Login

स्वतः चा खर्च भाग 4 अंतिम

स्वतः चा खर्च स्वतः उचला
स्वतः चा खर्च भाग 4 अंतिम
स्वतः उचला.

©️®️शिल्पा सुतार

मोहन ऑफिसहून घरी आला. "अनघा इकडे ये. आपल्या रूमच हे काय केल आहे? आधी हा पसारा आवर. सगळीकडे चिंध्या कात्रणे आहेत." मोहन इकडे तिकडे बघत होता.

"काही फेकू नका माझ्या कामाच्या वस्तू आहेत." अनघा आत येत म्हणाली.

" तुझ्याकडे किती ब्लाऊज आहेत. तरी का परत शिवते आहेस? त्यापेक्षा त्या वेळात वरदकडे बघितलं असतं. त्याचा अभ्यास घेत जा."

" अहो मी ब्लाऊजच्या नवीन डिझाईन तयार करते आहे. हा माझा नवीन व्यवसाय आहे." तिने उत्साहाने सांगितलं.

"म्हणजे?"

ती तिची आयडिया त्याला सांगत होती. त्याला ही ते आवडलं. "तू हे काम छान करते आहे. "

ती अतिशय व्यवस्थित काम करत होती. वाजवी रेट. लेटेस्ट डिझाईन. त्यामुळे भरपूर ऑर्डर हातात होत्या.

" काय करतेस अनघा? दुपारी मशिनचा खुप आवाज होतो. आमचा आराम होत नाही. " मालूताई चिडल्या.

" आई मी आता काही करते आहे तर थोड करू द्या ना. तुम्ही जेव्हा झोपाल तेव्हा मी मशीन बंद ठेवते. पण मला थोड तरी सहकार्य करा." काय लोक आहेत. अनघा त्यांच्या स्वभावाला कंटाळली होती.

मोहन ही ऐकत होता. तो काही म्हणाला नाही. म्हणून मालूताईंचा विरोध मावळला. तीच काम सुरू झालं.

गुंतवणूक ही विशेष नव्हती. सुरुवातीला कमी पैसे मिळत होते. तिला तिच्या मैत्रिणीने कुर्ता, ड्रेसेस शिवण्याची आयडिया दिली. तिने आधी थोडा अभ्यास केला. स्वतःचे ड्रेस शिवून बघितले. आता चांगला हात बसला. तिने कापड आणून बर्‍याच डिझाईन तयार केल्या. आता त्यांचा खप खूप वाढला होता. तिने दोन चार बुटीक मधे तिने कॉन्टॅक्ट केला. तिच्या डिझाईन तिथे ठेवल्या. सगळ्यांना खूप आवडल्या. साधे नेहमीच्या वापरा साठी छान ड्रेस होते. सगळ्यांना परवडतील असे होते. तिला भरपूर पैसे मिळत होते.

बुटीक वाल्यांनी तिला पर्स शिवायच्या आयडिया दिल्या. एक मोठी ऑर्डर हातात आली. ती तिने वेळेत पूर्ण केली.

"अनघा आपण नवीन इन्व्हेस्टमेंट करू या का?" मोहन म्हणाला.

"करा." ती वहीत हिशोब लिहीत होती.

"तुला सध्या भरपूर पैसे मिळतात. आपण जॉइन्ट अकाऊंट काढू या का? त्यात तू तुझे पैसे टाक." मोहन प्लॅन सांगत होता.

"अजिबात जमणार नाही. माझे पैसे मी ठरवेल त्याच काय करायचं. सध्या मला माझे पैसे जमा करून बुटीक टाकायच आहे." अनघा म्हणाली.

"सध्या चालू आहे ते ठीक आहे. घरून काम कर. आई बाबांकडे बघाव लागेल. " मोहन म्हणाला.

"नाही, मी आता थांबणार नाही. माझ्या पैशाच काय करायच ते मी ठरवेल. मला माझा ब्रँड काढायचा आहे."

" हे काय वागणं आहे अनघा. घर सांभाळून सगळं करायचं." मोहन म्हणाला.

" इथे पर्यंत यायला मला खूप मेहनत करावी लागली. प्लीज आता मला थांबवू नका. "

तिने दोन मशीन विकत घेतल्या. दोन मुली दुपारच्या कामाला येत होत्या. घरात गडबड होत होती.

मालूताई चिडल्या मोहन कडे कंप्लेंट केली.

" अनघा अग आई बाबांचा आराम होत नाही." मोहन म्हणाला.

तिने एक गाळा भाड्याने घेतला आता ती दहा वाजता आवरून तिकडे जात होती. वरद शाळेतून तिकडे येत होता. वरदला अनघाच्या मैत्रिणी कडे क्लास लावला.

" एवढी शिकलेली आहे. मशीन बाजूला ठेवून मुलाकडे बघ. त्याचा अभ्यास घे. " मालूताई जेवतांना म्हणाल्या. बाबा ही खूप बोलत होते.

" माझी मैत्रीण टीचर आहे. माझ्यापेक्षा ती वरदचा अभ्यास नीट घेवू शकते. एक्स्पर्टच काम त्यांना करू द्या. सगळ्यांना सगळं जमत नाही. वरद तीच ऐकतो. यावेळी बघा किती छान मार्क मिळाले आहेत. " अनघा म्हणाली.

आधी मी काही करत नव्हती तर मला कमी समजत होते. आता मी थोड काहीतरी करते तर रोज खुसपट काढतात. काय लोक आहेत. त्यांना माझी प्रगती सहन होत नाही.

दुसर्‍या दिवशी ती कामात होती तिच्या बहिणीचा फोन आला. ती खूप वेळ बोलत होती. तिने बहिणी सोबत ट्रीप बूक केली. ती खरेदीला गेली होती. वरदसाठी तिच्यासाठी खूप खरेदी झाली.

मोहन घरी आला त्याने बघितल. "अरे वाह काय काय आणलं? आम्हाला काही आणलं नाही का?"

ती जेवताना ट्रीपच सांगत होती.

"अरे वाह कधी जायच? पुढच्या आठवड्यात का?" मालू ताई म्हणाल्या.

"मी आणि वरद जाणार आहोत. तुम्ही नाही." अनघा म्हणाली.

" आम्ही का नाही?"

" तुम्ही दोघ नेहमी ट्रीपला जातात. कोणाला विचारता का? तुमच्या सारख मी परस्पर ठरवलं. आम्ही बहिणी बहिणी जाणार आहोत."

मोहन, आई, बाबा काही म्हणाले नाही.

" ती कमवते तर भारी भरते. काहीच सांगत नाही." मालूताई नाराज होत्या.

"मी हे तुमच्या कडून शिकले. तुम्ही तुमचे हिशोब मला सांगत नाही. मोहन ही, आई बाबा तुम्ही ही, तुमची किती कमाई आहे? किती सेव्हिंग आहे? मला काही माहिती नाही. मी तसच केलं. आता तुम्हाला राग का येतोय. मी किती मन मारून राहिले. तेव्हा तुम्हाला काही वाटल नाही. मी कधी एन्जॉय करायच? कधी माझ्या मनाप्रमाणे जगायचं? आता नाही मी माझी माझी फिरणार. आरामात रहाणार. माझे पैसे मी माझ्यासाठी वापरेल. " अनघा म्हणाली.

" मोहन सोबत जा. त्याला का मागे ठेवते. " मालूताई म्हणाल्या.

" त्यांना एखादी ट्रीप ठरवायची असेल तर ते ठरवतील. बूकिंग करतील. आम्हाला सांगतील. आई तुम्ही टेंशन घेवू नका. " अनघा म्हणाली.

मोहन गप्प होता. कुठेतरी त्याला अनघाच पटलं होत. तिच्या बाबतीत अन्याय झाला. जावू दे आता ती एन्जॉय करते आहे. त्याने विरोध केला नाही. उलट तिच्या अकाऊंट वर खर्चाला पैसे टाकले.

अनघा आता थांबणार नव्हती. आयुष्य मनाप्रमाणे जगणार होती.

टीव्ही वर गाण सुरू होतं.
पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे
आज मे आझाद हू दुनिया की चमन मे.

कडू असल तरी हेच सत्य आहे. बायकोचा खर्च बर्‍याच लोकांना करायचा नसतो. तिने तुमच्या लोकांसाठी जॉब सोडलेला असतो. तिचा वेळ तुमच्या साठी दिलेला असतो. ती घरातल्या जेष्ठ लोकांना सांभाळते. तीन चार वेळा स्वयंपाक करते. साफसफाई किती तरी कामे करते. तुम्हाला त्याची किंमत आहे का? तिच्या बाबतीत नेहमीच हात आकडता घेतला जातो.

ती आता तीच काहीतरी करते आहे. तिला तिथे तरी सपोर्ट करा.

दुसर्‍याचा विचार सोडा आपलं काहीतरी करा मैत्रीणींनो.
स्वावलंबी व्हा.

🎭 Series Post

View all