Login

स्वतःला शोधताना : भाग १०.

.
किरणला सगळ्या घटना आठवू लागल्या आणि तिने बोलायला सुरवात केली…


“ऑफिसमधली ती संध्याकाळ नेहमीसारखी नव्हती. काम आटोपल्यावर ही बरेच जण कॅफेटेरिया मध्ये थांबले होते. हसणे, टोमणे, एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावरची उथळ चेष्टा… हे सगळे तिथे नेहमीचेच होते.


मी तेथे चहा प्यायला बसले होते, माझे शरीर जरी तेथे असले तरी मी मनाने मात्र कुठेतरी दूर होते. तुला तर माहीतच आहे की अशा उथळ गप्पांमध्ये मला अजिबात रस नाही. लग्न, बॉयफ्रेंड, “नॉर्मल” आयुष्याची रंगवलेली चित्रं… या सगळ्याशी माझा काहीच संबंध नव्हता. तरीही कोणास ठाऊक त्या दिवशी मी तेथे थांबले होते. कलिग्सच्या टिप्पणींकडे दुर्लक्ष करत मी आपली शांतपणे चहा पीत बसले होते.


हजर जबाबी, जहरी विनोद करणारा, आणि लोकांना अस्वस्थ करण्यातच मजा मानणारा लकी त्या टवाळ ग्रुपचा केंद्रबिंदू होता. त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक वाक्यावर हसत होते. हळूहळू तेथील वातावरण गढूळ होत गेलं.


माझ्या मनात एक धुसर शंका उमटली…
आपण इथे आहोत म्हणजे आपलाही विषय निघणारच…


… आणि तसंच झालं.


लकीने मुद्दाम माझं नाव घेतलं. सुरुवातीला लोक गप्प झाले. ऑफिसमध्ये माझा आदर आहे, मी माझ्या कामात प्रामाणिक, स्पष्टवक्ती आणि कुणाच्या गटात न बसणारी होती. पण नविन आलेल्या लकीला याची फारशी पर्वा नव्हती.


त्याने अप्रत्यक्षपणे माझ्या शरीरावर, माझ्या हालचालींवर, माझ्या स्त्रीत्वावर विनोद करायला सुरुवात केली… काही वेळाने तो उघडपणे विनोद करू लागला… त्याचे विनोद नंतर अश्लीलतेच्या सीमेला स्पर्श करू लागले. त्यावर काही जण हसले, तर काहींनी नजर चुकवली. परंतु कुणीही त्याला थांबवलं नाही.


मला क्षणभर वाटलं, जणू सगळ्यां समोर मला उघडं पाडलं गेलं आहे. तेथील वातावरण पाहून मला लाज वाटू लागली. त्या क्षणी मी शांत आणि असहाय झाले होते… आणि लकी माझ्या शांततेचा गैरफायदा घेत होता.


पण मी फार वेळ काही शांत बसू शकले नाही…
माझ्या खोल अंतर्मनात वर्षानुवर्षे गाडलेला स्वाभिमान उफाळून वर आला.


मी ताडकन उभी राहिले.


माझ्या शांत गंभीर चेहऱ्याने वातावरणात बदल झाला. हसणारे टवाळ अचानक गप्प झाले. सगळ्यांचे डोळे माझ्याकडे वळले.


मी हसले… पण माझे हसू मृदू नव्हतं, ते धारदार होतं.


मी लकीकडे पहात त्याच्याच भाषेतच, पण त्याच्यापेक्षा अधिक बुद्धिमत्तेने त्याला प्रतिउत्तर दिलं. माझा विनोद इतका अचूक होता की तो अश्लील न वाटता आरसा ठरला, आणि त्या आरशात लकीचा विद्रूप चेहरा सगळ्यांना दिसला.


क्षणात सगळीकडे हास्याचा स्फोट झाला… पण यावेळी हसण्याचा विषय लकी होता.
अचानक बदललेल्या पार्टीने तो चिडला… त्याचा आत्मविश्वास ढासळला.


मी मात्र शांतपणे त्याची माफी मागत पुढे निघून गेले… कारण मला विजय साजरा करायचा नव्हता, मला स्वतःचा सन्मान जपायचा होता.


दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये एकच चर्चा होती…
“किरणने लकीला चांगलाच धडा शिकवला.”


पण मला या कौतुकाचा आनंद नव्हता. मला प्रश्न पडला होता…


माझ्या सारख्या अविवाहित प्रौढ स्त्रियांनी कायम विनोद सहनच करायचे का?आणि मनाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच मी लकीशी थेट बोलायचा निर्णय घेतला.


संध्याकाळी ऑफिसमधून निघताना मी मुद्दाम लकीच्या मागाहून चालू लागले. रस्त्यात तो सिगारेटसाठी थांबला. हा चान्स बघून मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली.


मी आक्रमक नव्हते आणि मी उपदेशकही नव्हते. मी फक्त प्रामाणिक होते. मी त्याला समजावले… त्याच्या विनोदांचा परिणाम म्हणून लोकांमध्ये त्याची प्रतिमा अगदीच उथळ झालीय… आणि उद्या हे सगळं वरिष्ठांपर्यंत गेलं तर होणारे परिणाम त्याच्या पुढील करियरसाठी बाधक ठरणार होते.


“क्षणिक मजेसाठी स्वतःचं भविष्य धोक्यात घालू नकोस,” एवढंच मी त्याला सांगितलं. लकीने माझे बोलणे अगदी सुरवातीपासून शांतपणे एकूण घेतले… कदाचित पहिल्यांदाच त्याने कोणाचे ऐकले असेल.


दुसऱ्या दिवसापासून त्याच्यात बदल दिसू लागला. तो सौम्य झाला. लोकांशी नीट वागू लागला. आणि सगळ्यां समोर त्याने त्या बदलाचं श्रेय मला दिलं.


मला ते त्रासदायक होऊन बसलं कारण त्यानंतर लकी माझ्या आसपास अधिक फिरू लागला. सुरवातीला नकळत खांद्यावरचा हात, जवळ येऊन बोलणं… नंतर सगळं औपचारिकतेच्या पलीकडे जाऊ लागलं. त्याच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेली मी… माझा अनुभव… मला सांगत होता… ही जवळीक धोकादायक आहे.


परंतु अंतर्मनात कुठेतरी त्याचे मला विशेष स्थान देणे आवडू लागले… नंतर त्याच्या अनुपस्थितीत मला अस्वस्थता जाणवू लागली. तीच अस्वस्थता आज माझे व्यसन झालीय… 


किरण ने तिला आठवलेली सगळी हकीकत रश्मीला सांगितली. किरण ची कथा संपताच रश्मीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. ती क्षणभर शांत राहिली, आणि मग ठामपणे म्हणाली…


“किरण, तू भोळी नाहीस… पण कधी कधी स्वतःच्या एकटेपणामुळे तू वाहवत जातेस आणि बेसावध होतेस.


तू जे काही सांगितले त्यावरून वाटते तो माणूस हिंसक प्रवृत्तीचा आहे. ऑफिसमध्ये सगळ्यांना छळल्यानंतर त्याने तुला लक्ष्य केलं. तू गप्प राहशील, असं त्याला वाटलं होतं. पण तू उलट त्याला आरसा दाखवला.”


तो थांबला, थोडा नरम झाला.


“पण लक्षात ठेव… प्रौढ, स्वतंत्र स्त्री असणं म्हणजे कायम स्वतःसाठी दक्ष राहणं आलं. एकाद्या पुरुषाचे आकर्षण, कुणी केलेले कौतुक… सगळा बनाव असतो.”


समुद्राच्या लाटांचा आवाज त्या रश्मीच्या शब्दांवर शिक्कामोर्तब करत होता.


किरण काही बोलली नाही. पण त्या संध्याकाळी तिने एक गोष्ट ठरवली…


स्वतःला शोधताना, स्वतःला गमावायचं नाही.