Login

स्वतःला शोधताना : भाग ०४.

.
मोठ्या सुट्टीनंतर किरण पुन्हा ऑफिसमध्ये आली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा नेहमीचा उत्साह कुठेतरी हरवलेला होता. हसतमुख, संयत, स्वतःत गुंतलेली किरण आज थकलेली दिसत होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळे.. सुकलेले ओठ.. चेहेऱ्यावर नकळत साकळलेली शांत उदासी, आणि तिच्या हालचालही यंत्रवत वाटत होती. 


ऑफिस मधल्या सहकाऱ्यांना ते प्रकर्षाने जाणवलंच. काही जणांनी हळूच येऊन तिची विचारपूस केली, काहींनी फक्त काळजीची नजर टाकली. ऑफिसमध्ये एकाच चर्चा सुरू झाली.

“किरणला अचानक काय झालेय? प्रकृती एकदम ढासळलीय वाटतं…”


“नेहमी इतकी प्रसन्न असते, आज फारच उतरलेली दिसते.”


किरण मात्र कोणतीही प्रस्तावना न करता आपल्या टेबलाकडे गेली. तिने नेहमी प्रमाणे आपले काम सुरू केलं. पेंडिंग फाईल्स, मेल्स, रिपोर्ट्स... सगळं तिच्या समोर होतं. पण मन… मन कुठेच नव्हतं.


तिच्या चेतनेत सतत एकच सावली फिरत होती... तो.


जरी त्याचं डिपार्टमेंट वरच्या फ्लोर वर असलं, तरी तिला वारंवार भास होत होता की तो आसपासच आहे. कधी भास व्हायचा की तो शेजारून गेला आहे, तर कधी वाटायचे तो पाठीशी उभा आहे. हवेत मिसळलेला त्याचा परिचित डीओचा गंध तिच्या श्वासात उतरतोय, असं वाटून तिचं शरीर अनामिक शिरशिरीने भरून येत होतं.


फाईल्स मधील पेपर्स उलटताना अक्षरं धूसर होत गेली. लक्ष केंद्रित होत नव्हतं. मनात एक भीती घर करून बसली होती... "या अस्थिर अवस्थेत काही चूक झाली तर? कुणाच्या नजरेत भरलो तर?"


ताण इतका वाढला की छातीत गोळा उठला.. एसीच्या थंडीतही तिला घाम येत होता. ब्लाउज ओलसर झाला होता. नजर वर करून बघायला पण भीती वाटत होती.


आणि त्या सगळ्यावर कहर म्हणून एक विचार वारंवार डोकं वर काढत होता... 
"त्याने माझ्या बद्दल कुणाला काही सांगितलं तर नसेल ना…?"


हा विचार तिच्या आधीच कमकुवत झालेल्या मनावर जणू घाव घालत होता.


दुपारच्या सुट्टीत अचानक तिच्या कानावर त्याचा आवाज पडला... 
“अरे! सरप्राईज! किरणजी, ऑफिस जॉईन केलं?”


त्या आवाजाने तिचं सर्वांग क्षणभर स्तब्ध झालं. तो आवाज हवाहवासा होता… पण त्याच क्षणी मनातल्या भीतीने डोके वर काढलं. छातीत धडधड वाढली. डोळ्यां समोर अंधुकपणा आला.


तिने मान वर केली. तिचा उतरलेला चेहरा पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा हलकाफुलका भाव मावळला. कदाचित तो काहीतरी बोलणार होता… पण थांबला. त्याने फक्त मान हलवली आणि तो पुढे निघून गेला.


लंच टाइम झाला. सगळे तिला जेवायला बोलावत होते, पण ती टेबलावरच बसून राहिली. भूक नव्हती. मन विचारांच्या गर्दीत अडकलेलं होतं.


तेवढ्यात ऑफिस मधून बाहेर गेलेली तिची जुनी कलीग वैशाली परत आली. तिने किरणचा चेहरा पाहिला आणि क्षणातच तिच्या डोळ्यांत चिंता तरळली. 
ती जवळ आली, खुर्ची ओढून बसली आणि तिने हळुवारपणे विचारलं,


“किरण… काय झालंय? आज तू अगदीच वेगळी दिसतेयस. कसली चिंता करते आहेस?”


किरण काहीच बोलली नाही. नुसती पाहत राहिली. वैशालीने तिच्या खांद्यावर हात ठेवला.


“पिकनिक पर्यंत ठीक होतीस. अचानक असं काय झालं? सांग… मी आहे.”


त्या शब्दांत मैत्रीचा विश्वास होता... निर्णय नव्हता, उपदेश नव्हता.


वैशालीने तिचा डबा उचलला आणि तिला बाहेर घेऊन गेली. दोन घास खायला लावायचा प्रयत्न केला. किरणने उगाचच हसत दोन घास घेतले… आणि मग काहीतरी कारण सांगून ऑफिसच्या बाहेर पडली.


बाहेर येताच तिचा संयम ढासळला.


मन सतत एकच हट्ट धरून बसल होतं... 


"तो हवाय. तो जवळ हवा. त्याच्या शिवाय हे जीवन सगळं निरर्थक आहे."


हृदयाची धडधड अचानक वाढली.. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आजूबाजूचं जग धूसर झालं. त्या गोंधळात तिने पुन्हा वैशालीलाच फोन केला.


वैशाली लगेच आली.


दोघी हॉर्निमन सर्कलच्या गार्डनमध्ये त्यांच्या नेहमीच्या जागी जाऊन बसल्या. वर आकाशनिंब फुलांनी बहरलेला होता. खाली गगन जाईचा गालिचा पसरला होता. दुपारचे सोनेरी ऊन फुलांच्या पाकळ्यांवर विसावत होतं. हवेत मंद, बोचरा सुगंध भरून राहिला होता.



वैशालीने खाली पडलेली टवटवीत फुलं वेचून तिच्या हातात दिली.


“घे… तुला आवडतात ना.”


किरणने तिच्या हातून फुलांचा गुच्छ घेतला.. नंतर शून्यात बघत ती एकेक फूल तोडून फेकू लागली.. जणू काही ती स्वतःलाच शिक्षा देत होती. आकाशनिंबाचं झाड आणि गगनजाईचा बहर तिच्या मनातल्या निषिद्ध, नाजूक भावनां सारखाच होता जणू.


फुलं फेकताना तिचं मन पुटपुटत होतं... "मनात फुलू लागलेल्या या सुगंधी भावना अशाच दूर करता आल्या तर"…


पण ते शक्य नव्हतं.


वैशालीने तिच्याकडे पाहत शांतपणे विचारलं,


“किरण… कुणासाठी अशी झुरतेयस? कोण आहे तो? तुझ्या डोळ्यांत सगळं दिसतंय. पण ऐक... या वयात, आपल्या समाजात… प्रेम करणं सोपं नसतं. आणि तू तर मनाने इतकी हळवी आहेस. स्वतःला जप.”


किरण काहीच बोलली नाही.


पण तिच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांत एक सत्य उभं होतं... ती स्वतःला शोधत होती… आणि त्या शोधात ती हळूहळू स्वतः पासूनच दूर जात होती.