Login

स्वतःला शोधताना : भाग १६.

.

स्वतःला शोधताना : प्रतिलिपी भाग १६.


नवीनचा फोन ठेवून किरणने तोंडावर थंड पाणी मारले. आरशात पाहिलं, स्वतःचा भकास चेहेरा तिला पहावला नाही तिने पटकन नजर फिरवली. पोटात भुकेने खड्डा पडला होता... ती भूक फक्त अन्नाची नव्हती; आयुष्यात आलेल रिकामेपण भरून काढण्याची होती. या अवस्थेत स्वयंपाकघरात उभं राहून काही बनवण्या इतकी ताकद तिच्यात उरली नव्हती. कपाटं उघडून पाहिली, पण घरात इतरही काही खाद्यपदार्थ नव्हते. घर अचानक अधिकच रिकामं वाटू लागलं. अंगावर येणाऱ्या भिंती, उदास शांतता, आणि तिचं एकटेपण सगळं तिला खायला उठलं होतं.


क्षणभर ती तशीच उभी राहिली. मग अचानक तिच्या मनात वस्तीच्या नाक्यावर जाऊन काहीतरी खाण्याची सहज इच्छा उमटली. भुर्जीपाव, चहा जे मिळेल ते.. त्या कल्पनेत अचानक तिला एक वेगळेच स्वातंत्र्य दिसत होतं. त्याच क्षणी तिचं संस्कारी मन जागं झालं.


“किरण, रात्र खूप झालेली आहे. घरात काहीतरी बनवून खा, पण बाहेर जाऊ नकोस.”


तो आवाज तिला ओळखीचा होता... आयुष्यभर साथ देणारा. मर्यादा, शिस्त, योग्य अयोग्याची सततची जाणीव करून देणारा. पण आज तो आवाज तिला बंधन घालणारा वाटत होता. स्वतःच्या अवस्थेचा वैताग किरणच्या आतून उसळून आला. इतक्या वर्षांचा दबलेला राग, थकवा, अनामिक इच्छा एकदम वर आली.


“बस्स झालं आता,” ती स्वतःशीच पुटपुटली.
“खूप दबून जगले. प्रत्येक पाऊल टाकताना संस्कार, मर्यादा...सगळं पाळलं. पण त्यातून मला काय मिळालं?”

मनात विचारांची गर्दी झाली.


“इतक्या रात्री स्त्रिया घराबाहेर पडत नाहीत का? मी एकटी राहते म्हणून काय झालं? माझं आयुष्य माझं आहे. आज मला स्वतःसाठी जगायचं आहे.”


त्या विचारात हट्ट नव्हता; परंतु त्यात स्वतःच्या बदलेल्या निर्णयाची एक हट्टी जाणीव होती. स्वतःवरच संतापलेल्या किरणने झटकन अंगात टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली. खिशात शंभरची नोट सरकवली. दार उघडताना तिने क्षणभर थांबून श्वास घेतला... जणू अनेक वर्षे आखलेली मर्यादेची सीमा ती जाणूनबुजून ओलांडते आहे. तिने स्वास सोडला आणि पोटपूजेच्या निमित्ताने ती नाक्याच्या दिशेने निघाली.


इतक्या रात्री नाक्यावर भुर्जीपावच मिळेल, हे तिला माहीत होते. काहीतरी त्वरित मिळावे, आणि पोटातील आग शांत व्हावी इतकाच विचार करून किरण बाहेर पडली. बाहेरची हवा जरा जास्तच थंड झाली होती, फुलहाताचा टी-शर्ट घातल्याने वाऱ्याचा डंख कमी जाणवत होता. रात्रीचे साडेबारा वाजले होते. बाहेर बरीच निजानीज झाली होती. पायातल्या स्लिपर्सचा चटचट आवाज आणि बाजूने वेगात जाणाऱ्या वाहनांचा निनाद एवढाच कानावर येत होता. रस्त्यावर कोणीच दिसत नव्हते. नजरेच्या टप्प्यात नाका दिसत होता; तिथे मात्र गजबज जाणवत होती.


रस्त्यावरील बंद दुकानांच्या ओळीतच शब्बो किन्नरच्या घरचा सजलेला दरवाजा उठून दिसत होता. बाहेर रस्त्यावर कार, रिक्षा तिच्या घरातल्या सेवेसाठी थांबलेल्या होत्या. बाजूने चालताना किरणची नजर सहज कारच्या आत गेली… मद्यधुंद तरुणाई आपाली मर्दानगीची साजरी करण्याच्या तयारीत वाट पाहत होती. सगळ्या कार-रिक्षांना वळसा घालत किरण पुढे निघतच होती, तोच सजलेल्या दाराचा पडदा सारत एक रांगडा तरुण पॅन्टची चैन रुबाबात लावत बाहेर आला. 


किरणने तिरप्या नजरेने त्याला आपादमस्तक न्याहाळले आणि पाऊल पुढे टाकले. त्या तरुणाने कार मधील मित्रांना मानेने खुणावून आत जाण्याची सूचना केली.. हे किरणच्या लक्षात आले. मागे वळून पाहण्याचा मोह ती आवरू शकली नाही… कार मधील आणखी एक तरुण पटकन पडदा उघडून आत शिरला. त्या दृश्यांनी किरणला शिसारी आली... परंतु तिच्याही नकळत अंतर्मनात एक अनामिक ऊष्णता उसळली; जणू देह आतून तापू लागला होता. त्या अवस्थेत कुणाचा स्पर्श जरी झाला असता, तरी चटका बसावा अशी भावना मनात दाटली. आपल्याला हे काय होतेय... या विचारांनी क्षणभर तिला भीती वाटली परंतु शरीर वेगवान झाले होते.  


किरण थोडी पुढे आली. तिरंगा बारच्या बाहेर मद्यधुंद तरुणांची टोळकी मावा-गुटखा खात, गप्पा मारत, खिदळत सिगारेटचा धूर उडवत उभी होती. किरणला पाहताच अनेक नजरा तिच्याकडे वळल्या... किरणने अंग चोरत त्यांच्या वरून नजर फिरवली आणि पुढे निघाली. पुढे सुरू होणाऱ्या नव्या इमारतींपूर्वी चिंचोळ्या गल्लीत संपूर्ण अंधार पसरलेला होता. तिने डोळे फाडून त्या गल्लीत पाहिले; पण काहीच स्पष्ट दिसले नाही. इतक्यात एक तरुण पळत त्या गल्लीत गेला. पुढील बाजूस चहावाला किटलीत चहा उकळत, पिशवीतून मावा-गुटखा, विडी-सिगारेट्स विकत होता. त्याच्या भोवतीही तरुणाई अचकट-विचकट विनोद करत उभी होती. 


येथेही पुन्हा तोच अनुभव अंगाला छेदून जाणाऱ्या विखारी नजरा तिच्यावरून फिरल्या... किरणने पुन्हा अंग चोरले आणि ओळीत उभ्या असलेल्या भुर्जीपाव व चायनीजच्या गाड्यांकडे वळली. किरण पहिल्यांदाच इतक्या रात्री या नाक्यावर भुर्जीपाव खायला आली होती. देखणी-अवखळ, तसेच नशेत बुडालेली विविध मंडळी त्या गाड्यांवर पोट भरताना दिसत होती. सिगारेट्स चा धूर उडवणारी कॉलसेंटर मधील नटव्या तरुणी त्याच्या सहकाऱ्यांबरोबर खिदळत आपला श्रमपरिहार करत होत्या. मनात उसनी हिम्मत आणत किरणने एक कोपरा पकडून ऑर्डर दिली… आणि आजूबाजूचे निरीक्षण सुरू केले.


रात्रीची दुनिया किती निराळी असते, हे तिला प्रकर्षाने जाणवत होते. बाईकवर टिबल सीट बसून तरुण मुलं नाक्यावर मावा-गुटखा, विडी-सिगारेट्स घ्यायला येत होती. कॉल-सेंटर मधल्या तरुणाईची गर्दी जास्त वाटत होती. हा सारा नजारा पाहताना आपल्या मेंदूला लकीचा विसर पडला आहे, याची जाणीव किरणला झाली, आणि त्या जाणिवेतच तिला हलकंसं समाधान वाटू लागलं. तिची ऑर्डर आली. प्लेट सांभाळत तिने गरमागरम भुर्जीपाववर ताव मारला. एक्स्ट्रा पाव घेऊन पोट भरून घेतले. पाणी पिऊन पैसे दिले. आता थोडा वेळ टाईमपास करायचा, असा इरादा मनात ठेवून ती एका कडेला उभी राहिली आणि आसपास पाहू लागली. अनेक आकर्षक, आत्मविश्वासाने भारलेले तरुण तिच्या अवतीभोवती दिसत होते. मनात मगाशीच जागृत झालेली कुतूहलाची आणि आकर्षणाची धग अजून शमलेली नव्हती.


विचार पुढे सरकत होते… थोड्याच अंतरावर शब्बो किन्नरच्या टीचभर घरासमोर रांगा लागलेल्या दिसत होत्या. बाहेरून पटवलेले ग्राहक घेऊन येणाऱ्या नटव्या बारबाला, वारांगना रिक्षातून उतरून शब्बोच्या घरात शिरत होत्या. तो सारा देखावा क्षणभर तिच्या नजरे समोर फिरला आणि तिच्या मनात एक अपराधी कळ उठली... 


"मी इथे काय करते आहे?" ... क्षणभर तिला वाटून गेले जणू आपण कामाठीपुरात उभ्या आहोत.


मनातला विवेक तिला बजावू लागला.. "किरण हे बघणंही चुकीचं आहे. हे विचारही योग्य नाहीत हे तुला नव्याने सांगावे लागते?" 


आयुष्यभर जपलेली शिस्त, मर्यादा, ‘योग्य अयोग्य’ची शिकवण तिच्या आत उसळू लागली. पण त्याच वेळी, त्या आवाजाला विरोध करणारी एक नवी जाणीवही तिच्यात जागी झाली... "मी फक्त पाहते आहे. अनुभवते आहे. यात अपराध काय?" ... मनातील हा संघर्ष तिला अधिकच अस्वस्थ करत होता.


विवेकाला गुंग करणारे विचार आणि थंड वाऱ्याचा बोचरा स्पर्श... या द्वंद्वात तिच्या देहात एक वेगळीच संवेदना पसरू लागली. टी शर्टखाली जाणवणारी जाणीव अधिकच ठळक होत गेली. तिला कळेना... ही भावना चुकीची आहे की दडपून ठेवलेली, इतकी वर्षं नाकारलेली. साध्या वाटणाऱ्या विचारांना नेमकी कसली लागण झाली आहे, हे ती स्वतःलाच समजावू शकत नव्हती.


अंगात एखाद्या अनामिक उन्मादाची लागण झाली. मनावर वेगळीच झिंग चढू लागली आणि त्याच झिंगेवर अपराधी पणाची भावनाही होती. 


"मी.. मी.. अशी नाही"... असे म्हणणारे तिचे जुने भान आणि "हो ही मीच आहे, कोणाला प्रॉब्लेम आहे?" असे सांगणारे नवे आत्मभान... दोन्ही तिच्या आत आमने सामने उभे ठाकले होते.


अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर स्थिरावत होत्या. काही नजरा तिच्या देहयष्टीच्या उठावाकडे नकळत ओढल्या जात होत्या, तर काही एका एकट्या स्त्रीच्या मध्यरात्री नाक्यावर उभ्या असण्याचा अर्थ शोधत, तिच्या चारित्र्याचे मोजमाप करत होत्या. त्या नजरा तिला अस्वस्थ करत होत्या, तरीही त्या क्षणी कुणास ठाऊक कशामुळे, त्या आव्हानात्मक नजरा तिच्या अहंभावाला हलकेच सुखावून जात होत्या.


"हे सुखावणंही चुकीचं आहे का?" ... असा प्रश्न मनात चमकून गेला आणि तिने पहिल्यांदाच त्या प्रश्नापासून नजर फिरवली नाही.


इतक्यात तिची नजर रिक्षाच्या आडोशाला उभ्या एका आकृतीकडे गेली. नजरा भिडल्या. टी-शर्ट मधून त्याच्या कसलेल्या देहाच्या रेषा, भरदार छाती उठून दिसत होती. डोळ्यांतला गूढ आत्मविश्वास किरणच्या मनात आणि देहात उसळलेल्या आकर्षणाला शब्द न लागणाऱ्या संकेतांत पकडत होता. त्या नजरेतील आव्हान तिचा संयम हलवून टाकत होता. नकळत त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून खाली सरकली आणि पुन्हा वर येऊन थांबली. तिला ते अपेक्षितच होते… त्याने हाताने एक सूचक हालचाल केली, जणू त्याने स्वतःच्या मर्द असण्याचा आत्मविश्वास दाखवून दिला. बस्स त्या एका संकेताने किरण अंतर्मुख झाली. कसलेल्या शिकाऱ्याने तिच्याकडे पाहत डोळा मारला आणि मागे येण्याची खूण केली. इतक्या लांबून केलेल्या त्या इशाऱ्याने किरण क्षणभर स्तब्ध झाली... तिच्या विवेकाच्या मर्यादा त्या नजरेने उध्वस्थ केल्या आणि मग जणू मंत्रमुग्ध झाल्यासारखी, ती त्याच्या मागे निघाली.

क्रमशः 

©किशोर तरवडे 


0

🎭 Series Post

View all