मेडिकल मधून निघताना तिने मनात ठरवले होते की नाक्यावरील आरोग्य हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ञ येतात का चौकशी करावी. चालून चालून किरण घामाघूम झाली होती. आरोग्य हॉस्पिटलच्या पहिल्या माळ्यावर येऊन तिने घाबरतच रिसेप्शनिस्टला विचारपूस केली. कुणी ऐकू नये असे बघत तिने विचारले,
"मॅडम, आपल्याकडे मानसोपचार तज्ञ येतात का?"
"हो येतात ना, पेशंट कोण आहे?"
या प्रश्नाने किरणच्या अंगाला कापरेच भरले, परंतु मनात विचार केला की आता लाजून वगैरे चालणारच नाही. आपल्याला बरे व्हायचे आहे तर धाडस करावेच लागेल. किरणने पुढे होत त्या मॅडमला उत्तर दिले,
"मीच पेशंट आहे."
"ओके, डॉक्टर आज साडेसातला येतील. नाव काय आपले? फोन नंबर पण सांगा,"
त्या मॅडमने आपले पेन उचलून रजिस्टरवर लिहायला सज्ज झाली. किरणने त्वरित आपले नाव सांगितले आणि नंबर दिला. तिने सगळे टिपून घेतले आणि सांगितले,
"आपला तिसरा नंबर आहे, तुम्ही रात्री आठ वाजता या," असे म्हणत ती आपल्या कामात गर्क झाली.
किरणला फार बरे वाटले, नविनने सांगितले आणि आजच डॉक्टर पण भेटताहेत. तिने हॉस्पिटलचे कार्ड घेतले आणि खाली उतरली. घरी जाऊन आठ वाजता डॉक्टरकडे जायचे होते म्हणून तिने रिक्षा केली आणि घर गाठले.
किरण घरी आली, परंतु तिला काहीच करायची इच्छा होत नव्हती. डोके सुन्न झाले होते. डॉक्टरांकडे कसे व्यक्त व्हायचे? सगळे कसे सांगायचे? आपले वय आणि एकतर्फी प्रेमाचे वेड ऐकून डॉक्टर काय म्हणतील? आपल्याला कोणत्या नजरेने पाहतील? त्यांना आपल्या भावना, आपली अगतिकता कळेल तरी का? त्यांनी आपल्याला नकार दिला तर? या प्रकरणांत आपल्यालाच दोषी ठरवले तर? अविवाहित वयस्कर स्त्रिया नेहमी मागे लागतात असे तर ते म्हणणार नाही ना? एक ना अनेक नकारात्मक विचार डोक्यात पळू लागले होते. किरणने डोके गच्च धरले आणि एक खोल श्वास घेतला, आणि ‘ॐ नमः शिवाय’ चा जप जपण्यास सुरुवात केली. डोळे मिटून घेतले, त्या नंतर थोडे बरे वाटले.
घड्याळाकडे पाहत किरण उठली आपला तिसरा नंबर आहे याची तिला आठवण आली आणि मनातून एक नकारात्मकता प्रबळ होऊ लागली... नको, नको नाही जायचं डॉक्टरांकडे. त्यांच्या समोर आपल्या अब्रूचे धिंडवडे स्वतःच नागडे घेऊन दाखवायचे आणि लाजिरवाणे व्हायचे? सगळे सत्य सांगून त्यांच्या नजरेला नजर तरी देता येईल का? डॉक्टरकडे जायचे नाही हे पक्केच होत होते, की फोन वाजला.
"हॅलो किरणजी! डॉक्टर आले आहेत. आपणास आठ वाजता यायचे आहे. धन्यवाद!"
अनपेक्षित फोनमुळे मेलेल्या मनात पुन्हा आशा पल्लवित झाल्या आणि तिने मनात वज्र निर्धार केला...
"आता जे होईल ते होईल, डॉक्टरकडे जाऊनच यायचे. परिस्थितीने माझ्या मनाशी आणि शरीराशी जो खेळ सुरु केलाय, मग आता कुठे राहिली लज्जा? सगळे तर परिस्थितीने लुबाडलेय"... किरणने आपल्या कमकुवत मनाला झिडकारले आणि तोंडावर पाणी मारले. पायात चपला घालून ती घराला टाळा मारून बाहेर पडली.
पाचच मिनिटात रिक्षा भेटली आणि ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रिसेप्शनच्या आसपास ठेवलेल्या खुर्च्यांमध्ये बरेच लोक बसलेले होते. तिने आत पाऊल टाकताच काही लोकांच्या नजरा तिच्याकडे गेल्या. तिच्या काळजात धस्स झाले. इतक्यात रिसेप्शनवरील मॅडमने तिला एका रिकाम्या खुर्चीवर बसण्याची खूण केली.
थोड्याच वेळात तिला समजले की तीन डॉक्टरांची ओपीडी चालू आहे. तिच्या डॉक्टरांची पाटी लावलेला दरवाजा तेव्हापासून उडालाच नव्हता. कुणीतरी पेशंट आत होता वाटते. बऱ्याच वेळानंतर दरवाजा उघडून एक तरुणी बाहेर पडली. किरण त्या तरुणीला वरून खालपर्यंत न्याहाळत होती.
"हिला पण आपल्या सारखेच काहीतरी झाले असावे का?" तिच्या संशयी मनात प्रश्न उठला.
इतक्यात रिसेप्शनवरील मॅडमने तिच्या समोर बसलेल्या जोडप्याला आत जाण्यास सांगितले. किरणच्या मनात धाकधूक सुरु झाली. यांच्या नंतर आपल्याला आत जायचे आहे. तिने आपल्या चलबिचल मनाला शांत करण्यासाठी पुन्हा नामस्मरण सुरु केले. पण तिचे लक्ष मात्र डॉक्टरांच्या केबिनच्या दरवाजावरच होते. पंचवीस मिनिटात दरवाजा उघडला आणि ते जोडपे बाहेर आले. रिसेप्शनवर डॉक्टरांची फी देऊन बाहेर पडले.
आता तिचा नंबर होता. तिच्या हातांना घाम सुटला होता. रिसेप्शनिस्ट बाईने तिला आत जाण्याची खूण केली. किरण उठली, सावकाश पाऊले टाकत दरवाजापर्यंत गेली. हलकेच मान तिरपी करत तिने मागे वळून पाहिले की बसलेल्यांपैकी कोणी तिला पाहत तर नाही ना? कुणीही तिच्याकडे पाहत नव्हते. तिने दरवाजा ढकलला आणि आत पाहिले. समोर खुर्चीवर साधारण दिसणारे मध्यवयीन गृहस्थ बसलेले होते. त्यांची आणि किरणची नजरानजर झाली. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होते. किरण क्षणभर अडखळली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी हसऱ्या चेहऱ्याने तिला आत येण्यास सांगितले.
"या किरण, आत या."
किरण सावकाश आत गेली. दरवाजा आपोआप मागच्या मागे लागला. किरण त्यांच्या समोर बसली. त्यांनीच सुरुवात केली,
"अगदी रिलॅक्स व्हा आणि मग सांगा, मला घाई नाही."
डॉक्टरांचा आवाज मृदू आणि दिलासा देणारा होता. त्यामुळे किरणला हायसे वाटले. तिने चेहऱ्यावर स्मित आणत त्यांच्याकडे पहिले. त्यांचे डोळे पाणीदार आणि अंतरंगाचा ठाव घेणारे होते. त्यांनीही पुन्हा रुंद स्मित केले आणि वाट पाहू लागले. किरणने आधी आपल्या समस्येला व्यक्त करण्यासाठी शब्दांची आणि प्रसंगांची जुळवा-जुळव केलेली होती. तिने पुन्हा एकदा खोल श्वास घेतला आणि निर्धाराने बोलण्यास सुरुवात केली.
किरणने थोडा खोल श्वास घेतला. खोलीत काही क्षण शांतता पसरली. डॉक्टरांनी तिच्याकडे हसतमुख नजरेने पाहत हलक्या आवाजात म्हणाले,
"हो... बोला किरण, घाई करू नका. शांतपणे सांगा."
किरणने मान डोलावली, हात गुडघ्यावर ठेवले आणि थोड्या थरथरणाऱ्या आवाजात बोलायला सुरुवात केली...
"डॉक्टर!... मी एक... अविवाहित एकटी रहाणारी महिला आहे."
डॉक्टर किंचितसे डोके हलवून म्हणाले,
"हं... ठीक आहे... पुढे बोला."
किरण थोडी थांबली, श्वास आवरला आणि पुढे म्हणाली,
"माझ्या... माझ्या अविवाहित आणि एकटे असण्याचा मला कधीच न्यूनगंड वाटला नाही. मी माझं आयुष्य अगदी छान जगत होते..." ... किरण थोडावेळ थांबली.. तिच्या डोळ्यांत एक जुनी आठवण चमकली.
"...पण अचानक माझ्या आयुष्यात माझा तरुण कलीग आला."
डॉक्टरने सौम्य स्वरात “हं...” असं म्हणत मान हलवली.
"त्याने केलेल्या जवळकीने..." किरण थोडं गिळून म्हणाली,
"...मी त्याच्या प्रति आकर्षित झाले, आणि... मी त्याच्या एकतर्फी प्रेमात पडले."
डॉक्टरने पुढे झुकत विचारलं,
"एकतर्फी...? म्हणजे त्याला माहिती नाही?"
"नाही..." किरणने डोळे खाली केले,
"त्याला माझ्या विषयी काय काय माहित आहे हे मला माहित नाही, डॉक्टर. पण... माझ्याशी त्याची जवळीक... आणि मैत्री... आश्चर्यकारक आहे."
"हं..." डॉक्टरचा स्वर अजून मवाळ झाला,
"समजलं... पुढे सांगा."
किरणने दीर्घ श्वास घेतला, थोडी पुढे झुकून म्हणाली,
"मी त्याच्या सहवासासाठी आतुर होते, डॉक्टर... जसं कुणाला एखादं व्यसन लागतं, तसं... मला त्याचं व्यसन लागलंय असं वाटतं."
डॉक्टर शांतपणे मान डोलवत ऐकत होते.
"हं... पुढे?"
"या व्यसनाने माझ्या शांत आयुष्याला... उध्वस्त केलंय. माझं सगळं लक्ष उडालंय. मला मानसिक... आणि शारीरिक खूप त्रास होतोय." .. हे बोलताना किरणचा आवाज थरथरत होता.
"मनाला सगळं समजतं, डॉक्टर... त्याला माझ्या भावनांशी काहीही देणंघेणं नाही हेही कळतं... पण तरीही..."
डॉक्टर हलकेसे म्हणाले,
"तरीही मन थांबत नाही..."
किरणने वेदनेने हसत मान डोलावली,
"हो... माझं मन त्याच्या मागे फरफटतंय. मी स्वतःला खूप प्रयत्न करून बांधायचा प्रयत्न केला. मनाला आवर घालायचा प्रयत्न केला, पण..."
किरण बोलायची थांबली.. तिची नजर टेबलावर स्थिर झाली.
"...माझी ताकद कमकुवत झालीय, डॉक्टर."
डॉक्टरच्या नजरेत समजूत होती. ते शांतपणे म्हणाले,
"मी ऐकतोय किरण... पुढे सांगा."
"मी खरोखरच थकलेय..." .. थकून किरण तोंडातच पुटपुटत होती.
"मला या भावनां मधून बाहेर पडायचं आहे. ही दयनीय आणि केविलवाणी अवस्था मला भेदून गेलीये. मला पुन्हा माझी स्वाभिमानी, आनंदी अवस्था परत मिळवायची आहे... कृपया मला सहायता करा, डॉक्टर..."
शेवटचे शब्द उच्चारताना तिच्या डोळ्यांत पाणी तरळले.
डॉक्टर काही क्षण शांत बसले, मग अलगद म्हणाले,
"किरण... तुम्ही जे बोललात ना, ते अगदी प्रामाणिक आहे. आणि हे सांगायला खूप धैर्य लागतं. तुम्ही योग्य ठिकाणी आलात."
किरणने नजर वर केली... डॉक्टरांच्या चेहऱ्यावर समजूतदार स्मित होतं. त्या क्षणी, तिला पहिल्यांदा वाटलं कुणीतरी खरंच तिचं ऐकतो आहे.
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा