Login

स्वतःला शोधताना : भाग०६.

.

सहाचा ठोका पडताच ऑफिस मधली घड्याळं एकाच सुरात थांबल्या सारखी वाटली. किरणने बॅग उचलली आणि आजूबाजूला न पाहता थेट बाहेर पडली. तिला आज ना कुणासाठी थांबायचं होतं, ना वर जाऊन कुणाला विचारायचं होतं. ऑफिस मधून बाहेर पडताना मागे वळून पाहण्याची तिची जुनी सवय होती... जणू कुणीतरी तिला हाक मारून थांबायला सांगेल, अशी एक अंधुक आशा मनात असायची. पण आज तिनं ती सवयही मोडली.


बिल्डिंगच्या पायऱ्या उतरून ती हमरस्त्यावर आली, तेव्हा संध्याकाळचा धूसर प्रकाश पसरलेला होता. गाड्यांच्या हेडलाईट्स एकामागोमाग एक चमकत होत्या.. जणू तिच्या मनातल्या अस्वस्थतेच्या ठिणग्यांनाच उजाळा देत होत्या. आज तिनं मुद्दाम आपला नेहमीचा रस्ता टाळला आणि वेगळ्याच वाटेने स्टेशनकडे वळली. अपराधीपणाची भावना पावलोपावली तिच्या सोबत चालत होती; पण मनाचा त्रास कमी करण्यासाठी तसं करणं तिला अपरिहार्य वाटत होतं. स्वतःपासून, लकीपासून, आणि त्या आठवणीं पासून पळ काढायचा होता.

ती जशी पुढे चालू लागली, तसं तिला क्षणाक्षणाला भास होऊ लागला... कोणी तरी मागून हाक मारतंय. तोच आवाज, ती ओळखीची हाक, तो सहजसा हसरा चेहरा… सगळं तिला ऐकूही येत होतं आणि दिसतही होतं. पण तिनं मनाला जबरदस्तीने आवर घातला. मागे वळून पाहायचं नाही, असं स्वतःशीच ठरवलं होतं. आतलं एक मन ओरडत होतं... 

“अग वळ… एकदातरी वळून बघ!”


तर दुसरं, कणखर मन तिला थोपवत होतं... 
“नाही… आता नाही.”

कशीबशी ती स्टेशनवर पोहोचली आणि नेहमीच्या फास्ट लोकलमध्ये चढली. डब्यात गर्दी होती; खांद्याला खांदा लागलेला, श्वासाला श्वास भिडलेला. पण आज ती गर्दीही तिच्या एकटेपणाला कमी करू शकत नव्हती. ट्रेन सुटली आणि तिच्या मनातली घालमेल अधिकच तीव्र झाली. लकीला न पाहता, न बोलता ऑफिसमधून निघून जाण्याचा हा तिचा पहिलाच अनुभव होता. मन आणि हृदय जणू असंख्य लाल मुंग्यांनी पोखरल्या सारखं अस्वस्थ झालं होतं.

विचारांचे काटे मेंदूत खोलवर रुतत होते... 
"तो माझ्या बद्दल काय विचार करत असेल?"
"तो वाट पाहत असेल का माझी?"


फास्ट लोकल वेगाने पुढे सरकत होती, पण किरणला मात्र ती ट्रेन जणू एका जागीच उभी आहे, असा भास होत होता. खिडकी बाहेरची झाडं, दिवे, माणसं मागे सरकत होती; पण तिचं मन मात्र एकाच ठिकाणी लकीच्या आठवणीत ठाण मांडून बसलं होतं...  असह्य बेचैनी मनाला रक्तबंबाळ करत होती. पुढच्याच स्टेशनला उतरून परत त्याच्याकडे जावं, ही इच्छा उफाळून येत होती.


“फक्त एकदाच त्याला पाहू दे… मग मन शांत होईन,” ... असा आवाज मनातून पुन्हा पुन्हा उमटत होता.

इतक्यात मोबाईलची टोन वाजली. तिचं लक्ष स्क्रीनकडे गेलं.


“Life is nothing when we get everything,
But life is everything when we miss something in life.
The value of people will be realized in their absence only!!
Good Evening!!”

लकीचा मेसेज.

तो मेसेज वाचताच आतापर्यंत मनात चाललेली घालमेल क्षणात विरघळली. आनंदाची एक लाट तिच्या संपूर्ण शरीरातून वाहून गेली. अंगावर शिरशिरी उठली. डोळ्यांत जमा होऊ लागलेले अश्रू हसण्यात बदलले. त्या क्षणी तिनं मोबाईल स्क्रीन जवळ घेतली आणि नकळत त्या मेसेजचा मुका घेतला... जणू तो शब्द नव्हे, तर स्वतः लकीच तिच्या समोर उभा होता.


आजूबाजूच्या महिला प्रवासी तिकडे विचित्र नजरेनं पाहत होत्या... काहींच्या नजरेत उपहास, काहींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. पण किरणला त्याची पर्वा उरली नव्हती. 


"आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला आपण ‘मिस’ झालेय"... ही जाणीवच त्या क्षणी तिला पुरेशी होती.


आनंदात तिची बोटं मोबाईलच्या स्क्रीनवर नाचू लागली. हृदयाने शब्द सांगितले आणि बोटांनी ते लिहिले. एक हळुवारसा, मनापासूनचा रिप्लाय तयार करून तिनं लकीला पाठवला. आणि मग… तिचा प्राण जणू डोळ्यांत उतरला. ती आतुरतेनं त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली.


पण मेसेज ‘डिलिव्हर्ड’ही झाला नव्हता.

क्षण… मिनिटं… वेळ भराभर पुढे जात होता. ट्रेनचा प्रत्येक थांबा तिच्या मनातल्या प्रतीक्षेचा ठोका वाढवत होता. मोबाईलची स्क्रीन विझत होती, आणि त्याबरोबर तिचा संयमही संपत चालला होता. पुन्हा पुन्हा स्क्रीन जागी करत ती इनबॉक्सकडे पाहत होती. प्रत्येक वेळी रिकामा स्क्रीन पाहून तिचा धीर आणखी गळून पडत होता.


"तो उत्तर का देत नाही? काही बरे-वाईट तर झालं नसेल?"
"की त्यानं मेसेज पाहून डिलीट केला असेल?"


मन वेड्यासारखं विचारांच्या मागे धावू लागलं. ट्रेन धावत होती, पण तिच्या विचारांची गाडी त्याहून कितीतरी वेगाने धावत होती. खिडकी बाहेर अंधार दाटत होता आणि आत मनात मात्र प्रकाशा ऐवजी अस्वस्थतेचे लोट उठत होते.


घरी पोहोचल्यावर जणू तिचं प्रेतच घरात शिरलं. दिवसभराचा ऑफिसचा ताण, अंगावर आलेला थकवा, आणि लकीच्या आठवणींचा वेदनादायक चक्रव्यूह... सगळं एकाच वेळी तिच्यावर कोसळलं. अंधारात बसून, डोळ्यांतील आसवे गाळत ती स्वतःशीच झगडत राहिली.

तेवढ्यात मनाचा एक कोपरा फितूर झाला... आणि त्याची विषारी कुजबुज सुरू झाली.


“मूर्ख आहेस तू. रश्मीचं ऐकलंस कशाला? तिला काय तुझ्या भावनांशी देणं घेणं आहे? तिला काय तिचा संसार आहे, मुलंबाळं मोठी झालीत. तुला समजदार, प्रेमळ माणूस भेटलेला पाहून तिचा पाहवत नसेल म्हणूनच तिनं तुला ते सगळे सल्ले दिले.”


तो फितूर आवाज थांबायचं नाव घेत नव्हता.
“लकीचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. तू न सांगता निघून आलीस म्हणूनच त्यानं ‘मिस’ केल्याचा मेसेज पाठवला. आता कशाची वाट पाहतेस? फोन कर त्याला"

त्या विचारांनी क्षणात तिचं मन रश्मीच्या विरोधात गेलें. 

"आता येथून पुढे तिचे सल्ले ऐकायचे नाहीत" असा ठराव मनानं केला... आणि आश्चर्य म्हणजे, त्या क्षणीच मनात लकीच्या प्रेमाचे कारंजे उसळू लागले.

किरण उठली. घरातले दिवे एकामागोमाग एक लावले. अंधाराचा प्रत्येक कोपरा उजळून निघाला... जणू आपल्या मनातला अंधारही पळून जाईल, अशी आशा तिच्या मनात जागली. तिने पटकन मोबाईल हातात घेतला आणि लकीला फोन लावला.

पण स्क्रीनवर ‘Not Reachable’ झळकलं.

भीतीचं सावट पुन्हा तिच्यावर दाटलं.
"रागात त्यानं नंबर ब्लॉक तर केला नसेल? उगाच रश्मीचं ऐकलं"…
मन स्वतःलाच दोष देऊ लागलं.

आणि त्याच क्षणी फोन वाजला.

स्क्रीनवर एकच नाव चमकत होतं... 
लकी.


किरणनं अधीरतेनं फोन उचलला.
“हॅलो…”
तो आवाज कानांवर पडताच, जणू एखाद्या ऊर्जेच्या प्रवाहानं तिचं संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकलं.

क्रमशः 

किशोर तरवडे  


0

🎭 Series Post

View all