Login

स्वतःला शोधताना : भाग ०१.

.
गेले काही महिने किरणच्या आयुष्यात काहीतरी बदलत होतं. तो बदल अचानक नव्हता; तो हळूहळू, नकळत तिच्या मनाच्या कप्प्यांमध्ये पसरत गेला होता. इतका नाजूक, इतका हळवा की त्याबद्दल विचार करतानाच तिच्या मनाचा ठाव लागत नसे. काही क्षण असे यायचे की त्याचे विचार तिच्या सगळ्या विचारांवर हावी व्हायचे.

सकाळची कॉफी घेताना अचानक त्याचं नाव मनात उमटे. कामात गुंतलेली असताना, कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय त्याचा चेहरा डोळ्यासमोर तरळून जाई. आणि रात्री, झोप लागण्या आधी, त्याचा शेवटचा मेसेज पुन्हा एकदा वाचावा असं वाटे. हे सगळं किरणला जाणवत होतं, समजत होतं पण थांबवणं तिच्या हातात नव्हतं.

त्याच्या साध्या बोलण्यातही तिला काहीतरी वेगळाच अर्थ दिसू लागला होता. त्याने सहज विचारलेलं,

“आज काय केलंस?”

हे शब्द तिच्या मनात नकळत प्रेमाची ठिणगी पेटवून जात. एखादा साधासा हसरा इमोजी तिच्या दिवसाला अर्थ देऊन जाई. कधी कधी तिला वाटे तो तिच्या आयुष्यात यावा… फक्त एकदाच का होईना. एकदाच तरी.

पण लगेचच दुसऱ्याच क्षणी ती स्वतःवर चिडे.
कारण त्याच्याकडून मिळाली होती ती फक्त मैत्री. साधी, स्वच्छ, आपुलकीची मैत्री. आणि किरण मात्र त्या मैत्रीतून काहीतरी अधिक शोधत होती. तिला वाटे.. तो तिच्या भावनांना समजून घेईल, कदाचित त्यात थोडंसं प्रेमही ओळखेल. हा तिच्या मनाचा लबाडपणा होता का? की स्वार्थ?

तिचा विवेक तिला सतत टोचत होता... 

“किरण, हे विचार योग्य नाहीत.”

पण हृदय मात्र हट्टी झालं होतं.

कधी तिला वाटे, सगळं त्याच्या समोर मोकळं करावं. आत दडलेलं काहीही न ठेवता. त्याला सांगावं... त्याची उपस्थिती तिच्या आयुष्यात किती शांतता घेऊन येते.

त्याचं एक साधं “हाय” दिवस उजळवून टाकतं, आणि “टेक केअर” रात्री शांत झोप देतं. सांगावं... की त्याच्या नजरेत ती स्वतःला शोधते आहे. की त्याच्या प्रत्येक शब्दातून तिला जगण्याचं नवं कारण सापडतंय.

पण लगेच भीती मनात घर करून बसे.

तो समजून घेईल का?

की हसेल?

कलीग म्हणून केलेल्या मैत्रीला मी स्वतःच्या सोयीने नाव देत आहे, असं त्याला वाटेल का?

तिच्या मनात असंख्य संवाद सुरू असत.

“ए, ऐक ना… तुला माहीत आहे का, तू मला आवडतोस?”
पण प्रत्यक्षात तिच्या ओठांवर शब्द येण्या आधीच गुदमरून जात.  

त्याचं हसणं, त्याचं खोडकर बोलणं, नजरेतला आत्मविश्वास... हे सगळं किरणला अस्वस्थ करत होतं. त्याचं आयुष्य तिच्यापेक्षा वेगळं होतं. त्याची आकाशगंगा निराळी होती. तो मुक्त होता, उघड होता… आणि किरण अजूनही स्वतःच्या मनाच्या सावलीत लपलेली होती.

कधी कधी ती स्वतःलाच विचारायची... "हे प्रेम आहे की फक्त आसक्ती? अपूर्णतेची एखादी खोल झळ?
पण मग लगेच दुसरा प्रश्न उभा राहत असे... 

"जर त्याचं नाव ऐकून मन हसत असेल, जर त्याच्या गैरहजेरीने पोकळी वाटत असेल, तर ते फक्त आसक्ती कशी असेल?"

"प्रेम वेदनेतूनच उमलतं, नाही का?"

हा ताण दिवसेंदिवस वाढत होता. प्रत्येक क्षणी त्याचं अस्तित्व जाणवत होतं, पण प्रत्यक्षात तो दूरच होता. 

"फोन करावा का? मेसेज करावा का? की शांत राहावं?"

मनाचा एक कोपरा म्हणत होता... "त्याने समजून घेतले तर सगळं सोपं होईल."

पण दुसरा कोपरा सावध करत होता... 

"नाही किरण… त्याचं जग वेगळं आहे. त्याच्या भावनांच्या क्षितिजावर तू नाहीस."

या सगळ्या गोंधळात, एका रात्री तिने स्वतःशी एक प्रामाणिक कबुली दिली.

ही तिची सत्यता होती... ती एका तरुण पुरुषाकडे आकर्षित होत होती. समाज ज्या सत्याला स्वीकारायला अजूनही तयार नाही, ते सत्य... आणि ते मान्य करणं, हेच तिचं सगळ्यात मोठं साहस होतं.

वय वाढत होतं, पण मन अजूनही प्रेम शोधत होतं. एखाद्या नजरेतली भाव, एखाद्या खांद्यावर विसावणं, आणि कोणीतरी एकदाच का होईना, आपल्याला पूर्णपणे समजून घ्यावं... इतकीच तिची इच्छा होती. पण त्या इच्छेला शब्द देण्याइतकी हिंमत तिच्याकडे नव्हती.

त्या दिवशी, ऑफिसची पिकनिक जाहीर झाली.

****************
बसमध्ये चैतन्य ओसंडून वाहत होतं... गाणी, विनोद, खिदळणं. सगळे आपापले रूम पार्टनर ठरवत होते. या सगळ्या गोंधळात किरण मात्र शांत बसली होती.

आणि तेव्हाच तो तिच्याकडे वळला.

“हाय किरण, माझी रूम तुझ्या बाजूलाच आहे.. रात्री काही लागेल तर आवाज द्यायला संकोच नको करुस. आणि... रात्री झोप आली नाही तर गप्पा मारायला तुझ्याकडे आले तर चालेल ना?”

क्षणभर तिच्या श्वासाची लयच हरवली. चेहऱ्यावरचं हसू टिकवायचा तिने प्रयत्न केला. शब्द गळ्यात अडकले. शेवटी ती फक्त मान हलवू शकली.

पण आतून काहीतरी उधळून आलं होतं.

त्याच्या त्या साध्या सौजन्याने तिच्या सर्वांगात जणू झिणझिण्या आल्या. गाडीत गाणी सुरू होती, सगळे हसत होते, पण किरणच्या मनात वेगळंच वादळ घोंघावत होतं.

त्याच्या शेजारी बसताना हृदय वेगाने धडधडू लागलं.

त्याच्या खांद्याचा अगदी क्षीण स्पर्शही शरीरातून वीज गेल्यासारखा वाटत होता. ती नजरा टाळायचा प्रयत्न करत होती, पण डोळे मनाचं ऐकत नव्हते... ते वारंवार त्याच्याचकडे वळत होते.

लोणावळ्याच्या हिरव्या डोंगररांगा, धुक्याने हरवलेला आसमंत, थंडगार हवा, आणि बसमधील अवीट गाणी... सगळं एखाद्या चित्रपटासारखं वाटत होतं.

पण त्या सुंदर दृश्यांच्या आड, किरणच्या मनातली ओढ वेगाने वाढत चालली होती.

ती नकळत स्वतःलाच हरवत चालली होती…