Login

स्वतःला शोधताना : भाग १७.

.

ज्या वाटेने काही वेळापूर्वी किरण नाक्यावर आली होती, तो अनोळखी पुरुष त्याच रस्त्याने पुढे निघाला होता. त्याच्या चालण्यात एक ठामपणा होता... जणू हा रस्ता, ही वेळ, हे अंधाराचे कोपरे त्याचेच आहेत. चिंचोळ्या, अंधाऱ्या गल्ली जवळ पोहोचताच तो थांबला. क्षणभर त्याने मागे वळून पाहिले. त्या नजरेत आत्मविश्वास होता... असा आत्मविश्वास, जो समोरच्या व्यक्तीच्या इच्छेचा विचारही करत नाही. ती येईलच, अशी खात्री त्याच्या देहबोलीत होती.


आजूबाजूला नजर फिरवत त्याने तिला एक सूचक इशारा केला... त्या इशाऱ्यात शब्द नव्हते पण एक दबाव होता. त्याने पुन्हा वळून पाहिले आणि क्षणात तो त्या चिंचोळ्या गल्लीच्या अंधारात विरला.


त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने संमोहित झालेली किरण… काहीशी तणावग्रस्त, काहीशी भारावलेली, त्या दिशेने पुढे चालत होती. तिचे प्रत्येक पाऊल जड पडत होते, जणू पायांना जमिनीकडे खेचणारे अदृश्य चुंबक चिकटले होते. मनाच्या आत खोलवर संचारलेले ते अविवेकी संमोहन त्या अपवित्र जागेकडे तिला ओढत होते... 


“मी त्या व्यक्तीच्या मागे मागे का चाललेय?”


हा प्रश्न मनाच्या पृष्ठभागावर क्षणभर चमकून गेला. तो विवेकाचा क्षणिक, अस्थिर एक लहानसा दिवा होता...  पण दुसऱ्याच क्षणी आत कुठूनतरी एक काळाकुट्ट अंधार धावून आला आणि त्या प्रकाशाला गिळून टाकले. विचारांची दिशा विस्कळीत झाली. निर्णयाची धार बोथट झाली.


अमंगलाचा प्रभाव वाढत होता. रस्त्यावरील दिव्यांचा उजेड मागे पडत चालला, आणि त्या अंधारात तिचे मन अधिकच गडद होत गेले. झपझप पुढे सरकत असतानाच तिच्या छातीत धडधड वाढत होती...  ती भीती होती की काहीतरी वेगळे हे तिलाच कळेना. शरीर आणि मन यांच्यातील संवाद तुटल्या सारखा वाटत होता.


तीरीही आतून एक क्षिणसा आवाज वर आला... "थांब किरण... पुढे धोका आहे... परत वळ"


पण त्या आवाजावरच दुसरा, अधिक कठोर स्वर चढला... "खूप झाले थांबून. आयुष्यभर इतरांनी ठरवलेल्या मर्यादांत जगलीस. आज तरी स्वतःचा निर्णय घे."


ही ओढ तिच्या इच्छेची नव्हती, हे तिला अस्पष्टपणे जाणवत होते; तरीही ती ओढ तिला खेचत होती. अपराधी भावना आणि बंडखोरी... या दोन टोकांमध्ये तिचे मन हेलकावत होते. “मी चुकीचं करतेय,” हा विचार तिला टोचत होता; पण त्याच वेळी “माझ्यावर इतकं नियंत्रण का?” हा प्रश्न तिच्या आत्मभानाला कुरवाळत होता.


अंधार अधिक दाट झाला. आजूबाजूच्या आवाजांची ओळख पुसट होत गेली. तिच्या चालण्यात घाई होती, पण त्या घाईत ठामपणा नव्हता... ती जणू कुणाच्या तरी इच्छेने पुढे ढकलली जात होती. स्वतःची इच्छा आणि परिस्थितीने लादलेली दिशा यातील फरक तिच्या मनात गोंधळ उडवत होता.


त्या क्षणी किरणला इतकंच जाणवत होतं, ही चाल तिच्या स्वातंत्र्याची कबुली नव्हती; ही एका अंतर्गत विस्कळीततेची परिणती होती. तिच्या आत घडत असलेल्या बदलांचा भार तिच्या पावलांवर पडत होता. आणि त्या बदलांचा दोष तिच्यावर लादला जाऊ नये, हे सत्य अजून स्पष्ट व्हायचं होतं... पण ते सत्य उलगडायला अजून वेळ होता.


त्या मोहित अवस्थेत त्या अंधाऱ्या चिंचोळ्या गल्लीत पाऊल टाकताच तिला तेथील अस्वच्छतेची तीव्र जाणीव झाली. मानवी मूत्राचा ओलसर, कुबट वास भस्सकन नाकाला जाणवला आणि क्षणभर तिने श्वास रोखून धरला. पायाखाली चरचरणारा कचरा, ओलसर माती, फुटलेल्या काचेचे तुकडे... हे सगळं ओलांडत ती आणखीन आत शिरत होती. प्रत्येक पावला सोबत तिच्या अंगावर एक अदृश्य मलिनता चढत असल्या सारखं वाटत होतं; जणू हा रस्ता तिच्या देहापेक्षा आधी तिच्या आत्म्याला माखवत होता.


ती अंधारी गल्ली तिच्या शीलाला गिळायला टपून बसली होती जणू... अनेक अपूर्ण इच्छांची, दडपलेल्या हिंसेची आणि उपेक्षित माणुसकीची ती साठवणूक होती. भिंतींवरची ओल, अंधारात न दिसणारे कोपरे, आणि कुठूनतरी ऐकू येणारे अस्पष्ट आवाज... या सगळ्यांनी तिच्या मनात प्रकाश पाडू पाहणाऱ्या स्वत्वाला क्षणभर गिळून टाकलं होतं.


आत कुठेतरी एक नाजूक चेतना उठत होती... "ही जागा तुझी नाही किरण... परत फिर"


पण त्या चेतनेवरच वातावरणाचा भार चढला. भीती आणि अविवेकी ओढ यांचा विचित्र संगम तिच्या मनात दाटू लागला. तिची पावलं पुढे जात होती, पण मन मागे ओढ घेत होतं. हा विरोधाभास तिला अधिकच असहाय्य करत होता.


तिला जाणवत होतं की इथे येणं ही तिची जाणीवपूर्वक निवड नव्हती; ही एका क्षणिक विस्कळीततेची, मनावर आलेल्या धुक्याची परिणती होती. तरीही, स्वतःलाच दोष देणारी एक धार आत कुठेतरी तिला चिरत होती... "मी इथे का आले?" त्या प्रश्नाचं उत्तर तिला माहीत नव्हतं, आणि न माहीत असणंच अधिक भयावह वाटत होतं.


गल्लीतला अंधार दाट होत गेला तसा तिच्या आतला आवाज अधिक क्षीण झाला. सभोवतालचं वातावरण तिच्या अस्तित्वावर दबाव टाकत होतं... जणू तिची ओळख, तिची मूल्यं, तिचं स्वत्व या सगळ्याला एका क्षणात निरर्थक ठरवायचा कट रचला जात होता... किरण यंत्रवत वासनेच्या जाळ्यात शिरत होती. 


दोन-चार पावले टाकताच परिस्थितीने अचानक वेगळेच वळण घेतले. मागून आलेल्या त्या व्यक्तीच्या अनपेक्षित अमंगल स्पर्शाच्या विळख्याने किरण दचकली. अंगावर काटा आला. क्षणात तिची शारीरिक आणि मानसिक सीमारेषा ढवळून निघाल्या... हे काय?


“थांब इथेच,” तो दबक्या, पण हुकमी आवाजात म्हणाला आणि तिला ओढून घेतले. मद्य आणि गांजाच्या दर्पाने तिचा स्वास कोंडला... त्याच्या कराल विळख्यातून स्वतःची सुटका करण्यासाठी ती धडपडू लागली.  


“थांबा…सोडा मला” ... तिच्या तोंडातून अर्धवट शब्द फुटला... पण तो हवेतच विरला.


“चूप XXX , नाटक नाय पायजे. मी काही असाच सोडणार नाही तुला.. चल ये आता” ... तो कठोरपणे म्हणाला, “तुला वाचवायला कोणी येणार नाही.”


त्या धमकीने किरणच्या अंगातील सगळे बळ गळून गेले... भीती, धक्का, असहाय्यता... सगळं एकाच वेळी अंगावर आदळलं. आपण पुरते अडकले गेलोय, येथे आपली इच्छा ताकद तग धरू शकणार नाही, ही जाणीव तीव्रपणे टोचली. शरीराच्या सीमारेषा तिच्या संमती शिवाय ओलांडल्या जात असल्याची जखमी जाणीव तिला झाली.


“मला नको, सोडा मला.” ... तिची असहाय धडपड सुरूच होती. 


“गप्प राहा. जास्त नखरे नको करुस, पैसे देतो,” तो जास्तच आक्रमक होत तिला झोंबू लागला.. त्या बेफिकीर, नशेच्या प्रभावाखाली स्वतःचे भान हरपलेल्या पशुपुढे किरणचा विरोध नगण्यच होता. 


किरणला त्या क्षणी काय घडते आहे, हे समजून घेण्याचीही संधी मिळाली नाही. तिच्या इच्छे शिवाय, तिच्या संमती शिवाय, परिस्थिती तिच्या हाता बाहेर जात होती. मनाच्या खोल कप्प्यात क्षीणसा प्रतिकार उमटला... "नाही नाही मी हे होऊ देणार नाही" पण जबर भीतीने तो प्रतिकार दडपला गेला. त्या काही क्षणांत किरण पूर्ण शुद्धीत होती. भीती, मानसिक धक्का आणि असहाय्यता यांचा गोफ तिच्या मनात घट्ट विणला गेला. तिला स्पष्ट जाणवत होते... आता जे काही झालेय ती तिची निवड नव्हती. 


त्या पुरुषाच्या हालचालींची पातळी घसरत चालली होती आणि त्याच क्षणी किरणच्या आत दडलेला संताप उसळून वर आला. भीतीच्या खाली दबलेली एक ताकद जागी झाली... "आता खूप झाले.. !" तिच्या सर्वांगात एक वेगळीच आग संचारली. आणि अचानक ते घडले... किरणने सणसणीत लाथ त्याच्या वर्मी मारली. त्या लाथेत प्रचंड शक्ती होती.. वेदनेने कळवळत तो पशु तिच्यापासून दूर जाऊन पडला... 


“सोड मला नाहीतर मी ओरडून पोलिसांना बोलावेन!” ... ती कडाडली... पहिल्यांदाच तिच्या आवाजाला धार आली होती, मनातील भीती त्या क्षणी जळून गेली होती. 

अनपेक्षितपणे बदललेल्या परिस्थितीने तो पुरुष घाबरला. नशेने चूर दुखावलेल्या त्याने पटकन उठत तिला जोरात भिंतीवर ढकलले आणि अंधारात मिसळत पळ काढला. भिंतीला डोके आपटले होते. डोक्यातून उठणाऱ्या वेदनां पेक्षा मनावरचा आघात अधिक खोल होता... किरण थरथरत तिथे काही क्षण स्तब्ध उभी राहिली. श्वास सावरत, थरथरत्या हातांनी तिने कपडे नीट केले आणि लटपटत्या पावलांनी बाहेर येऊ लागली.


तेवढ्यात दोन अस्पष्ट आकृत्या आत शिरताना दिसल्या.
“ए… थांब,” एकाने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला.


किरणच्या काळजात धडधड वाढली. पण यावेळी भीती सोबत एक जिद्दही होती. तिने त्याच्या हाताला जोरात झटका देत स्वतःला सोडवले आणि वेगाने रस्त्याकडे धाव घेतली.


“ए रुक XXX ,” मागून आवाज आला, “जान हमे भी…”


पण किरण थांबली नाही. रस्त्याच्या उजेडात येताच तिने वेग वाढवला. पाय लटपटत होते, डोक्यातील वेदना उसळत होत्या, तरीही ती धावत राहिली... कारण थांबणं म्हणजे पुन्हा हरवणं होतं. काही अंतरावर ती थांबली. मागे वळून पाहिलं... रस्ता रिकामा होता.


त्या क्षणी लज्जा, अपमान, आपण वापरलो गेल्याची बोच... या सगळ्या विचारांनी तिच्या डोळ्यांत अश्रूंची गर्दी झाली. पण त्या अश्रूंआड एक सत्यही स्पष्ट होतं. तिने स्वतःशीच हळूच म्हटलं, “मी यात दोषी नाही… माझ्यात काहीतरी दोष झाला म्हणून माझ्यावर हे ओढवलं.”


ती चालत होती. रस्त्याच्या प्रकाशात सावल्या मागे पडत होत्या. तिचं स्वच्छ मन बोलत होतं... "किरण, जी काही घटना झाली, ती तुझ्या चारित्र्याची कथा नव्हती. ती तुझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीची कथा होती. तुझ्या शरीर आणि मनात घडलेल्या बदलांची, असहायतेची कथा होती. त्या क्षणी तू एकटी होतीस, पण दोष तुझ्यात नव्हता. दोष त्या अंधारात होता... त्या मानसिकतेत होता, जिथे स्त्रीची इच्छा नव्हे, तर तिची असहाय्यता शिकार ठरते. तू वाचलीस. कारण तुझ्यातील ती ठिणगी विझलेली नव्हती.


क्रमशः 

©किशोर तरवडे 


0

🎭 Series Post

View all