Login

स्वतःला शोधताना : भाग ०५.

.

गार्डनमध्ये संध्याकाळ हळूहळू गडद होत चालली होती. झाडांच्या सावल्या लांब होत किरणच्या मनातील अंधाराशी मिसळत होत्या. हवेत फुलांचा मंद सुगंध होता, पण त्यामध्ये वेदनेचा एक न दिसणारा गंध मिसळलेला होता... जसा ओलसर जमिनी खालून हळूच वर येतो.


वैशाली उठून थोड्या फेऱ्या मारत होती. ती काहीतरी मनात आखत असल्यासारखी दिसत होती... या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याचा अंदाज घेत. तिच्या पावलांत अस्वस्थता होती, पण डोक्यात अनुभवाची शिस्त होती.


फेऱ्या थांबल्या. वैशाली पुन्हा किरणच्या बाजूला येऊन बसली.


किरणसाठी त्या क्षणी वैशालीचा आधार म्हणजे सुरक्षिततेची एक अरुंद पण ठाम जागा होती. तिच्या पेक्षा जास्त पावसाळे पाहिलेली अनेक पडझडी अनुभवलेली ही मैत्रीण तिच्या फक्त उपस्थितीनेच किरणच्या मनातील वादळ काहीसं आवरलेलं वाटत होतं.


काही क्षण शांततेत गेले.
मग वैशालीचा आवाज आला... तिचा आवाज थोडा कठोर जरी असला तरी तो तिच्या काळजीने ओथंबलेला होता.


“किरण… ती व्यक्ती आपल्या ऑफिसम मधलीच आहे ना?”


किरण चपापली.

“खरं खरं सांग. त्या पिकनिकमध्ये तुझा पाय घसरला की त्याने तुला हेरून तुला गुंतवलं?”


त्या शब्दांनी किरणला चटका बसला. वैशालीच्या आवाजात कडू अनुभवातून आलेला संशय होता...  तिने या वयातील अनेकींच्या कथा जवळून पाहिल्या होत्या. अनेक जणींची अशा प्रकारे स्वतःची फसवणूक होऊन त्यांचा गैरफायदा घेऊन या गुप्त नात्यांचा शेवट भीषण झाला होता. 


पण तरीही…
किरणच्या मनाला त्या संशयाने दुखावलं.


तिच्या मनात ‘तो’ अजूनही निर्मळ होता.
तिला तो निर्दोष वाटत होता.


वैशाली उत्तराची वाट पाहत होती... तिला खात्री होती की कुठेतरी काहीतरी चुकलंय.


किरणने खोल श्वास घेतला.


“नाही, वैशाली…”
तिचा आवाज थरथरला.
“तो तसा नाहीये. त्याचा माझ्याशी काहीच संबंध नाही. बदल माझ्यात झालाय.”


आणि मग तिने सगळं सांगितलं.


घरात झालेली भेट.
मन उघडं करणं.
स्वतःची भावनिक अवस्था लपवू न शकणं.
आणि त्याने एक मित्र म्हणून शांतपणे तिचे म्हणणे ऐकणं.


“त्याने कुठलाही भेदभाव केला नाही,” किरण हळूच म्हणाली.
“उलट… मला सावरायला मदत करण्याचं आश्वासन दिलं.”


ती थांबली.


“आणि हेच माझं दुर्दैव आहे,” ती पुटपुटली.
“त्याच्या त्या समजूतदार वागण्याने तो मला अजूनच हवासा वाटू लागलाय. असं वाटतंय… जणू शोध संपलाय. राजकुमार सापडलाय.”


तिचे डोळे पाणावले.


“हृदयात घुसलेला प्रेमाचा काटा पूर्णपणे आत गेलाय. त्याचं टोकही आता बाहेर दिसत नाही. तो आजूबाजूला असल्या सारखा भासतो… आणि जेव्हा कळतं की तो माझा नाही... तेव्हा सलत राहतं. कधी कधी वाटतं… त्याने मला धिक्कारलं असतं, तर कदाचित मी वाचले असते.”


ती बोलत राहिली.


ऑफिस मधील त्याची जवळीक.
तिचा एकटेपणा त्याने कसा तोडला.
चहा, जेवण, साध्या गप्पा.
घरगुती प्रश्न, आयुष्याची दुखणी... तिच्याशी वाटून घेणं.


“मी कधीच कुठल्या तरुण पुरुषाशी अशी मैत्री केली नव्हती,” ती म्हणाली.
“म्हणूनच कधीकधी मलाही शंका यायची… पण त्याच्या वागण्यात सौहार्द होतं. आणि मी नकळत गुंतत गेले.”


पिकनिकची रात्र.
त्याने मला माझ्या रूम पर्यंत नेले.. मला धीर दिला... किती काळजी घेतली माझी. 


“त्या रात्री ड्रिंक्सची पार्टी होती,” किरणचा आवाज तुटक झाला.
“माझ्या डोळ्यांत त्याचाच विषय भरून राहिला होता. मी घसरले असते… पण तो रूममध्ये आला नाही. फक्त एकदा आला.. माझी चादर नीट करून गेला.”


ती गप्प झाली.


“त्या क्षणी… प्रेमाची कट्यार थेट हृदयात घुसली.”


काही वेळ दोघींमध्ये शांतता पसरली.


वैशाली काही क्षण न बोलता बसली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजी दोन्ही होती. कदाचित तिने इतका समंजस पुरुष या कथेत अपेक्षितच केला नव्हता.


तिने डोळे मिटले.
मग हळूच म्हणाली... 

“किरण… कदाचित तू सांगतेयस ते खरंच असेल. पण माझं मन अजूनही सावध आहे. कारण आपल्या वयातील एकट्या कित्येक जणी तरुण पुरुषांच्या प्रेमात पडून आपलं आयुष्य उध्वस्त करून घेतात.”


ती थोडी पुढे झुकली.


“मी नेहमी सांगते... कामाचं ठिकाण आणि राहण्याचा परिसर… इथे भावना बंद दाराआड ठेवायच्या. पण मन… ते ऐकत नाही.”


तिने थोडा पॉज घेतला.

“सध्या दोन गोष्टी कर,” ती ठामपणे म्हणाली.
“पहिली... जितकं शक्य असेल तितकं त्याला टाळ.
आणि दुसरी... स्वतःला कामात, दिनचर्येत गुंतव. स्वतःभोवती पुन्हा एक भिंत उभी कर.”


ती आश्वासक हसली.. 


“आता चल. ऑफिसला चल. आणि लक्षात ठेव माझे डिपार्टमेंट जरी दूर असले.. तरी मी आहे.”


वैशालीने तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शात उपदेश नव्हता.. फक्त आधार होता.


किरण उठली. तिला थोडे हलके वाटत होते. 


ऑफिसमध्ये परतल्यावर तिने स्वतःला कामात झोकून दिलं. फाईल्स, मेल्स, मीटिंग्स... सगळं यांत्रिकपणे सुरू होतं.


पण काम संपलं की…
तो पुन्हा मनाला डसत होता.


प्रत्येक फाईल बंद करताना, प्रत्येक मेल पाठवताना, प्रत्येक मीटिंगनंतर त्याचंच रूप डोळ्यांसमोर येत होतं.


त्याचा आवाज.
त्याचं हसू.
चालण्यातला डौल.
हनुवटीतली ती खळी.


सगळं पुन्हा पुन्हा मनावर कोरलं जात होतं.


आणि तरीही…
ती स्वतःला आवरत होती.


कारण तिला आता कळू लागलं होतं... 
हा लढा कुणाशी नाही…
हा लढा स्वतःशी आहे.


क्रमशः
©किशोर तरवडे. 


0

🎭 Series Post

View all