माधवीच्या शब्दांनी किरणच्या मनात जे वादळ उठवले होते, ते अजूनही थांबले नव्हते. बँकेच्या त्या कोपऱ्यात बसून तिने कितीतरी वेळ स्वतःशीच झगडत घालवला होता. बाहेरचं जग नेहमी सारखंच धावत होतं... गाडयांची ये जा चालू होती.. समोरील खाऊ गल्लीत खाणाऱ्यांची वर्दळ... पण किरणसाठी वेळ जणू गोठून गेला होता. तिच्या मनात कधी अपराधी भाव येत होता तर मधेच लकीची ओढ दाटून येत होती... आणि हे सगळे सरले की स्वतःबद्दलचा तिरस्कार उफाळून येत होता.
बराच वेळ तशीच पुतळ्यासारखी बसून शेवटी डोळे पुसत ती बाहेर पडली. पावलं आपोआप ऑफिसच्या दिशेने वळली. चालताना चेहऱ्यावरचा थकवा आणि मनातली उदासी लपवणं आता अशक्य होतं. आणि नेमक्या त्याच क्षणी समोरून रश्मी येताना दिसली.
दोघींच्या नजरा एकमेकींना भिडल्या आणि किरणच्या काळजाला चटका बसला. रश्मीच अशी तिची जुनी, विश्वासू मैत्रीण होती जी तिच्या भावनांना समजणारी होती... किरणचा स्वभाव ती चांगलाच ओळखून असल्याने ती तिच्या डोळ्यांमधील रिकामेपण ओळखू शकत होती. रश्मीला टाळून जाण्याची तीव्र इच्छा तिला झाली होती... पण पळून जाण्या इतकी ताकद तिच्यात उरली नव्हती.
रश्मी काळजीने थेट तिच्याजवळ आली.
“किरण… काय झालंय तुला?”
स्वरातली काळजी लपवता येत नव्हती.
“आरशात बघितलंस का स्वतःला? तू अक्षरशः कोमेजलीयस.”
रश्मीने तिचा हात घट्ट पकडला. त्या स्पर्शात एक सहवेदना होती... आपुलकी होती. त्या मायेच्या स्पर्शाने एका क्षणातच किरणचा बांध फुटला. ती हुंदके देत तेथेच रडू लागली... डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
रश्मीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता टॅक्सी थांबवली.
“किरण चल टॅक्सीत बस. इथे रडणे इष्ट नाही.”
थोड्याच वेळात दोघी मरीन ड्राइव्हला पोहोचल्या. दुपारच्या उन्हात समोरील निळाशार पसरलेला समुद्र सुंदर भासत होता. कानांवर येणार लाटांचा आवाज काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता... जणू न बोलता मनातील मूक वेदनांना त्याची गाज शब्द देत होती.
दोघी समुद्राकडे तोंड करून बसल्या. रश्मी काही बोलली नाही. तिला माहीत होतं... किरणला आधी मोकळा श्वास घ्यायला हवा होता.
बराच वेळ गेल्यावर किरण बोलू लागली.
“रश्मी… मी स्वतःपासून पळतेय ग. मला यातून बाहेर यायचंय, मी किती प्रयत्न करते पण मार्गच दिसत नाहीये.”
तिचा आवाज क्षीण हरलेला वाटत होता.
“माझे वागणे... मी जे काही यांत्रिकपणे करतीये ते सगळे चुकीचं वाटत असूनही मी स्वतःला थांबवू शकत नाहीये. तो माझ्याभोवती सतत असतो… आणि मी... मी कमजोर पडते.”
रश्मी शांतपणे ऐकत होती. मग तिने हळूच विचारलं,
“तो लकी… तो नक्की कुठला आहे?”
“बंगाली. लकीराज गांगुली.”
किरणने मान खाली घालून उत्तर दिलं.
रश्मी काही क्षण गप्प राहिली. समुद्राकडे पाहत ती म्हणाली,
“किरण, मी ठाम आरोप करत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घे... काही नाती फक्त भावनिक नसतात. कधी कधी त्यामागे अजून काहीतरी असतं.”
किरण तिच्या बोलण्याला नकार देणार होती, पण रश्मीच्या नजरेतला ठामपणा पाहून ती थांबली.
“मला एक सांग ! तो जेव्हा ऑफिसमध्ये नवीन आला, तेव्हापासून काही विचित्र घडतंय का?”
रश्मीने पुढे विचारलं.
“तुझ्या आयुष्यातले सगळे बदल, तुझं झपाट्याने खचणं… हे सगळं अचानक नाही झालेले.”
“स्वतःला दोष देणं पुरे झालं,” रश्मी म्हणाली.
“तू पण एक हाडामांसाची माणूस आहेस, तुझ्या कडून जे होतेय तो काही अपराध नाही. पण तुला जे कोणी हे सगळे करायला लावतेय, त्यामागचं सत्य समजून घेतल्या शिवाय तू त्यातून सुटू शकणार नाहीस.”
तिच्या त्या शब्दांनी किरण विचारात गढली.... हळूहळू मनातला एक बंद कप्पा उघडला.
आठवणी हळूहळू स्पष्ट होऊ लागल्या... लकी ऑफिसमध्ये आला तेव्हाचा त्याचा ताठ वावर…
काही सहकाऱ्यांशी झालेले तणाव… आणि अचानक त्याच्या वागण्यात झालेला बदल... आणि काही लोकांचे त्याच्या पासून दूर जाणं…
आठवणी स्पष्ट होत होत्या आणि किरणचा चेहरा बदलत होता. रश्मी तिच्या चेहेऱ्यावरील बदलणाऱ्या रेषांकडे लक्ष ठेवून होती.
“ह्म्म्म नक्कीच काही आठवतंय, हो ना?”
रश्मीने डोळे बारीक करत विचारलं.
किरणने खोल श्वास घेतला.
“हो… आठवले... आता सगळंच थोडं गूढ वाटायला लागलंय.”
समुद्राच्या लाटा जशा एकामागोमाग एक येत होत्या, तशाच आठवणी किरणच्या मनाच्या किनाऱ्याला आदळत होत्या. आणि तिला पहिल्यांदाच जाणवलं... रश्मी म्हणते तसे जर असेल तर हा संघर्ष फक्त आपल्या भावनांचा नाहीये.
त्या दुपारी, मरीन ड्राइव्हवर बसलेली सध्या मनाची किरण अजून हे जाणत नव्हती...
की तिच्या आयुष्यातलं खरं वादळ आता सुरू होणार होतं.
क्रमशः
किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा