गुरूंनी स्मित करत त्यांच्याकडे मायेने पाहिले. प्रथम त्यांनी रश्मीच्या आणि किरणच्या कपाळाला हळदं कुंकू लावले आणि भिंतीला मागे रेलत त्यांनी संवाद सुरु केला.
“बऱ्याच दिवसांनी पोर आलंय घरी, सगळं कुशल मंगल आहे ना रश्मी बेटा?”
गुरूंच्या बोलण्यावर रश्मीने स्मित करत उत्तर दिले.
“गुरु! कामामुळे मला वेळच मिळत नाही, संध्याकाळी ट्रेनला गर्दी पण खूप असते. पण काय करू, या लेकराचे अर्जंट काम निघाले आणि मला यावे लागले.”
रश्मीने बोलण्यात किरणांचा उल्लेख केला आणि गुरूंनी तिला आपादमस्तक न्याहाळले. त्यांनी पुन्हा रश्मीकडे सूचकपणे पाहिले… जणू त्यांना काही विचारायचे होते… शेवटी तेच बोलले...
“आपलंच लेकरू दिसतंय! बोल, काय समस्या आहे? निघेल मार्ग… आई यल्लूची कृपा झाली तर सगळे शक्य होईल. माझे काम म्हणजे भक्ताचा निरोप आईपर्यंत पोहोचवणे.”
“आबा गुरु, ही माझी जिवाभावाची मैत्रीण किरण आहे. पोर लय येडावलय, कामामधल्या बंगाली तरुणाच्या मागे पागल झालंय. त्या बंगाल्याने काहीतरी खायला घातलेय असे मला वाटतेय. त्याच्यामुळे माझ्या या भोळ्या मैत्रिणीची हालत लय खराब होत चाललीय. तुम्ही काहीतरी उपाय करा गुरु…”
रश्मीने काळजीने गुरूंना विनंती केली.
रश्मीचे बोलणे ऐकून किरणच्या डोळ्यांमधून दोन टपोरे थेंब बाहेर आले.
“उगी बाळ, आता रडायचे नाही…”
असे म्हणत गुरूंनी किरणकडे प्रेमाने पाहिले आणि तिच्या डोक्यावर त्यांचा हात ठेवून डोळे मिटले.
तिला काही क्षण वाटून गेले की गुरूंच्या आणि आई यल्लम्मा देवीच्या शक्तीने तिच्या डोक्यातील लकीचे सगळे विचार पुसले जावेत आणि ती पुन्हा पहिल्यासारखी मुक्त व्हावी.
गुरू तिच्या डोक्यावर हात ठेवून देवीचे नामस्मरण करत होते… तोंडात काही मंत्र पुटपुटत होते. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या गळ्यातील पिशवीमधून हळदकुंकू काढून किरणच्या कपाळाला लावले. मग रश्मीला खूण करून बाजूला नेऊन काहीतरी तिच्या कानात सांगितले. तिनेही काळजीपूर्वक ते ऐकून घेतले.
नंतर गुरूंनी किरणबरोबर बोलायला सुरवात केली.
“बेटा किरण! काही लोकांची मने इतकी लवचिक असतात की कुणीही येतो आणि मनाला वाकवून त्याला हवे तसे खेळणे बनवून खेळतो. हौस भागली की खेळणे तोडून निघून जातो. आपल्याला आवडते म्हणून आपण मटण-मच्छी खातो, परंतु आपण त्याची हाडे-काटे गळ्यात घालून फिरत नाही. या वाह्यात तरुणांना पण तशीच वागणूक द्यायला पाहिजे.”
“गुरु, मी स्वतःहून खूप प्रयत्न करतेय की त्याचे खूळ माझ्या डोक्यातून निघून जावे, पण तसे होत नाही. याचा फारच त्रास होतोय. झोप येत नाही, सतत मनाला सलत राहते… त्यामुळे कुठेच लक्ष लागत नाही… कामात चुका होतात… मग काय अर्थ आहे जीवनाचा? तो मला मिळणार नाही, त्याच्यात आणि माझ्यात अनेक प्रकारचे अंतर आहे, हे मला चांगलेच कळतेय पण वळत नाहीये…”
किरणने स्पष्टीकरण दिले.
गुरूंना कदाचित तिचे हे बोलणे अपेक्षित नसावे, असे क्षणभर तिला वाटून गेले. कदाचित त्यांनी गृहीत धरले असावे की—इतर काही प्रेमात बुडालेल्या तरुणींप्रमाणे तिने पण त्यांना सांगावे की, “काहीही करून मला तो मुलगा माझ्या आयुष्यात आणून द्या, त्याचे आणि माझे सूत जुळवून द्या.”
परंतु किरणने तसे काहीही न बोलता सरळ सांगून टाकले होते की तिला लकीचे खूळ डोक्यातून निघून जाण्यासाठी मदत हवी आहे.
गुरूंनी क्षणभर विचार केला आणि ते उठले. तिला आणि रश्मीला देव्हाऱ्यासमोर बसवले आणि स्वतःही बसले. देवीला हात जोडले आणि किरणकडे पाहत त्यांनी विचारले...
“किरण, तुझे पूर्ण नाव सांग आणि त्या तरुणाचे नाव सांग.”
किरणने त्यांना स्वतःचे पूर्ण नाव व लकीचे पूर्ण नाव सांगितले. गुरूंनी समोरील ताटात त्यांच्या पिशवीतील तांदूळ काढून ओतले. बोटांनी काही रेघा मारल्या आणि ते ताट त्यांनी लाल वस्त्राने झाकून देवीच्या पुढ्यात ठेवले. कमरेच्या चंचीमधून काही कवड्या काढल्या आणि खाली फेकल्या.
त्या कवड्यांचा जो काही कौल जमिनीवर स्थिरावला होता, तो किरणला किंवा रश्मीला अजिबात समजत नव्हता. त्यांच्यासाठी त्या फक्त उलट्या-सुलट्या, सरळ पडलेल्या कवड्या होत्या. परंतु गुरूंच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव साचू लागले होते.
त्यांचा चिंतातुर चेहरा पाहून रश्मीने आपली काळजीने भरलेली नजर किरणवर फिरवली आणि देवीला हात जोडले.
गुरूंनी थोड्या वेळाने उठून देवीसमोर ठेवलेले तांदळाचे ताट खाली घेतले आणि त्यांच्या समोर ठेवत त्यावरील लाल कापड बाजूला केले. कापड बाजूला होताच त्यांची नजर ताटावर गेली आणि त्यांच्या तोंडून यल्लमाचा उदो-उदो बाहेर आले...
“आई उधं उधं, आई तुझी किमया!”
त्या दोघी आतुरतेने गुरूंकडे पाहत होत्या, की त्यांनी त्या ताटात व कवड्यांमध्ये काय पाहिले, देवीने काय कौल दिला.
गुरूंनी सावकाश कवड्या गोळा केल्या, डोक्याला लावल्या व चंचीत ठेवून दिल्या. ताटातील दोन चिमूट तांदूळ उचलले व किरणच्या डोक्यावरून मागे फेकले, तिच्या कपाळाला फुंकर मारली आणि त्यांनी बोलायला सुरवात केली.
“किरण बेटा, त्या पोराने तुला आपल्या जाळ्यात चांगलेच फासलेय. तुला त्याने गोड खाऊ घालून त्यात ते भरवलेय जे तुला असर करतंय. त्याला तुझ्या रूपात एक दास हवाय… त्याचे काहीतरी काम तुझ्याकडून करून घ्यायचे आहे. त्यामुळेच तुझ्या डोक्यात सतत त्याचे विचार घोळत असतात. पण तू काळजी करू नकोस. मी त्याने जे काही तुझ्यावर केलेय ते उलटवून लावते.”
गुरूंनी असे म्हणत त्यांच्या पिशवीमध्ये हात घालून काहीतरी शोधल्यासारखे करून एक काळे पीस बाहेर काढले. ते काळे पीस बहुतेक कावळ्याचे असावे, असा तिने अंदाज बांधला. त्यांनी त्या पिसावर एक फुंकर मारून ते किरणच्या अंगावरून फिरवले. त्याच्यावर हळदकुंकू टाकून मंत्र म्हटले. धूपपात्रात टाकून जाळून टाकले.
पीस जळाल्याचा फारच उग्र व विचित्र वास घरात पसरला. त्या जळालेल्या पिसाची भुकटी त्यांनी एका पुडीत बांधून तिला दिली.
“रोज रात्री बारा वाजता यातील चिमूटभर राख पाण्यात टाकायची आणि ‘त्याची’ आठवण काढत ते पाणी प्यायचे. बघ, कसा तो तुझ्या आयुष्यातून निघून जातो.”
असे म्हणत गुरूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि ती भावनावश होऊन गुरूंच्या चरणी नतमस्तक झाली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. या प्रेमाच्या विचित्र भावनांमधून सुटका होणार, या विचारांनी तिला खूप बरे वाटू लागले. रश्मी चटकन उठली. तिने आपले वॅलेट काढले आणि गुरूंच्या चरणी पाचशेची नोट ठेवली आणि पाया पडत म्हणाली...
“गुरु, मला तुमच्यावर विश्वास होता की तुम्ही या लेकराला दुविधेमधून काढाल! म्हणून मी तिला तुमच्याकडे आणले. परंतु त्या माणसाच्या जादूमुळे ही पण यायचे टाळत होती. जेव्हा कुठे हिच्या कपाळाला अंगारा लावला, तेव्हाच ही माझ्या बरोबर आली. ठीक आहे गुरु, आता आम्ही निघतो. काही असेल तर फोनवर बोलतो.”
रश्मीने आपल्यासाठी इतके केले याचे किरणला फार ऋण आणि कौतुक वाटले. तिने पण पाकिटातून शंभराच्या नोटा काढल्या आणि गुरूंच्या पायावर ठेवायला गेली… तर गुरूंनी पटकन पाय मागे घेतले आणि तिला उभे करत म्हणाले...
“बेटा, ते पैसे देवीच्या पुढील ताटात टाक. तू अजून माझी भक्त झाली नाहीस, त्यामुळे मी तुझे पैसे घेऊ शकत नाही. लवकर बारी हो पोरी! आशीर्वाद.”
गुरूंच्या शब्दांचे मोरपीस मनावर फिरल्याने किरण तिच्या सततच्या दुःखाला विसरली होती.
दोघींनी गुरूंचा निरोप घेऊन वस्तीमधून बाहेर आल्या. रश्मीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. तिने किरणचा हात हातात घेतला आणि दोघी चालू लागल्या.
क्रमशः
किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा