येणारा प्रत्येक दिवस किरणला आतून रक्तबंबाळ करत होता. शरीरावर जखमा नव्हत्या, पण मनाच्या खोल कप्प्यांत कुठेतरी सतत काहीतरी जळत होतं. लकीची आठवण तीव्र झाली की ती स्वतःलाच हरवून बसायची. नकळत त्याच्या जवळ जाऊन घुटमळायची, कधी कामाच्या निमित्ताने, कधी मदतीच्या बहाण्याने, तर कधी केवळ त्याच्या आसपास असण्याच्या ओढीने.
त्याचं काम आधी करून देणं, त्याच्या अडचणी लक्षात ठेवणं, त्याच्या वेळेनुसार स्वतःला जुळवून घेणं, हे सगळं तिला स्वाभाविक वाटू लागलं होतं. त्याने जाणीवपूर्वक तिला कधी जवळ बोलावलं नसलं, तरीही त्याच्या थोड्याशा सहवासासाठी ती आतून हपापलेली असायची. बोलताना हाताचा हलका स्पर्श, एखादं सहज हसू, क्षणभर तिच्यावर स्थिरावलेली नजर... या सगळ्यांनी तिच्या मनात प्रचंड खळबळ उडवली होती.
हे प्रेम शांत नव्हतं. ते एखाद्या रोगासारखं दिवसेंदिवस बळावत चाललं होतं. आपण नेमकं कुठे चुकलो? हा प्रश्न तिला सतत छळत होता, पण उत्तर सापडत नव्हतं. लकीच्या आठवणी मनात आल्या की तिच्या विचारांची गती वाढायची, मेंदूच्या आत एक विचित्र उलथापालथ व्हायची. ती स्वतःला सावरू शकत नव्हती. त्याच्या सहवासाचं, त्याच्या अस्तित्वाचं आकर्षण केव्हाच व्यसनात बदललं होतं,
रात्री स्वप्नांतही तोच यायचा. ती स्वप्नं क्षणभर सुख देऊन जायची, पण जाग आली की पोकळी अधिक तीव्र व्हायची. झोप लागत नसे, छातीत दडपण जाणवायचं, आणि पहाटे पहाटे मनाचा ताण असह्य व्हायचा. त्या वेदनेतून सुटका शोधताना ती स्वतःशीच झगडत होती... क्षणिक दिलासा मिळायचा, पण नंतर अपराधीपणाची ठसठस अधिक वाढायची.
या सततच्या मानसिक संघर्षाचा परिणाम तिच्या शरीरावरही दिसू लागला होता. आरशात पाहिलं की तिला स्वतःचीच ओळख पटत नसे... खंगलेला चेहरा, थकलेले डोळे. ऑफिसमध्ये लोकांच्या नजरा बदलल्या होत्या. सुरुवातीला तिच्या प्रकृतीची चौकशी, सहानुभूती होती; नंतर मात्र कुजबुज सुरू झाली.
“इतकी नीटनेटकी राहणारी, कामात हुशार असलेली बाई अचानक अशी का झुरायला लागली? प्रेम प्रकरण की आणखीन काही?”
अशा प्रश्नांतून तिच्या अस्तित्वाची हेटाळणी होत होती.
या सगळ्या ताणाचा परिणाम कामावरही होऊ लागला. चूक होऊ नये म्हणून ती प्रत्येक काम पुन्हा पुन्हा तपासू लागली. तिचा आत्मविश्वास गळून पडला होता. सततची भीती, सततचा ताण... हेच तिचं रोजचं आयुष्य बनलं होतं.
एका दिवशी ऑफिसच्या कामासाठी बँकेत जाणं पडलं. खाली उतरताच फोन वाजला... माधवीचा. तिची फार जुनी वर्ग मैत्रीण.. तिचा आवाज कानावर पडताच किरणच्या मनाला क्षणभर आधार मिळाला. माधवी नेहमी सारखीच सहज विचारत होती, “कशी आहेस?” पण त्या साध्या प्रश्नानेच किरणच्या डोळ्यांत पाणी आलं. कंठ दाटला. आत साचलेली वेदना कुणालातरी सांगावीशी वाटत होती.
तिने माधवीला लकीबद्दल सुरुवाती पासून सगळं सांगितलं... स्वतःच्या वाढत चाललेल्या ओढीबद्दल. आणि या सगळ्यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का, हा प्रश्न तिने विचारला.
माधवी शांतपणे ऐकत राहिली. थोडा वेळ गप्प राहून ती म्हणाली,
“किरण, आयुष्यात कधी कधी भावनिक अपघात होतात. तू सध्या जखमी आहेस. तू तुझ्या भावना मोकळेपणाने मांडल्या आहेत; तरीही जर ओढ संपत नसेल, तर कदाचित तुला वास्तवाचा सामना करावा लागेल. हे काही सिद्ध उपाय नाहीत, पण काहींच्या अनुभवातून असं दिसतं.”
ती पुढे म्हणाली,
“अनेकदा एखादी व्यक्ती दूरून खूप आकर्षक वाटते. पण जवळ गेल्यावर तिच्या मर्यादा, कमतरता दिसू लागतात आणि आपोआप ओढ कमी होते. नात्यांमध्येही असं होतं; म्हणूनच अनेक जण वेगळे होतात. पण लक्षात ठेव.. तो तुझ्या वाटेवरचा नाही. काहीही ठरवताना स्वतःचा सन्मान आणि सुरक्षितता विसरू नकोस.”
माधवीने नंतर थोडे विषयांतर करून संभाषण संपवलं, पण तिच्या शब्दांचा परिणाम किरणवर खोलवर होत राहिला. ते शब्द जणू एखाद्या औषधा सारखे होते, वरवर दिलासा देणारे, पण आतल्या जखमांना पुन्हा कुरतडणारे.
फोन ठेवल्यावर किरण काही क्षण तिथेच उभी राहिली. मनात दोन प्रवाह एकाच वेळी वाहत होते... या ओढीतून सुटण्याची तीव्र इच्छा आणि स्वतःलाच दोष देण्याची सवय. ती पुन्हा एकदा स्वतःशीच लढत होती... स्वतःला वाचवण्यासाठी.
क्रमशः
किरण किशोर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा