Login

स्वतःला शोधताना : भाग १४.

.

स्वतःला शोधताना : भाग १४. 

रात्रीचे बारा कधी वाजतील आणि किरण तो जादुई अंगारा कधी पिऊन त्रासमुक्त होईल, याची वाट पाहत ती घरात अस्वस्थ फेऱ्या मारू लागली. घड्याळाचा टिकटिक आवाज अधिकच त्रासदायक वाटू लागला… शेवटी एकदाचे बारा वाजले आणि तिने टेबलावर ठेवलेल्या ग्लासमध्ये अंगारा टाकला… आणि चमच्याने ढवळू लागली…


इतक्यात मेसेजची टोन वातावरणात घुमली… तिचे लक्ष मोबाईलकडे गेले. स्क्रीनवर उमटलेले नाव वाचून तिच्या हृदयात धडकी भरली. लकीचा मेसेज तिला बोलावत होता. किरणच्या अंगात काहीतरी वेगळेच संचारले आणि तिने अंगाऱ्याचे पाणी न पिताच तो ग्लास तसाच खाली ठेवला व मोबाईल थरथरत्या हातांनी उचलला. बराच वेळ मेसेज उघडावा की नाही या विचारांत गेला आणि शेवटी तिने मेसेज ओपन केला.


“Wishing d sweetest night to a sweet natured person

May u sleep n fall from the bed tonight

Then you'll remember that u forgot to wish me gud night!”


त्या मेसेजची जादू म्हणावी की नशा... ती इतकी चढली की किरण लकीच्या स्वप्नात कधी गुंग झाली, तिलाच समजले नाही. रात्रीचे दोन वाजले तेव्हा कुठे तिला जाणवले की टेबलवर ग्लास आहे आणि बाजूला अंगाऱ्याची रिकामी पुडी आहे. बाराचा वेळ केव्हाच निघून गेल्याने आता अंगारा पिऊन काही फायदा नव्हता, आणि तसेही मनातून ती इच्छा निघून गेली होती. ती तशीच झोपी गेली.


रात्रभर लकीची नशा तिच्या रोमारोमात भिनत होती. त्याच्या शिवाय आता जग नाही आणि त्याच्या विचारां शिवाय जगता येणार नाही, ही भावना तिच्या मन मस्तिष्कात कोरली जात होती. ती पारध झालेली होती.


सकाळ होताच किरण लकीच्या विचारांनी भराभर आवरून कामावर जायला तयार झाली. कधी एकदा ऑफिसला जाते आणि प्रिय लकीला जाऊन भेटते असे तिला झाले होते. त्याच तंद्रीत तिने ट्रेन पकडली. सगळे विचार लकी मय झाले होते. स्टेशन कधी आले, चालत ती ऑफिसमध्ये कधी पोहोचली... तिला अजिबात समजले नाही. स्वतःच्या सीटवर जाऊन बॅग ठेवली आणि ती तडक लकीकडे वरच्या माळ्यावर पोहोचली.


पाहते तर लकी चहा पीत कंप्युटरवर काहीतरी वाचत होता. किरण त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याने एक नजर वळवून किरणकडे पाहिले… त्या नजरेत एक तुच्छ भाव तरळून गेला. किरण म्हणजे एक ओझे आहे, अशा स्वरूपाचे ते पाहणे होते. त्या नजरेने किरणला अपमानित झाल्या सारखे झाले. तरीही ती वेड्या सारखी त्याच्या बाजूला बसून राहिली. लकीला कदाचित समजले होते की ही काही इतक्यात येथून जाणार नाही; त्यामुळे त्याने कंप्युटरवर काहीतरी टाइप करत घसा खाकरला आणि बोलला... 


“अरे किरण जी, मैं आज बहुत बिझी हूँ. आपसे बात करने टाइम नहीं है, आप नीचे चले जाइए।”


लकीच्या टोन मधील भावना किरणला चपराक मारून गेल्या. ती गोरीमोरी, शरमिंदी होत तेथून उठली आणि खाली जाऊन आपल्या सीटवर सुन्न मनाने बसली. मनात काटेरी भावना टोचत होत्या. डोके गच्च झाले होते. जगणे नकोसे वाटत होते. एक भयानक दडपण सर्व बाजूंनी तिला चेपत होते. मनात हिम्मत आणत तिने स्वतःला समजावले... 


“तो बिझी आहे म्हणाला आहे; म्हणजे काम झाले की नक्कीच खाली येऊन बोलेल.” ... या विचारांनी तिला थोडे बरे वाटले आणि तिने आपला पीसी ऑन करून कामाला सुरुवात केली.


लंच टाइमला किरण नकळत त्याच्याकडे गेलीच. परंतु तो लंचसाठी बाहेर गेला होता. परत येताना लकी तिच्याजवळूनच गेला; पण त्याने किरणला हाकही मारली नाही. किरण सुकलेल्या फुलासारखी झाली होती. दिवस संपला, पण लकी काही आला नाही… किरण रडकुंडीला आली होती. सहा वाजले; सगळे बॅग घेऊन निघू लागले. किरण मात्र वेड्यासारखी तो येईल म्हणून वाट पाहत राहिली. इतक्यात ऑफिस बंद करणाऱ्या प्युनचे ओरडणे तिच्या कानांवर आदळले... 


“अहो किरण जी, आज काय इथेच वस्तीला आहात की काय? निघायचे नाही का?”


प्युनच्या आवाजाने शरमून किरणने आपली बॅग घेतली आणि बाहेर निघाली. मनात खूप आशा होती की लकी येईल. परंतु ती आशा वांझ ठरली. अति दुःखाने तिने ऑफिस मधून पाऊल बाहेर टाकले… डोळे भरले होते. तिने नेहमीचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने चालत स्टेशनकडे पावले वळवली.


डोळ्यांत हरलेपणाचे विचार, हताश विफल भावनांच्या लाटांमुळे बॅगेत वाजणारा फोन तिला कळलाच नाही. अचानक फोनचा आवाज मेंदूपर्यंत पोहोचला आणि मनात एक क्षणिक आनंदाची लहर धावली... "लकी तर नसेल ना?" या विचारांनी तिने पटकन फोन घेतला… पण तिचा चेहरा आंबट झाला; मनात भीती दाटून आली. 


रश्मीचा फोन होता. आता ती काय विचारेल याची तिला कल्पना होती; म्हणून तिने पटकन फोन कट केला. रश्मीला तोंड दाखवणे तिच्यासाठी लाजिरवाणे झाले होते.


स्वतःची दयनीय अवस्था आणि रश्मीचा फोन... यामुळे ती निराशेच्या गर्तेत चालत होती. लकीला पाहायची, त्याच्याशी बोलायची बोचरी हुरहूर तिच्या हृदयात कळ आणत होती. ती अस्थिर, अस्वस्थता वेदनादायक होत चालली होती. त्या भणंग अवस्थेत ती घरी पोहोचली. मन मस्तिष्कात, धमन्यांच्या प्रत्येक स्पंदनात लकीचाच विचार उमटत होता. जेवण गोड लागत नव्हते; घड्याळ जड झाले होते.


किरण खिडकीत बसून काळ्या आकाशात रुपेरी चंद्राकडे पाहत राहिली. रडू अनावर होत होते. नकळत हातांची बोटे मोबाईलच्या पॅडवर गेली आणि लकीसाठी मेसेज तयार झाला. इतक्या रात्री मेसेज पाठवायला तिला संकोच वाटत होता; पण ती मजबूर झाली होती. खूप आशा होती की त्याचा काहीतरी रिप्लाय येईल… पण उत्तर आलेच नाही. आता तिची सहनशीलता संपली आणि दुःखाची गाणी सुरू झाली.... 


“ये रात खुशनसीब है, ये अपने चाँद को…”


गाणी ऐकून, रडून डोळे सुजले; पण झोप काही लागत नव्हती. कूस बदलून बदलून ती उठली. तिने कपडे काढले, डोळे बंद केले आणि लकीला जवळ बोलावले. तिच्या स्वप्नांचा राजा क्षणात तिच्या जवळ आला… त्या जवळकीने किरणचा श्वास धावू लागला… लकीने तिला सर्व बाजूंनी व्यापून टाकले… सुखाच्या लाटा सर्वांगावर आदळू लागल्या… प्रत्येक लाटेने मनावरचे ओझे हलके होत गेले… डोक्यावरचा ताण शिथिल झाला.


किरणच्या हालचालींचा वेग वाढत गेला… आणि त्याबरोबर लकीचा आवेगही… क्षणभरात तो सर्वांगात खोलवर शिरत असल्याची अनुभूती… आह्ह… किरणच्या प्राणांतून लकीच्या संमोहिनीची चिळकांडी उडाली… पाठोपाठ उसळलेल्या विद्युत शलाकांच्या दाहकतेने तिचे शरीर आचके देत निष्प्रभ झाले... कलेवरा सारखे शांत.... 


मनावरचे ओझे त्या क्षणिक विसर्जना सोबत वाहून गेले; आणि त्याबरोबर लकीचा ध्यासही... किरण जणू स्वतःच्या याच अवस्थेची वाट पाहत होती. लकीचे भूत मानगुटीवरून उतरले होते.


त्या हलक्या आनंदात किरण उठली, गरम पाण्याचा शॉवर घेतला आणि अंथरुणात शिरली. काही क्षणांत तिला गाढ झोप लागली.