Login

स्वतःला शोधताना : भाग १८.

.

प्रचंड घाबरलेली किरण घडलेल्या प्रसंगाने अक्षरशः हादरून गेली होती. तिचे पाय आपोआप घराकडे वळले, पण घाबरलेले मन मात्र मागेच रेंगाळले होते. कसेबसे घर गाठताच तिने दार, खिडक्या घट्ट लावून घेतल्या. बाहेरचा आवाज थांबला, पण आत इतका वेळ आवळून धरलेला बांध एकदम फुटला. ती किती वेळ रडत बसली होती, हे तिलाच कळले नाही.


“आपण असे कसे वाहवत गेलो?… हे सगळं त्या लकीच्या विचारांनी केलं… देवाने का दिला असा जन्म? या रात्रीच्या जगात एकट्या स्त्रीला इतकी हीन किंमत मिळते?…”


स्वतःच्या विचारांनीच ती स्वतःला ओरबाडत होती.


“शी… आपण आपल्या स्वत्वाला अशा घाणेरड्या इच्छांच्या चिखलात ओढून घेतलं…”


मन तिच्यावर निर्दयपणे चाल करून येत होते. शरीर अपवित्र झाल्याची भावना तिच्या अंगात भिनत चालली होती. आरशात पाहण्याचीही तिची हिंमत होत नव्हती. डोळ्यांत संतापाची, किळसवाणे पणाची भावना भरून आली. त्या अस्वस्थतेने ती उठली आणि थेट बाथरूममध्ये शिरली.


शॉवर सुरू करून ती कपड्यांसह त्याखाली उभी राहिली. थंड पाण्याच्या धारांनी शरीर भिजू लागले, पण मनातील जळजळ काही शांत होत नव्हती. काही क्षणांनी तिने कपडे काढून टाकले. साबणाने अंग घासून घासून स्वच्छ अंघोळ केली, जणू शरीर नाही तर आठवणी खरडून काढण्याचा प्रयत्न करत होती. बराच वेळ ती शॉवरखाली उभी राहिली.


तरीही मनाच्या गाभाऱ्यातून एक आवाज येतच होता... 
“तू अजूनही अपवित्रच आहेस.”


शेवटी कसाबसा स्वतःवर ताबा मिळवत ती बाहेर आली. अंग कोरडे केले, रात्रीचे कपडे चढवले आणि बेडवर अंग टाकले. संपूर्ण शरीर ठणकत होते. पाठ, पाय, डोकं... सगळीकडे वेदना होत्या. तिने एक पेनकिलर घेतली, डोक्याला टेंगुळ आले होते आणि गुडघ्याला खरचटले होते त्या जखमेवर तिने मलम लावले. मेंदू आणि मन दोन्ही इतके थकले होते की कधीतरी नकळत तिला गाढ झोप लागली.


दुपारचे ऊन खोलीत झिरपू लागल्यावर तिला जाग आली.


ती दचकून उठली. घड्याळाकडे पाहिले... बारा वाजून गेले होते. आज रविवार आहे हे लक्षात येताच तिने पुन्हा स्वतःला बेडवर झोकून दिले. डोळे मिटताच लकीचा चेहरा डोळ्यांसमोर तरळू लागला. डोळ्यांच्या कडा ओलावल्या.


“आपण लकीचा विचार मनातून काढायचा प्रयत्न केला, म्हणूनच हे सगळं घडलं… नाहीतर आपण इतक्या खाली पडलोच नसतो…”


अपराधी भावनेने मन पुन्हा तिच्यावर तुटून पडलं.


“प्रेम नावाच्या गोष्टीनेच आपल्याला अद्दल घडवली… आपण लकीला कधीच विसरायचं नाही…”


या विचारांनी तिच्या मनातली वेदना पुन्हा फुलून आली. तिला त्या क्षणी लकीला पाहण्याची तीव्र गरज वाटू लागली. जणू कुणी पाहू नये अशा भीतीने, तिने मोबाईलवर त्याचा फोटो अलगद उघडला. तिने स्क्रीनवर ओठ टेकवले. पण समाधान मिळाले नाही. उलट एक खोल रिकामेपण तिला बोचू लागले. 


तेवढ्यात तिला आठवले, आज नवीनला भेटायचे आहे. चार वाजता.


पोटात कावळे ओरडत होते. ती उठली. स्वयंपाकघरात जाऊन कुकर लावला. दात घासले, अंगावर पाणी घेतले. कुकरच्या शिट्ट्यांसोबत तिच्या मनातले विचारही उसळत होते. डाळ, भात, बटाट्याची भाजी साधं जेवण होतं, पण त्या क्षणी तेच तिला जगाशी जोडत होतं. जेवण करून भांडी आवरली, घर झाडलं. वेळ मात्र काही सरकत नव्हता. शेवटी ती तयार झाली, दरवाजा लॉक करून बाहेर पडली.


आज चालतच जायचं, असं ठरवून ती रस्त्यावर निघाली. चालण्याचा वेग वाढवत तिने मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. शरीर थकत होतं, पण मन थकत नव्हतं. पावणेचारच्या सुमारास ती नवीनने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचली. बंद दुकानाच्या पायऱ्यांवर बसली. पाय ठणकत होते. रुमालाने घाम पुसत तिने नवीनला फोन केला. एकाच रिंगमध्ये फोन उचलला गेला.


“हाय किरण ताई! आलात का? तुमच्याच फोनची वाट पाहतोय.”


“हो, आलेय. तुला अजून किती वेळ लागेल?” ... तिचा आवाज थोडासा थकलेला होता.


“पाच मिनिटांत पोहोचतो.”


थोड्याच वेळात नवीन समोरून येताना दिसला. त्याचा निरागस चेहरा पाहताच किरणच्या ओठांवर क्षीण हसू उमटलं. पण नवीनच्या नजरेत काळजी स्पष्ट होती.


“ताई… तुमचा चेहरा किती उतरलेला दिसतोय. डोळ्यांखाली काळी वर्तुळं… वजनही कमी झाल्यासारखं वाटतं.”


तो तिच्या बाजूला बसला. काही क्षण शांतता होती. पण त्या शांततेत एक आपुलकी होती, जी तिला फार दिवसांनी अनुभवायला मिळत होती. नवीनने तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला,


“मला माहीत आहे मी लहान आहे, पण ऑफिस मधले सगळे तुमच्या बद्दल काळजी करतायत. मन मोकळं करायचं असेल तर बोला. मला सांगा.”


त्या शब्दांनी तिच्या डोळ्यांत पाणी तरळले.


मनात विचार आला... "या मुलाला सगळं सांगणं योग्य ठरेल का? आपली वेदना कुणासाठी गॉसिप ठरेल का?"


पण तिचे अंतर्मन म्हणाले... "तो समजून घेईल."


तिने सगळं नाही, पण आवश्यक तेवढं सांगितलं. एकतर्फी प्रेम… त्यातून होणारा त्रास… मानसिक गुंतागुंत.


नवीन शांतपणे ऐकत राहिला.


शेवटी तो म्हणाला,
“ताई, यातून मला एकच गोष्ट कळते... तुम्ही मनाने खूप स्वच्छ आहात. तुमच्या भावनांचा मला आदर आहे. तुम्ही एकट्या नाही आहात. ऑफिस तुमच्या पाठीशी आहे. माझ्या कडून कसलीही मदत लागली तर सांगा. परंतु तुम्ही ऑफिसला जॉईन व्हा. साहेब विचारात होते की किरणच्या घरी जाऊन पाहून या काय मदत हवी असेल तर करा म्हणून' मीच त्यांना सांगितले कि मी जाऊन येतो., तेव्हा किरण ताई उद्या तुम्ही ऑफिसला येताय!"


नवीनच्या या बोलण्याने तिला उभारी आली, आणि खरोखरच वाटू लागले की आपण ऑफिसला गेलेच पाहिजे. कामात झोकुन दिल्याने मनातील विचार डायव्हर्ट होतील. घट्ट झालेल्या मेंदूचा ताण काही प्रमाणात हलका झाला. तिच्या चेहेऱ्यावर स्मित उमटले. खूप दिवसांनी तिला वाटलं कदाचित अजूनही स्वतःला सावरायची एक वाट शिल्लक आहे. 


क्रमशः

किशोर तरवडे 


0

🎭 Series Post

View all