Login

स्वतःला शोधताना : भाग १२.

.
 रश्मीचा तो फोन म्हणजे जणू किरणच्या आयुष्यात पडलेला बॉम्बच होता.“मी येतेय,” एवढंच म्हणाली होती ती आणि त्या दोन शब्दांनी किरणच्या छातीत धडधड वाढली होती.  

आता काय करावे ते तिला काहीच सुचत नव्हते. रश्मीचे तिच्या प्रति असलेले मैत्री प्रेम तिला चांगलेच माहित होते. ती येणार हे नक्कीच होते, आणि जर तिने येऊन लकीशी भांडण केले तर?? या विचारांनी किरणला कापरे भरले. ती त्या अवस्थेत कोणताच निर्णय घेऊ शकत नव्हती. 

ती लकी कडे आणि गेटकडे गोंधळून पाहू लागली आणि इतक्यात रश्मी आत येताना दिसला. तिची नजर किरणलाच शोधत होती. किरण धावतच खाली आली आणि रश्मीला समोरा गेली, तिच्या नजरेत राग होता. 

किरण ने नजरेने तिला विनवणी केली. परंतु तिने नजरेने तिला लकी कुठे आहे हे विचारले. इतक्यात लकी दोन शर्ट निवडून खाली आला होता. किरणला रश्मी बरोबर पाहून त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. 

रश्मीची आणि त्याची नजरा नजर झाली आणि तिने ताडले की हाच लकी आहे. आता काय होणार याची किरणला धास्ती लागून होतीच. इतक्यात रश्मीने लकीला हाय केले आणि चेहेऱ्यावर रुंद स्मित आणत बोलली.  

"हाय!! अगर मैं गलत नही तो आप ही लकी हो ना??"

लकीने आश्चर्याने किरणकडे पाहिले. आता मात्र तिला पुढे येणे भागच होते. किरणने पुढे होत लकी बरोबर रश्मीची ओळख करून दिली. 

"लकी ही माझी खूप जुनी फॅमिली फ्रेंड रश्मी आहे, ही आपल्याच कंपनीच्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करते... आणि रश्मी हा माझा कलीग लकी"

तिने ओळख करून देताच लकीने स्मित करत आपला हात मिळवण्यासाठी रश्मी पुढे केला, परंतु त्या अगोदरच रश्मीने आपले हात जोडून त्याला नमस्कार केला. तिने हे मुद्दाम केले असावे... तिच्या त्या खवचटपणामुळे किरणच्या हृदयात खड्डा पडला. लकीला वाईट वाटले असेल या विचारांनी तिने चेहेरा पाडून त्याच्याकडे पाहिले खरे, परंतु त्याने चेहेऱ्यावर कसेलच भाव दर्शवले नाहीस. इतक्यात रश्मीने तिच्याडे मोर्चा वळवला आणि जरा मोठ्याने बोलली. 

"किरण आपल्याला चेंबूर ला महत्वाच्या कामाने जायचे होते हे तुला माहित असूनही तू परस्पर येथे आलीस, चलो ठीक आहे, मला वाटते लकीची खरेदी पण झालेली आहे, आता आपण निघूया"

असे म्हणत तिने किरणचा हात धरला आणि एक स्मित लकीकडे फेकले आणि बोलली...  

"सॉरी लकी जी! हमे देर हो रही हैं हम निकलते हैं, आपकी शॉपिंग आराम से खत्म करो, बाय सी यु"

इतके बोलून रश्मीने तिला ओढतच शॉपच्या बाहेर काढले. तिने एकदा केविलवाणे लकीला पहिले आणि निमूटपणे रश्मी बरोबर निघाली. काउंटरवरून बॅग्स घेतल्या आणि त्या दोघी फाउंटन कडे निघाल्या. 

रस्त्यात रश्मी काहीच बोलत नव्हती. किरणला तर हिम्मतच नव्हती तिच्याशी बोलायची. सीएसटी स्टेशन आले. रश्मीने पुढे होत चेम्बुरची तिकिटे घेतली आणि हार्बरच्या प्लॅटफॉर्मकडे निघाली. किरण तिच्या पाठोपाठ निघाली. वाशी ट्रेन लागली होती. दोघी डब्यात शिरून सीट वर बसल्या. रश्मीने रुमालाने आपला घामेजलेल्या चिंतातुर चेहेरा पुसला आणि बगे मधून पाण्याची बाटली काढली. स्वतः दोन घोट पिऊन बाटली किरणकडे केली. तिने पण दोन घोट थंड पाणी प्याले.. जरा बरे वाटू लागले. तो पर्यंत रश्मीने सिल्व्हर फॉईल मधील एक पुडके तिला दिले. 

आता पर्यंत किरणची नाराजगी गेलेली होती. तिने मंद स्मित करत ते पुडके घेतले आणि अलगद उघडले.. गरमागरम चीज सॅन्डविचचा खमंग सुगंध दरवळला. तिने सॅन्डविच खाण्यास सुरवात केली होती. एक बाईट घेऊन तिने स्वतःहून संवाद सुरु केला. 

"सॉरी रश्मी ! काय करू, आता जरी मी तुला काही आश्वासन दिले आणि समोर लकी आला की माझा माझ्यावर कंट्रोल राहत नाही. त्यामुळे हे सगळे असे झाले... तुला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मी पुन्हा एकदा माफी मागते"

रश्मीने फक्त स्मित केले. तिच्या गोबऱ्या दोन्ही गालांवर खळ्या पडल्या. तिला हसताना पाहून किरणला शर्मिला टॅगोर आठवली. तिच्या तोंडून फक्त 'हमम' असे उद्गार ऐकू आले आणि ती आपले सॅन्डविच खाण्यात गुंग झाला. 

चेंबूरला उतरून तिने टॅक्सी घेतली. पी. एल. लोखंडे मार्गावरून गाडी पुढे निघाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना श्रमिकांची दाट वस्ती  दिसत होती. गर्दीने फुललेले रस्ते, दुकाने, मच्छी मार्केट, सगळ्या धर्मांची प्रार्थना स्थळे पाहत पाहत टॅक्सी एका झोपडपट्टीच्या कोपऱ्यावर थांबली. दोघी उतरल्या, रश्मीने बिल दिले. किरणच्या चेहेऱ्यावर मोठे प्रश्न चिन्ह पाहून रश्मी बोलला. 

"मला वाटलेच होते, तुझ्या चेहेऱ्यावर बारा वाजतील. रश्मी हसली.

“तू स्वतःला शोधतेयस ना? मग काही उत्तरं ऑफिसमध्ये मिळत नाहीत काही प्रकारचे 'अध्यात्म' श्रमिकांच्या उद्धारासाठी अशा वस्त्यांमध्ये नांदत असते, चल ये माझ्या मागे"

रश्मीच्या चपराकीने ती वारमुन तिच्या मागे चालू लागली. अंधार झाला होता. गल्ल्यां मधून चालत चालत वळणे घेत रश्मी एका गल्लीत घुसली. किरण पण तिच्या मागे होती. त्या अरुंद गल्लीच्या शेवटच्या दारा बाहेर बाया बापडे उभी दिसली. घरातून धूप अगरबत्तीचा धूर बाहेर येताना दिसत होता, आणि इतक्यात 'चौंडके' सोबत हलगी, झांज वाजू लागले....  रश्मीने पटकन तिचा हात पकडला.. त्या गर्दीला सारत वेगाने त्या दोघी दरवाजाकडे निघाल्या. 

त्यांनी दारातून आत पाऊल टाकले. समोर फुलांनी सजवलेला भलामोठा देव्हारा दिसू लागला. विविध दागिन्यांनी सजलेली देवीची चांदीची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. देवी समोर नऊवारी नेसलेली पाठमोरी व्यक्ती आरती घेऊन उभी होती. आरतीच्या ताटातील पिवळ्या नारंगी ज्वालांचा प्रकाश देवीच्या चेहेऱ्यावरील भाव जागृत करत होता. कन्नड भाषेतील खड्या आवाजातील देवीची आरती जरी तिला समजत नसली तरी किरणचे हात भक्तिभावाने आपोआप जोडले गेले आणि ती त्या भारावलेल्या वातावरणात नतमस्तक झाली.  

पारंपरिक वाद्यांचा गजर अंगात एक वेगळीच लय निर्माण करत होता. बऱ्याच वेळाने आरती संपली आणि गुरूंनी आरतीचे ताट मागे फिरवले. त्यांची नजर रश्मीकडे गेली आणि सावकाशपणे  त्यांनी किरणही पाहिले. त्यांनी आरती फिरवत त्यांच्या पर्यंत आणली, दोघीनी पटकन त्या पवित्र ज्योतीवरून हात फिरवत देवीला नमस्कार केला. रश्मीने पटकन वाकून गुरूंचे चरण स्पर्श केले. किरण पण तिच्या मागोमाग गुरूंच्या पाया पडली. गुरूंनी किरणच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि तिला आशीर्वाद देत आरतीचे ताट त्यांच्या एका चेल्याच्या हातात दिले. चेल्याने ताट फिरवत घरा बाहेरील लोकांपर्यंत नेले. 

आरतीला आलेल्या बऱ्याच जणांनी नंतर देवीला हळदकुंकू वाहून नमस्कार करून गुरूंचा निरोप घेतला. घर बऱ्यापैकी रिकामे झाले. त्या दोघींनी घरातील एक कोपरा पकडून बसकण मारली. पुढील एका तासात सगळी खोली रिकामी झाली. गुरूंनी पदराने घाम टिपला आणि त्यांना जवळ बोलावले. 

रश्मी आणि ती त्वरित उठून त्यांच्याकडे जाऊन बसल्या. किरण गुरूंचे निरीक्षण करत होती. सावळा रापलेला वर्ण, मोठे डोळे, विरळ होत गेलेले कुरळे केस. त्यामुळे आपसूकच भव्य दिसणारे कपाळ आणि त्यावर कोरलेला भलामोठा कुंकवाचा लालजर्द गोल अधिक खुलून दिसत होता. नाकातील हिऱ्यांची फुल्ली चमकत होती. गळ्यात सोन्याचे दागिने, बोरमाळ, मंगळसूत्र आणि त्यातच कवड्यांच्या माळा, कानात भलीमोठी सुवर्ण कर्णफुले. हिरव्या नऊवारीत गुरूंच्या पायातील चांदीच्या पट्ट्या आणि जोडावी अँटिक पीस वाटत होते. किरण त्यांच्या प्रतीच्या आदराने भारावून त्यांचे ते रूप डोळ्यात साठवत होती.