर ती लाडकी शिष्या झाली होती.
विजय आणि आनंदी ताईंना मात्र हे आवडत नव्हते. डायरेक्ट समोर ते काही म्हणत नव्हते पण आत मधून रागिनीवर चिडत होते. त्यामुळे विजय, रागिनी आणि स्वरालाही टोचून बोलण्याची एकही संधी सोडत नव्हता.

" ये आईचे शेपूट झाल असेल बोंबलून तर जरा अभ्यासाकडे पण लक्ष द्या."
रियाज संपवून जेवायला आलेल्या स्वराला विजय म्हणाला.

निरागस स्वरा खाली मान घालून शांत बसली.

हे बोलणं ऐकून मधुकरराव मात्र चिडले. ते उपहासाने विजयला म्हणाले,
" कौतुक करता येत नसेल तर नको करू पण नीट बोलायला तरी शिक."

"काय चुकीचं बोललो मी?"

विजयच्या या वाक्यावर मधुकरराव उत्तर देणार तेवढ्यात वाद वाढू नये म्हणून रागिनीने मधुकर रावांना शांत बसण्यास खुणावले.
रागिनी ला आता स्वराच्या शिक्षणात कोणतीच अडचण नको होती. त्यामुळे जेवढे जमेल तेवढे ती वादापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती.

क्रमशः
**********
करू शकेल का स्वरा रागिणीचे आणि तिच्या बाबांचे स्वप्न पूर्ण? वाचून पुढच्या भागात.