शुद्ध आली तेव्हा किरण आपल्या पलंगावर होती. खोलीत शांतता होती. पंखा मंदगतीने फिरत होता. शरीर घामाने निथळलं होतं, परंतु मनात अजूनही धडकी भरलेली होती.
"हे स्वप्न होतं? की मनाचा आरसा तुटून समोर आला होता?"
किरणला काहीच कळेना. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती... ती आता असं तणावात जगू शकत नव्हती.
इतकी वर्षं तिने स्वतःला सावरून ठेवलं होतं. भावना गिळून, अपेक्षा दाबून, एकटेपणाला शिस्तीचं नाव देऊन जगली होती. ऑफिस, जबाबदाऱ्या, घर,सगळं नीट सांभाळून स्वतःची इमेज सभ्य आणि मर्यादेत राहणारी अशी टिकवली होती. पण या एका व्यक्तीने तिने खोल दाबून टाकलेल्या भावनांना जागे केले होते..
त्याच्या सारख्या अपरिपक्व तरुणा समोर त्या व्यक्त करणं धोक्याचं होतं.
ऑफिस मधली ओळख, आपली प्रतिष्ठा, तिच्या अविवाहित असण्या बद्दलचे टोमणे... सगळं एका क्षणात कोसळू शकत होतं.
पण न सांगणं… ते श्वास गुदमरवणारं होतं.
मनातला आवाज आता बंड करू लागला होता...
"हे सत्य लपवणं म्हणजे स्वतःला हळूहळू संपवणं"
शनिवार जवळ येत होता. प्रत्येक क्षणा बरोबर ताण वाढत चालला होता. मनात प्रश्नांचे काहूर माजले होते.
"तो माझे कथन ऐकेल का? माझ्या भावनांना समजून घेईल का? की माझ्या भावना हास्यास्पद समजून दूर होईल?"
अंतर्मनात भीती दाटून येत असली तरीही किरणने ठरवलं होतं... या वेळी मागे वळायचं नाही.. व्यक्त व्हायचे.
दिवस उजाडला.... दुखरा ठसठसणारा शनिवार.
ती आतुरतेने फोनची वाट पाहत होती. मिनिटं, तास... सगळं असह्य वेदनेत ओढलं जात होतं. जणू दरीच्या टोकावर उभी राहून ती खाली पाहत होती... मनात पाय घसरायची भीती, पण उडी मारायची हिंमतही होत नाही.
मन स्वतःलाच धीर देत होतं...
"तो नक्की येईल. ऐकेल. समजून घेईल.. किमान नाकारताना तरी अपमान करणार नाही."
आणि अचानक... फोन वाजला. तो स्टेशनवर उतरला होता. थोड्याच वेळात तिच्या घरी पोहोचणार होता.
तो येतोय... या विचारांनी इतका वेळ असह्य ताणात बसलेल्या किरणने आनंदाने मोकळा श्वास घेतला. ती पटकन उठली.. आरशा समोर उभी राहिली... स्वतःला नीटनेटके केले. तो आला... त्याचं हसतं रूप दारात दिसताच तिच्या मनाला मोरपीस स्पर्शून गेलं. तिने स्वतःला सावरलं. आदरातिथ्याच्या निमित्ताने मनातली घालमेल लपवण्याचा प्रयत्न केला.
गाणी लागली. कांदे भजे... दोन पेयांचे ग्लास समोर आले. वेळ अलगद निसटत गेला.
त्याचे घरातील हक्काचे वावरणे किरणसाठी स्वप्नमय होते. बोलून सगळे विषय संपले, शब्दही कमी पडू लागले. तो हलकेच तिच्या बाजूला थोडा सरकला. तिची नजर खालीच होती. त्याचा खांद्याला झालेला हलकासा स्पर्श... तो क्षण तिच्यासाठी धक्क्या सारखा होता.
तो हळुवारपणे म्हणाला,
“मॅडम... नाही.. मी तुला आज किरण म्हणून बोलणार… किरण कुठे हरवलीस? तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना?”
त्याच्या फुंकर मारलेल्या शब्दांनी ती भानावर आली. तिला एकदम भरून आले.. ती त्याच्याकडे पाहू शकली नाही. अश्रू अनावर झाले होते. त्याने नकळत तिच्या खांद्यावर हात ठेवला.. त्यात सांत्वना होती.
त्या स्पर्शाने किरणचा बांध फुटला... अश्रू वाहत होते.. त्याच्या स्पर्शाचा आधार तिच्या खांद्यावरून फिरत होता.. बराच वेळ रडून झाल्यावर तीने स्वतःला सावरले... ती हळूच बोलू लागली.
“लकी… मला खूप काही बोलायचे आहे पण शब्द सापडत नाहीयेत. मला माहीत नाही तू हे सगळे कसं घेणार आहेस. पण मी दरीच्या एका टोकावर उभी आहे. मी स्वतःला खूप समजावले.. पण काहीच न सांगता जगणं आता शक्य नाही.”
तो शांतपणे ऐकत होता.
“आपण एकत्र काम करतोय. मी स्वतःला कायम मर्यादेत ठेवलं. पण खरं सांगते.. मला कधी कळलंच नाही तुझ्याबद्दल माझ्या मनात ओढ निर्माण झाली. जेव्हा मला ती जाणवली.. तेव्हा पासून मी ती दडपायचा प्रयत्न केला… पण ती वाढतच चाललीय.”
तिचा आवाज थरथरत होता.
“पिकनिक नंतर तर मी आणखीन कोसळली आहे.. मला माहीत आहे, तुझ्यासाठी हे कदाचित काहीच नसेल. पण माझ्यासाठी हा ताण असह्य झाला आहे. कृपया मला चुकीचं समजू नकोस. मला फक्त इतकंच हवंय... तू ऐक.”
लकी काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला...
“किरण, मी तुझा आदर करतो. तू खूप प्रामाणिक आहेस. मला हे सगळं ऐकून वाईट वाटतं… पण मी तुला स्पष्ट सांगतो... माझ्या मनात तशा भावना नाहीत.”
त्या शब्दांत कठोरपणा नव्हता. फक्त प्रामाणिकपणा होता.
“पण तू जे केलंस, ते चुकीचं नाही. भावनांचे उत्सव भरतात. त्या कबूल करणं धाडसाचं असतं. मी तुला मित्र म्हणून साथ देईन. पण यापलीकडे काही नाही.”
त्याने बोलणे संपवले होते.. त्या क्षणी किरणला जाणवलं... हे उत्तर जरी वेदनादायक असलं, तरी आवश्यक होतं. मनावरचं ओझं हलकं झालं होतं. त्याचे बोलणे अपमान नव्हता. त्याने सन्मानसोबत नकार दिला. तिला सुटल्यासारखे वाटले.
ताण शिथिल झाला.. त्यानंतर ते बराच वेळ ते बोलत बसले. साध्या गप्पा. ऑफिस. आयुष्य. त्याने आभार मानून निरोप घेतला.. तिच्या तोल जाणाऱ्या फेज मध्ये तिला समजून घेण्याचा हात पुढे केला. शेवटी तिने त्याला स्टेशनपर्यंत सोडायला नेलं. त्याने जाताना वळून तिला हात हलवून बाय केले. तिच्या चेहेऱ्यावर अपार आनंद पसरला. किरण आनंदातच घरी आली.
त्या रात्री, कित्येक दिवसांनी, किरणला शांत झोप लागली. तिला प्रेम मिळालं नव्हतं… पण स्वतःचा स्वीकार मिळाला होता.
क्रमशः
©किशोर तरवडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा